भाषेचे महत्व

Author: Share:

माझा मर्‍हाटा चि बोलु कवतिके

परि अमृतातें ही पैजेसीं जींके

ऐसीं अक्षरें चि रसिके

मेळवीन

या ओळी लिहिताना संत ज्ञानेश्वरांची भावना काय असेल? ज्ञानेश्वरांसारखे विज्ञानवादी लेखक ‘अमृत’ या अमरत्व देणाऱ्या काल्पनिक द्रव पदार्थाचा उल्लेख करतील असे मला वाटत नाही. अमृत हा शब्द त्यांनी अ-मृत, जो मेलेला नाही म्हणजेच जीवंत आहे तो प्रत्येक प्राणी या अर्थाने वापरला असावा, असे मला वाटते. मराठी ही प्रत्येक अ-मृत म्हणजे जीवंत प्राण्याला सहज समजेल, प्रत्येक प्राण्याला मराठी भाषेची गोडी वाटेल अशी भाषा आहे, हे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावे. संत कबीरांनी एका दोह्यात बांग देणाऱ्या मौलवीला विचारले होते की, देव जर मुंगीचाही आवाज ऐकतो, तर तू देवाला काही सांगण्यासाठी आरडाओरडा का करतोस? ज्ञानेश्वर आणि कबीर या दोघांनी मानव तसेच मानवेतर अशा सर्वच प्राण्यांना भाषा असते हे यातून सुचवलेले आढळते.

देश परदेशातील लोकसाहित्य, ललित साहित्य आणि मुख्यत: बालसाहित्यात प्राणी एकमेकांशी बोलतात. नीतीकथांमध्ये प्राणी एकमेकांशी तर बोलतातच, पण माणसांशीही बोलतात. या सर्व कथा माणसांनी लिहिलेल्या असून त्यात प्राण्यांच्या बोलण्याची कल्पना केलेली असते. काल्पनिक कथा बाजूला ठेवल्या तरी अनेक प्राणी, पक्षी, कीटक परस्पर संवादासाठी आवाजाचा आणि हालचाली, हावभावांचा प्रत्यक्षात वापर करतात, हे सहज  दिसते. प्रत्येक प्राण्याला स्वत:ची एक भाषा असते. प्राणी भाषा नुसती वापरत नाहीत, तर ती शिकतात देखील! आवाजाच्या, वासांच्या आधारे प्राणीजगतातील शिकारी आणि शिकार एकमेकांचा वेध घेतात. आवाजाचा, वासाचा योग्य अभ्यास असलेला प्राणी अधिक जगतो आणि हा अभ्यास अपुरा असलेला प्राणी कमी जगतो. वाघ जवळपास आल्याचा संदेश माकडे चित्कारून एकमेकांना देतात. जंगलाचे निरीक्षण करणाऱ्यांना असे असंख्य आवाजी संकेत माहीत असतात. माणसाने पाळलेले अनेक प्राणी आपल्या मालकाच्या बोली सूचना ऐकून त्या पाळतात. पाळीव कुत्री, मांजरे, गाई, म्हशी, बकऱ्या आपला राग, आनंद, भीती आवाजाद्वारे व्यक्त करतात. हे आवाज आणि शारीरिक हालचाली, हावभाव हे कायिक आणि वाचिक भाषेचे आविष्कारच आहेत.

कायिक भाषेचे एक मनोहारी, लक्षणीय उदाहरण आहे. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते असलेले पहिले मराठी लेखक वि. स. उपाख्य भाऊसाहेब खांडेकर त्यांच्या तरुण वयात शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या शाळेतील मुलांची सहल जवळच्या रम्य ठिकाणी नेली होती. मुलांसोबत भाऊसाहेब आणि इतर काही शिक्षक होते. मुले एका तलावाजवळ खेळताना नाईक हा मुलगा अचानक पाण्यात शिरला. त्याला पोहता येत नव्हते. तो बुडतोय असे दिसल्यावर स्वत:ला पोहता येत नाही हे विसरून खांडेकरांनी त्याला वाचविण्याच्या विचाराने कर्तव्यबुद्धीने पाण्यात उडी मारली. भीतीच्या भरात नाईकने खांडेकरांच्या गळ्याला घट्ट मिठी मारल्याने खांडेकरांना स्वत:चे हात पाय हलवता येईनात. एकाऐवजी दोघे बुडणार याची खात्री वाटून खांडेकरांनी मनात मरण्याची तयारी केली. चांगले पोहता येणारे इतर लोक पाण्यात उतरले आणि त्यांनी दोघांना वाचवले.

भाऊसाहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तेव्हा मधुमेहामुळे त्यांची नजर गेली होती. दृष्टीहीन अवस्थेतच  गावोगावी त्यांचे सत्कार होऊ लागले. सत्कार प्रसंगी लोक त्यांचा हात हाती घेऊन स्पर्शाच्या आधारेच संवाद साधत. मुंबईतील एका सत्कारानंतर अनेकांनी त्यांचा हात हातात घेऊन अभिनंदन केले. एका व्यक्तीने त्यांचा हात हातात घेताच ते म्हणाले, “अरे, तू नाईकच ना! आपण दोघे पाण्यात बुडत होतो तेव्हा आपल्याला इतरांनी वाचवले”. ती व्यक्ती म्हणजे तोच शाळेतील विद्यार्थी नाईक होता. अत्यंत संकटात असतानाचा स्पर्श माणूस रोजच्या धबडग्यात विसरला तरी त्याचे अंतर्मन तो स्पर्श आयुष्यभर विसरत नाही, हे यातून स्पष्ट होते. कायिक भाषेच्या अस्तित्वाचा हा अतिशय हृदयस्पर्शी पुरावा मानता येईल. एका कैद्याला भुकेल्या सिंहासमोर टाकले, तेव्हा सिंहाने त्याला इजा केली नाही, अशी ग्रीक कथा आहे. पूर्वी आपल्या पायातील काटा काढणाऱ्या केद्याला ओळखून सिंहाने त्याच्यावर हल्ला केला नाही. कायिक भाषेचे अस्तित्व सर्व प्राण्यांमध्ये आहे. माणूस वगळता इतर प्राणी तर कायिक भाषेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.

लेखक: अनिल गोरे पुणे.

सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन.

संपर्क  ९४२२००१६७१

ईमेल: marathikaka@gmail.com

 

Previous Article

विंदा जन्मशताब्दी विशेषसहीत १७ सप्टें.ला ‘चला, वाचू या’

Next Article

७५ वर्षांच्या आजी करतात फायटींग