देशाच्या ७१व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले.
भगवद्गीतेचा संदर्भ देऊन, तुमच्या मनातील भावनेनुसार परिणाम बदलतो, मनुष्य ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तोच परिणाम त्याला दिसतो असे सांगून ते म्हणाले, आपल्या मनातील विश्वास पक्का असेल, देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या मनात विश्वास असला पाहिजे. बदल होतोय, बदल घडू शकतो यावर विश्वास हवा. स्वातंत्र्यपूर्व काळात, प्रत्येकजण देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात होता. त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठी, सामाजिक विकासासाठी आपण आपले कर्तव्य राष्ट्रभक्तीने पूर्ण केले तर फळ अधिक उजळून दिसेल.
ज्या तरुणांनी एकविसाव्या शतकात जन्म घेतला असेल, त्यांनी अठरा वर्षाचे झाल्यावर, देशाच्या विकासात भाग घेऊन, २१व्या शतकाचे भाग्यविधाता बनण्याचे आवाहन त्यांनी केले.
समुद्र किंवा जमिनीच्या सीमा, सायबर, अंतराळ या सर्व संरक्षणासाठी भारत सज्ज असल्याचे सांगून देशाचं विरुद्ध काहीही करू इच्छिणाऱ्यांवर कारवाई करण्यास आपण सक्षम आहोत.
देशात सध्या पारदर्शकतेचा उत्सव साजरा केला जात आहे, आणि बेईमान कुठेही लपू शकत नाही. ८०० कोटींची बेनामी संपत्ती सरकारने जप्त केली आहे, यामुळे सामान्य माणसांच्या मनात विश्वास निर्माण होतो कि इथे इमानदारीची कदर केली जाते.
वन रँक वन पेन्शन, जीएसटी, रस्ते-रेल्वे यांचे वाढते जाळे याचबरोबर१४००० गावांमध्ये वीज, २९ कोटी बँक अकाउंट, ९ कोटी सॉईल हेल्थ कार्ड, यामुळे गरीब मुख्य प्रवाहात येत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्यमवर्गीय माणसाला कमी व्याजदरात पैसे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम गव्हर्नस आणि सोप्पी शासन व्यवस्था यामुळे उद्योग आणि एकंदरीत निर्णय सुलभ आणि वेगवान होत आहेत.
दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत आता जगातील अनेक देश आपल्या बरोबर आले आहेत, त्यांचे आभार त्यांनी मानून, हे आंतरराष्ट्रीय संबंध नवीन आयाम घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतर्गत आतंकवादी शक्तीतील तरूणांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन आम्ही केले आहे.
‘ना गालीसे, ना गोलीसे परिवर्तन होगा गेले लगा करके‘ असे नमूद करून काश्मीरमधील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. भारतासाठी बलिदान दिलेल्या पदकप्राप्त सैनिकांची माहिती देणारे पोर्टल सरकार सुरु करीत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचप्रमाणे हजारो किलोमीटर राहणारा गावातील सामान्य व्यापारीसुद्धा GEM वेबपोर्टल द्वारा शासनाला लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करू शकतो. (www. gem.gov.in) यामुळे पारदर्शकता वाढली आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध आपले युद्ध कायम राहील असे सांगून, आधार लिंक करण्याचे त्यासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले. नोटबंदीनंतर ३ लक्ष कोटी रुपये बँकिंग यंत्रणेत आल्याचा दावा पंतप्रधांनांनी या वेळी केला त्यापैकी २ लक्ष कोटी काळे धन असण्याची शक्यता त्यांनी केली आणि त्यावर आता प्रश्न उपस्थित केले जातील असे त्यांनी सांगितले. नवीन काळे धन निर्माण होण्यावर सुद्धा त्याने नियंत्रण आल्याचे सांगून, १ एप्रिल ते ५ ऑगस्ट मध्ये वैयक्तिक आयकर रिटर्न्स भरणाऱ्या लोकांची संख्या मागील वर्षीच्या २२ लक्ष पासून ५६ लक्ष अशी दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. १८ लक्ष लोकांची संपत्ती त्यांच्या घोषित संपत्तीच्यापेक्षा अधिक असल्याचे सरकारच्या नजरेत आले असून त्यापैकी साडेचार लोक आपली चूक कबुल करून मुख्य प्रवाहात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नोटबंदीनंतर डेटा खोदकाम केल्यावर ३ लक्ष खोका कंपन्या (शेल कंपन्या) आम्हाला दिसल्या. एकाच पत्त्यावर ४०० कंपन्या चालत होत्या. त्यातील पावणे दोन लक्ष कंपन्यांची नोंदणी आम्ही रद्द केली आहे. जीएसटी नंतर कंपन्यांच्या पारदर्शकतेत वाढ होईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका जीएसटी मुळे वाहतूक व्यवस्थेचा ३०% वेळ वाचेल अर्थात त्याची एफीशीएन्सी ३०% ने वाढेल.
