नारायण… नारायण…

Author: Share:

नारायण राणे भाजपात प्रवेश करण्याच्या वृत्ताने महाराष्ट्र राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. राणे हे शिवसेनेच्या संस्कृतीत मोठे झालेले नेते आहेत. ते बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते. राणेंच्या भूतकाळासह शिवसेनेने राणेंना स्वीकारले होते. राणेंचं राजकीय वर्चस्व वाढलं ते शिवसेनेमुळेच. उद्धव ठाकरेंची राजकारणात एंट्री झाली आणि त्यानंतर राणेंनी शिवसेना सोडली. राज ठाकरे आणि नारायण राणे हे दोन मोठे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरेंनी स्वतःची वेगळी चूल मांडली तर राणेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसच्या वर्तुळात राणे समाविष्ट होणे शक्य नव्हते. कारण कॉंग्रेसची आणि राणेंची कार्यपद्धती खुप वेगळी आहे. त्यात अनेक कॉंग्रेसी नेत्यांसोबत राणेंचे सूत जुळले नाही. आता राणे या महिन्याच्या अखेरीस भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. याबाबतीत मुख्यमंत्री फडणविस सुद्धा मौन धरुन आहेत. राणेंच्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांची नाराजी लपलेली नाही. मुंबई भाजप अध्यक्ष अशीष शेलार आणि रत्नागिरीचे बाळ माने यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने राणेंबद्दलची नाराजी स्पष्ट झाली आहे. कोकणातील भाजप कार्यकर्त्यांनाही राणे नको आहेत.

तर दुसरीकडे मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राणेंसाठी त्यांचं सार्वजनिक बांधकाम खातं सोडण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राणे भाजपमध्ये येण्याआधीच भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. भाजप श्रेष्ठी राणेंचा विचार करत आहेत याचा अर्थ ते मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहेत. तसे नसते तर राणे प्रवेश हा विषय लांबवला गेला असता. गुजरातमध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासोबत महाराष्ट्राची मध्यावधी निवडणूक ओटापून घेता येईल. राणे जर भाजपमध्ये आले तर निःसंशय भाजपची शक्ती वाढणार आहे. विशेषतः कोकणात भाजपला चांगल्या जागा मिळू शकतील. मराठा क्रांती मोर्चा दरम्यान राणे परिवाराला विशेष मान होता. म्हणून राणेंच्या रुपात मराठा मते आपळ्याकडे वळवण्याचा डाव भाजप आखत आहे. त्यात शिवसेनेने जरी मराठा मोर्चाला पाठींबा दिला असला तरी मराठा “मुका-मोर्चा”ची टिंगल विसरलेले नाहीत. बाळासाहेबांचे पोस्टर्स वगळता शिवसेनेचे पोस्टर्स ज्या प्रकारे मराठा तरुणांनी फाडून टाकले त्यावरुन मराठा तरुण कुणाच्या बाजूने कल देतील हे स्पष्ट नाही. म्हणूनच भाजप या तयारीला लागला आहे. मध्यावधी निवडणूकीची आठवण शिवसेनेकडून सतत करुन दिली जात आहे. भाजपचा सगळा डाव गुप्ततेत शिजत असताना व मध्यावधीबद्दल भाजप नेते काही बोलायला तयार नसताना, शिवसेनेकडून मात्र मध्यावधीची भाषा बोलली जात आहे. यावरौन शिवसेनाही मध्यावधीसाठी तयार असल्याचे दिसत आहे. पण सध्या भाजपची प्रसिद्धी शिगेला पोहोचली आहे.

नारायण राणे जर भाजपात आले तर तुर्तास तरी भाजपला फायदाच होईल. याआधी सुद्धा भाजपमध्ये अनेक लोक बाहेरुन आले आहेत. पण ते सर्व दुय्यम नेते होते. नारायण राणे हे शिवसेनेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राणे हे प्रमुख नेते आहेत. शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या राजकीर्य कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. पण जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ते कम-बॅक करु शकतात. राणेंची कोकणातील प्रसिद्धी आणि भाजपला मिळत असलेला मतदारांचा पाठींबा, हे राणे आणि भाजपसाठी फायदेशीर ठरेल. पण भाजपमधील अंतर्गत कलह यामुळे वाढू शकतो. कारण राणे हे लहान सहान पद घेऊन गप्प बसणारे नेते नाहीत. त्यांची सुप्त इच्छा पुनश्च मुख्यमंत्री होण्याची आहे. देवेंद्र फडणविस महाराष्ट्रात भाजपसाठी उजवे ठरले आहेत. आतापर्यंतच्या निवडणूकीत फडविसांच्या नेतृत्वाखाली भाजपला चांगले यश लाभले आहे. राणे यांना भाजपमध्ये घेतल्याने पक्षश्रेष्ठींचा फडणविसांवर पूर्ण विश्वास नाही असा संदेश भाजपच्या वर्तुळात जाऊ शकतो. त्यामुळे यापुढे फडविसांची खुर्ची धोक्यात येऊ शकते. जरी ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले तरी राणे मंत्रीमंडळात महत्वाची भूमिका बजावतील. पण त्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरच असेल.

आता जी काही चर्चा रंगत आहे की राणे आल्यामुळे भाजपचे वाटोळे होईल, तर असे काही होणार नाही. राणेंमुळे भाजपला बळ मिळेल. परंतु जुने जाणते कार्यकर्ते नाराज होऊ शकतात. त्यात भाजपकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही बदलेल. शिवसेनेचे सोशल सैनिक राणेंवर ब्रिगेडचा ठप्पा लावताना भाजपवर टीका करत असले तरी त्यांना राणेंच्या पार्श्वभूमीचा विसर पडलेला आहे. राणे हे आजही मनाने शिवसेनेच्या संस्कृतीतलेच आहेत. राणेंना शिवसेनेनेच मोठे केले आहे. त्यामुळे ते कसे आहेत? यावर टीका करण्याआधी, त्यांना असे कुणी बनवले याचा विचार सोशल सैनिकांनी करायला हवा. अर्थात तो विचार ते करणार नाहीत. म्हणूनच त्त्यांची टीका वायफळ ठरते. आता भाजप कार्यकर्तेही राणें विरोधात सोशल मिडीयावर सतर्क झाले आहेत. त्यांच्या टीकेचा विचार भाजप श्रेष्ठी करतील की नाही? यावर भाजपप्रेमींचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे लागलेले आहेत.

पण राणे भाजपमध्ये आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे नक्की बदलू शकतात. राणेंमुळे तुर्तास तरी भाजपला फायदा होत असला तरी भविष्यात राणेंना कसे हाताळायचे याचा विचार भाजपच्या श्रेष्ठींना करावा लागणार आहे. कारण राणे हे प्रचंड महत्वाकांक्षा असलेले नेते आहेत. आज भाजपच्या सर्व नेत्यांपेक्षा त्यांची महत्वाकांक्षा मोठी आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र भाजपमधील जुन्या नेत्यांवर नारायण… नारायण… म्हणण्याची पाळी येऊ शकते. असो.

Previous Article

नांदगाव महाविद्यालयात नेटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Article

आज पोळा 

You may also like