“जंगल नाही, स्वर्गच जणू”: भीमाशंकर

Author: Share:

‘जंगल’ म्हंटलं की डोळ्यासमोर येत ते घनदाट,भीतिघालणारी गगनाला भिडलेली दाट झाडे आणि हिंसक प्राणी. पण मी बघितलेलं  जंगल म्हणजे “जंगल नाही, स्वर्गच जणू”

अध्यात्म आणि निसर्ग या दोघांचा संगम म्हणजे “भीमाशंकर अभयारण्य”. या अरण्यातील झाडे,पक्षी,प्राणी,कीटक या सर्वांना कैद करण्यासाठी निघालो होतो,

थांबा…. कैद म्हणजे कॅमेरा नावाच्या पिंजऱ्यात म्हणतोय मी,

मोहिमेची वेळ ठरली पहाटे चार वाजता पुण्यातून निघायचं, सोबत अमोल सर आणि निसर्गप्रेमी,गिर्यारोहक,सर्पमित्र,पक्षीमित्र,वन्यजीव फोटोग्राफर असे अनेक गूण संपन्न असलेला आदित्य.

भीमाशंकरला पोहचताच गंमत झाली कॅशलेसच्या जमान्यात आपण ATM मधून कॅश काढायचीच विसरलो हे तिथे पोहचल्यावर समजलं, मग कळलं की मंदिराच्या आवारात ATM आहे म्हणे, “नाही ओ चार दिवस झाले तेही बंद आहे” अस कुणीतरी म्हणाल, मग काय बघु गरज पडलीतर अगोदर मोहिमेला सुरवात करू काही वेळाने सुपे काकांची साथ मिळाली सुपे काका फॉरेस्ट मध्ये वनमजुर म्हणून काम करतात मग ठरलं अगोदर राष्ट्रीय प्राणी असलेला शेकरू याला टिपायच…फोटोमध्ये बघितलेला शेकरू नक्की खरोखर दिसतो कसा याचीच उत्कंटा लागलेली.

मग निघालो आम्ही चौघे जण जवळच असलेलं कोंढवळ या ठिकाणी….पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास केल्यावर सुपे काका अचानक ओरडले अरे ते बघ शेकरू…गाडी थांबव… कुठेय कुठेय… अरे ते काय झाडाच्या अगदी टोकावर…. अरे हो हो…घे पटकन कॅमेरा घे, लवकर करा….असा सर्वा घोंधळ उडाला आणि पहिल्यांदा शेकरू बघण्याचा आनंद अनुभवायला मिळाला….

मधेच अनेक नवीन पक्षी दिसायचे त्याची माहिती आदित्य राहून राहून देत असायचा, अजून बरच काही नवीन मिळणार होत पुढे गेलो पुन्हा शेकरू दिसलं पण त्याने आम्हाला बघताच क्षणी धूम ठोकली माणूस नावाच्या  क्रूर प्राण्याला भ्यायल कदाचित ते, त्याची वाट बघण्यात अर्धा-पाऊण तास गेला ते काही बाहेर आल नाही, सूर्य डोक्यावरून पश्चिमेला सरकला होता पोटात भुकेने काहूर केलं होतं मग जवळच असलेला वाड्याला पैसे काढण्यासाठी गेलो जाता जाता सुपे काकांना भोरगिरी फाट्यावर सोडलं, वाड्यात दाबून जेवण केलं जेवणाबद्दल हॉटेल मालकाच कौतुक करून पुन्हा भीमाशंकर कडे रवाना झालो जाता जाता वाटेत एक तळं बघून ड्रोन उडवायचा मोह अनावर झाला व गाडी थांबली, ड्रॉन ने आवकाशात झेप घेतली आणि हे बघून एक सत्तरीतले इसम कुतूहलाने आमच्या जवळ आले. बंडी-धोतर,हातात काठी आणि गळयात तुळशीची माळ सोबत दोन तीन गुरे. काकांनी उत्कंटतेने मला इमाईना (ड्रोन) बद्दल कही प्रश्न विचारली आणि मीही त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागलो, ‘इमाईन’ हे काकांनी ड्रॉन ला ठेवलेलं नाव. इथला खेळ अवरल्यावर आम्ही जायला निघालो तर काका म्हणाले ‘दादा काही खर्ची देऊन जा म्हाताऱ्याला” आगोदर नकार दिला मी आणि गाडीत बसलो पण पुन्हा उतरून काकांच्या हातावर दहा रुपये ठेवले, म्हणालो ‘चहा पिऊन घ्या काका” त्यावर काका पटकन म्हणाले “चहा नही दादा आता मस्त गावात जाऊन भजी खातो भजी…दाहारूपय पिलेट हाय” काकांच्या चेहेऱ्यावरचा तो सुखद आनंद सुद्धा एक वेगळा अनुभव देणारा होता, गाडी चालू झाली आणि पुढे निघालो वाटेत दत्ता भाऊला घ्यायचं होत दत्ता भाऊ म्हणजे मागच्यावेळी आम्हाला मिळालेला गाईड कमी मित्र, एक वेगळंच व्यक्तिमहत्व.