देशाच्या विकासात राज्य आणि मुख्यमंत्र्यांचे महत्व असते को-ऑपरेटिव्ह फेडरेलिझम आणि त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह को-ऑपरेटिव्ह फेडरेलिझम आता सुरु झाले असून आम्ही एकत्र मिळून काम करीत आहोत. राज्यातील जीएसटी, व्यापाराची सोप्पी पद्धती, स्वच्छता, शौचालय या सर्व विषयात सर्व राज्ये केंद्र शासनाच्या खांद्याला खांदा मिळवून चालत आहेत.
आम्ही लोकशाहीला केवळ मतदानापर्यंत मर्यादित केले आहे. म्हणून आम्ही न्यू इंडियात आम्हाला लोकांसाठी तंत्र निर्माण करायचे आहे. लोकमान्यांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले सुराज्य आपला अधिकार आणि कर्तव्य झाले पाहिजे ज्यात लोक स्वतःचे कर्तव्य पार पाडतील आणि सरकार स्वतःचे. शेतकऱ्यांनी डाळीचे उत्तम उत्पादन घेऊन ते त्यांचे कर्तव्य बजावीत असल्याचे दाखवून दिले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, १६ लक्ष टन डाळ खरेदी, शेतीला पाणी देण्याच्या योजना यासारख्या २०१९ पर्यंत ९९ विविध योजना आम्ही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आम्ही ठेवले आहे. शेतीतील होणाऱ्या अन्न शेतकऱ्यांना उत्तम पुरवठा यंत्रणा, पायाभूत सुविधा देणे आवश्यक असून, यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगात परकीय गुंतवणूक, प्रधानमंत्री किसान संप्रदाय योजनामध्ये बीपासून बाजारापर्यंत शेतकऱ्यांची मदत करण्याची योजना सरकार सुरु करत आहे.
रोजगारामध्ये २१व्या शतकाच्या आवश्यकतेप्रमाणे कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी मुद्रा योजनांद्वारे भांडवल उपलब्ध करून दिले आहे. २० विद्यापीठाना आम्ही जागतिक दर्जा मिळवण्यासाठी शासकीय बंधनातून मुक्त करून १००० कोटी भांडवल त्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आस्थेच्या नावाखाली काही शक्ती समाजाच्या शांती आणि एकभावनेच्या संस्कृतीला धोका निर्माण करीत आहेत. हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणे, सार्वजनिक वस्तूंची तोडफोड करणे हे अमान्य आहे. आज भारत जोडो चा नारा देऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन आपल्याला मजबूत भारत घडवायचा आहे.
समृद्ध भारत घडवण्यासाठी मजबूत अर्थव्यवस्था, संतुलित विकास आणि नेक्स्ट जनरेशन पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाचा वेग कमी होऊ न देता आम्ही देश नवीन ट्रॅकवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. पूर्व भारताचा विशेष उल्लेख केला, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा या ठिकाणी जिथे नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे आणि मेहनती माणसे आहेत, त्यांच्याकडे सरकारचे लक्ष आहे.
वक्त बदल चुका है, जगातील सर्वात अधिक तरुण भारतात आहे त्यामुळे आपल्यालाही जुने विचार टाकून द्यावे लागतील, डिजिटल इंडिया कडे वळावे लागेल असे आवाहन त्यांनी केले. कमी रोकड असणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे आपल्याला वळावे लागेल.
२०२२ पर्यंत आपण नवीन भारत (न्यू इंडिया) निर्माण करण्याचे काम आपण सर्वांनी एकत्र करायचे आहे, जो भारत भव्य दिव्या असेल, जिथे शेतकरी निश्चिन्त असेल, दुप्पट कमावेल, तरुण आणि महिलांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असतील , जो भ्रष्टाचार, जातीभेद यापासून मुक्त असेल, स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्यासाठी सव्वाशे कोटींची टीम इंडिया काम करेल असे आवाहन पंतप्रधांनानी केले.
आजचे त्यांचे भाषण सर्वात छोटेखानी होते. आज ते केवळ ५४ मिनिटे बोलले. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांचे पहिले भाषण ६५ मिनिटे, चालले होते. २०१५ मध्ये ८६ तर २०१६ मध्ये ९४ मिनिटे त्यांनी संवाद साधला होता. मन की बात मध्ये त्यांनी याचे सूतोवाच केले होते. स्वातंत्र्यदिनाच्या भाषण फार पंथे असते अशी तक्रार करणारी पत्रे आल्यावर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
- Tags: नरेंद्र मोदी