श्रीपाद नारायण पेंडसे

Author: Share:

जन्म: ५ जानेवारी १९१३

मृत्यू २३ मार्च २००७

आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील लोकजीवनआणि महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने चितारणाऱ्या श्री ना पेंडसेंनी फडके, खांडेकर यांच्या मार्गाने जाणाऱ्या मराठी कादंबरीला नवी वाट दाखवली. मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.

कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत पेंडसेंची लेखणी गाजली. मात्र मराठी साहित्यात त्यांची खरी ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच. ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली.‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही.

पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली. ‘एल्गार’ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. ‘एल्गार’ (१९४९) पाठोपाठ ‘हद्दपार’ (१९५०) आणि ‘गारंबीचा बापू’ (१९५२) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी कादंबरी ठरली. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी ‘हर्णैचा दीपस्तंभ’ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते.

त्यानंतर ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर ही दोन नाटके त्यांनी लिहिली. १९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘रथचक्र’ला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले. यातील निनावी पात्रांचा प्रयोग तर मराठी कादंबरीत अपूर्वच म्हणता येईल.

 रथचक्र’नंतर आलेल्या ‘लव्हाळी’ मध्ये दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जीवनजाणिवा, क्षुद्रत्व हा आशय मांडण्यासाठी त्यांनी दैनंदिनीची शैली स्वीकारलेली आढळते. नंतर ‘आकांत’ नावाची आणखी एक कादंबरी आली पण १९८८ मध्ये ‘तुंबाडचे खोत’ ही त्यांची द्विखंडात्मक दीर्घकादंबरी प्रकाशित झाली आणि पुन्हा पेंडसेंचे नाव चर्चेत आले. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती. (१३५८ पाने)

एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या होत. कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या हयातीत अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि ‘रथचक्र’ ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’,‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके.

श्री. ना. पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह), साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊण्डेशनचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी पुरस्कार, लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही उल्लेखनीय पुरस्कार म्हणता येतील.

१९ मार्च २००७ ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि तीनच दिवसांनी २२ मार्च २००७ रोजी त्यांचे निधन झाले.

श्री.ना. पेंडसे यांनी लिहिलेली पुस्तके

 • असं झालं आणि उजाडलं (नाटक)
 • आकांत
 • एक होती आजी
 • एल्गार
 • कलंदर
 • कामेरू
 • खडकावरील हिरवळ
 • गारंबीचा बापू
 • घागर रिकामी रे
 • चक्रव्यूह
 • जुम्मन
 • तुंबाडचे खोत
 • पंडित ! आता तरी शहाणे व्हा
 • बेस्ट उपक्रमाची कथा
 • महापूर
 • यशोदा
 • रंगमाळी
 • रथचक्र (कादंबरी आणि नाटक)
 • राजेमास्तर (नाटक)
 • लव्हाळी
 • शोनार बांगला (नाटक)
 • श्री.ना. पेंडसे – लेखक आणि माणूस
 • संभूसाच्या चाळीत (नाटक)
 • हत्या
 • हद्दपार
 • हाक आभाळाची
 • डॉ. हुद्दार (नाटक)
Previous Article

रामचंद्र चितळकर अर्थात संगीतकार सी रामचंद्र

Next Article

५ जानेवारी 

You may also like