           भीमाशंकरला पोहचून  रेस्टहाउस वर राहण्याची सोय केली तेही अप्रतिम होत वरती डोंगरावर, आजूबाजूला फक्त जंगल,चारही बाजूला बघितलं तर थेट क्षितिजच…..

 आता रात्रीच जंगल बघायला निघायचं होत दत्ता भाऊ म्हंटला आपण भट्टीच्या जंगलात जाऊ तिथं आपल्याला बरच काही बघायला मिळेल. साधारण सायंकाळी सात वाजता आम्ही जंगलात जायला निघालो एका गावात गाडी लावून पाई चालत जायचं होतं रस्त्यात आदित्यला घुबड दिसलं, scops owl प्रजातीच ते घुबड होत,बराच वेळ ते आमच्याकडे अन आम्ही त्याकडे बघत बसलो त्यानंतर पुढे गेल्यावर, एका ठिकाणी गाडी लावून आम्ही पाई जंगलात जायला निघालो, पौर्णिमा नव्हती पण चंद्राने लक्ख उजेड दिलेला होता, चंद्राच्या निळ्या उजेडात झाडांची हिरवळ आणखी उठून दिसत होती. आजूबाजूला हवेचा, बेडकांचा आणि किडकांचा आवाज जंगलात आलोय याची जाणीव करून देत होता.  मधेच रंग बदलणारा सरडा,Raorchestis प्रजातीच बेडूक, मण्यार (Common Krait ) व Vine snake अशी बरीच मंडळी भेटली पण ज्या गोष्टीची अपेक्षा होती सांबर, बिबट, भेकर ही काही अजून दर्शन देत नव्हती मग साधारण चार पाच किलोमीटर चालल्यानंतर एका ठिकाणी ‘Raorchestis’ प्रजातीच बेडूक आदित्यला दिसलं जवळ जाऊन बघितलं तर गळ्याजवळ मोठा फुगा फुगवून जिवाच्या आकांताने ते डराव डराव आवाज करत होत, बोटाच्या नाखाइतकं ते बेडूक एवढा मोठा आवाज करू शकतं? आणि एवढासा जीव का बरं इतकं काहूर माजवत असेल? असाच राहून राहून मला प्रश्न पडायचा, त्याचे फुटेज घेण्यात आम्ही मग्न झालो , अचानक अमोल सरांना एक आवाज आला, “एक मिनिट हा आवाज कसला येतोय” सर्वांचं त्या आवाजकडे  लक्ष गेलं कुठलतरी जनावर मोठ्याने श्वास घेत असावं,कुठलं जनावर असेल?, काही क्षण सगळेच शांत झाले,मनाला धसकी भरवणारा तो आवाज होता….मग कळलं जवळच एक कोपी होती त्यात काही गुरे बांधली होती त्यांच्या श्वासाचा तो आवाज होता, छे… क्षणातच त्या भीतीची मजा निघून गेली, पण इतक्या खोल जंगलात कोणीबर ही खोपडी बांधली असावी आणि त्यात गुरे!! असो, आता बरच पुढे आलोय हे लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व माघारी फिरलो, पाय तिथून निघत नव्हते पण वेळ ऐकत नव्हती, वाटेत एका झाडावर आदित्यला हरणटोळ प्रजातीचा साप दिसला गर्द हिरव्या रंगाच, टोकदार नाक असलेला हरणटोळ मोठ्या दिमाखात झाडाच्या फांदीवर बसलेला होता, आदित्यने त्याला अलगत आपल्या हातावर घेऊन त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला दिली आणि परत त्याला त्याच्या जागेवर ठेवलं त्याला शुभरात्री कारन आम्ही गाडी जवळ आलो आणि थेट रेस्ट हाउस ला येऊन जे काही पडलो ते सकाळी सूर्य दर्शनालाच उठलो…

