Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लालन सारंग

Author: Share:

मराठी रंगभूमीच्या इतिहासात ज्यांची नावे सन्मानाने घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग. आपल्या बंडखोर अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या लालन सारंग यांनी मराठी रंगभूमीवर माईलस्टोन समजल्या गेलेल्या नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने जान फुंकली. तेंडुलकरांच्या जळजळीत लेखणीला तितक्याच जळजळीतपणे रंगभूमीवर उभे केले.  त्यांच्या भूमिका ह्या सामाजिक संवेदना असणाऱ्या आणि सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या असायच्या.

माहेरच्या पैंगणकर असलेल्या त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ मध्ये गोवा येथे झाला. १९६८ मध्ये त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र, बेबी, तो मी नव्हेच, मी मंत्री झालो, लग्नाची बेडी, मोरूची मावशी अशा अनेक नाटकात त्यांनी कामे केली.  सामना, हा खेळ सावल्यांचा ह्या सिनेमातही त्यांनी काम केले आहे. ‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या त्यांच्या नाट्यसंस्था होत्या.  प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.२००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र, बेबी या नाटकातील त्यांच्या भूमिकांना रसिकांची आणि समीक्षकांची वाहवा मिळाली. त्या दोघी नाटकात त्यांनी रीमा लागू यांच्यासमवेत रंगमंच गाजवला. पुरुषी अहंकारापुढे स्त्रीचे स्वत्व आणि तिच्या भावनांचा कसा अपमान होतो. त्यामुळे तीची कशी घुसमट होते हे या नाटकात दाखविले आहे. सत्यदेव दुबेंच्या ‘स्टील फ्रेम’ या हिंदी नाटकातही त्यांनी काम केले. त्यातील प्रयोग पाहून (दोनदा) तेंडुलकरांनी त्यांना सखाराम बाईंडर करण्याविषयी सांगितले.

सखाराम बाईंडर मध्ये त्यांनी गावरान, रांगडी, बिनधास्त चंपाची अजरामर भूमिका केली. वादग्रस्त विषय आणि तेंडुलकरांची लेखणी यामुळे सखाराम बाईंडर बंडखोर नाटक होते. ह्या नाटकावर एकंदरीत प्रचंड टीका झाली. १३ प्रयोगानंतर सेंसॉरने ३३ कट सुचवले. न्यायालयात लढाई गेली आणि एकही कट शिवाय नाटक सुलाखून बाहेर पडले. त्यानंतरही अश्लील अश्लील म्हणून टीका सुरु होती. अखेर टीका सरून हे नाटक मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन ठरले. ह्यात मराठी रंगभूमीचाच सन्मान झाला.

त्यानंतर श्री ना पेंडसेंचे ‘रथचक्र’ नाटक आले. त्यात ‘ती’ ह्या दोन मुलांना हलाखीत सांभाळणाऱ्या कोकणातील एका आईची भूमिका त्यांनी केली. ही भूमिका करताना आपली आई आणि आपला मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर यायचे. त्यामुळे एका प्रयोगाला त्यांची मानसिक स्थिती बिघडली अशी आठवण त्यांनी लोकसत्ताला दिलेल्या एका लेखात नमूद केली आहे.

१९८१ साली बस्तर मधील स्त्री विक्रीचा बाजार दिल्लीतील एका पत्रकाराने शोधून पत्रकार परिषदेत त्याचा पुरावा म्हणून एक स्त्री खरेदी करूनच सादर केली. हा धागा पकडून तेंडुलकरांनी ‘कमला’ हे नाटक लिहिले आणि १४ दिवसात ते रंगमंचावर आले. यात पत्रकाराच्या पत्नीची सरिताची भूमिका लालन सारंग यांनी केली. आधी नवर्याच्या सुखदुःखात सर्वस्व मानणारी सरिता एका प्रसंगाने दुखावते आणि कमलाशी झालेल्या संवादानंतर तिला आपणही गुलामच आहोत असे वाटू लागते. स्त्री स्वातंत्र्यावर भाष्य करणारे हे नाटक. ‘कमला’ नाटकाचे जसजसे प्रयोग होत तसतशी सरिताची, नव्हे एकंदर भारतीय स्त्रीची व्यथा मला जाणवू लागली, टोचू लागली. कित्येक पुरुष प्रेक्षक नंतर भेटले तर म्हणायचे, ‘अहो! बायकोला तुमचं नाटक दाखवलं खरं, पण आता काही तिच्या मनाविरुद्ध झाले की म्हणते, मी काय तुमची कमला आहे?’ अशी आठवण सारंग सांगतात.

लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव’ हा पुरस्कार मिळाला होता. २०१५ पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार मिळाला. २०१७ अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

९ नोव्हेंबर २०१८ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.

लालन सारंग यांची गाजलेली नाटके

आक्रोश (वनिता)

आरोप (मोहिनी)

उद्याचा संसार

उंबरठ्यावर माप ठेविले

कमला (सरिता)

कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)

खोल खोल पाणी (चंद्राक्का)

गिधाडे (माणिक)

घरकुल

घरटे अमुचे छान (विमल)

चमकला ध्रुवाचा तारा

जंगली कबुतर

जोडीदार (शरयू)

तो मी नव्हेच

धंदेवाईक

बिबी करी सलाम

बेबी

बुवा तेथे बाया

मी मंत्री झालो

मोरूची मावशी

रथचक्र

राणीचा बाग

लग्नाची बेडी

सखाराम बाइंडर

संभूसांच्या चाळीत

सहज जिंकी मना

सूर्यास्त

स्टील फ्रेम

लालन सारंग यांनी लिहिलेली पुस्तके

जगले जशी

नाटकांमागील नाट्य

बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती

मी आणि माझ्या भूमिका

 

संदर्भ: 

  1. विकिपीडिया मराठी
  2. https://www.loksatta.com/chaturang-news/lalan-sarang-story-48099/ retrived on 9th November 2018
Previous Article

9 नोव्हेंबर

Next Article

Review: ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’: एक ‘लांडगा’ चित्रपट

You may also like