        सकाळी आदित्य सहज ऊन गिळायला म्हणून बाहेर गेला आणि बघतो तर काय ज्याच्यासाठी आम्ही रात्रभर फिरलो ते भेकर अंगणात खेळत होत आदित्य धावतच धापा टाकत आत आला आणि कॅमेरा घेऊन बाहेर जातो तेवढयात ते तेथुन निघून गेलेलं होत. आदित्यने त्याला कॅमेरात नाही पण नजरेत टिपलं होत,  आता ठरल्याप्रमाणे गुप्त भीमाला निघायचं होत, आमच्या आधी दत्ताभाऊं तयार होऊन बससेलेला, गुप्त भीमाला जात असताना वाटेत घनदाट जंगल आणि त्या जंगलातून एक छोटीशी पाऊलवाट, त्या वाटेवरच आम्हाला पुन्हा शेकरू दिसलं पण ह्या वेळी मात्र ते अगदी जवळच होत, मनसोक्त फुटेज घेतल्यानंत पुढे चालू लागलो, काही वेळाने आम्हला चकवा बसला…पण दत्ता भाऊने वाट शोधून परत ठिकान्यावर पोहचवल, गुप्तभीमा म्हणजे एक छोटीशी पिंड आणि त्या पिंडीवर वाहत्या झऱ्याच पाणी पडत होत हे निसर्गाचं देखणं रूप बघण्यालायक होत…तिथून परत येऊन आम्ही मंदिराकडे गेलो तिथलेही काही फुटेज घेतले ,मग अभयारण्याच शेवटचं टोक असलेलं नागफणीला जायचं ठरलं, नागफणीला जाण्यासाठी हनुमान तळ्या जवळ गाडी लावून वर चढून जावं लागणार होतं हनुमानतळ्या पर्यन्त आम्ही गाडी पोहचवली, होय पोहचवली कारण पाई चांल्यासाठी सुद्धा कठीण रास्ता आम्ही आमच्या कारणे पार केला, तिथे गेल्यावर कळलं की आपल्याला खूपच उशीर झालाय सूर्य मावळतीला निघाला होता, मग काय हनुमान तळ्याजवळच काही काळ घालवून परतीचा मार्ग आखू लागलो, पण दत्ता भाऊने हट्ट धरला “साहेब आता आपल्या घरी जेवायला जाऊ, जेवण केल्या शिवाय जाऊच देणार नाही” खरंतर दत्ताभाऊंची परिस्थिती बघून त्यांच्याकडे जेवायला जाणे अयोग्यच वाटत होतं पण त्याने मोठ्यामनाने हट्ट धरलेला मग हो-नाही करत आम्ही गाडीत बसलो पुढे गेल्यावर मीच दत्ताभाऊला म्हंटलं “दत्ताभाऊं खेकडी खाऊ घालाल का?” “अहो साहेब प्रश्नय का? तुम्ही चला माझी बायको खेकडाच लै भारी कालवण बनवते” मग आम्ही तिघांनी एकमेकांडे बघून सगळ्यांचा होकार घेतला आणि निघालो, वाटेत दत्ताभाऊने खेडकी सापडायला गाडी थांबवली, गाडी थांबवताच एक खेकड दिसलं दत्ताभाऊने पटकन त्याला पकडून त्याच्या नांगी मध्ये काडकी अडकवून माझ्या हातात ठेवून दुसरं पकडायला निघून गेला, खेकडी कधीच जवळून न बघितलेला मी अचानक हातात खेकडा..!!

जाम वाट लागलेली… आदित्यने पटकन गाडीतून बाटली काढली आणि तिला मधोमध चिरून त्यात हा खेकडा सोडला गाडीजवळ जतोतर काय आम्हाला सुद्धा एक मोठा खेकडा मिळाला पण आता तो पकडायचा कोणी, काही क्षणापूर्वी हातात खेकडा पकडलेला असल्याने मला जरा कॉन्फिडन्स आला होता मग मी पटकन त्याला पकडून बाटलीत सोडलं, नंतर दत्ता भाऊं एक नाही दोन नाही तर तबल बाबा पाच ते सहा खेकडी घेवून आमच्या कडे आला मग काय आज तर खरोखर मेजवानीच होती, तिथून दत्ताभच्या घरी पोहचलो, शेतात घर होत आजूबाजूला कुठलीच वस्ती नाही, एखाद्या रिसॉर्ट ला सुद्धा लाजवेल असं लोकेशन, आम्ही बाहेर वरहंड्यात बसलो… दोन मुले आणि एक बायको अस दत्ताभाऊच छोटस कुटुंब त्यात त्याची तीन वर्षांनी गोंडस मुलगी तिने तर चांगलीच करमूनक केली आमची तीला नाव विचारल्यावर तिने पटकन सांगितलं “अमलुता दातातले मेचकल” (अमृता दत्तात्रय मेचकर) तीच गमतीदार नाव आणि आवाज ऐकून आम्ही तिला सारख सारख नाव विचारायचो आणि तीही हाताची घडी घालून नाव सांगायची, मग दत्ताभाऊने त्याच्या हाताने चहा बनवून आणला त्याच्या चहाची चव आम्ही गेल्यावेळी त्याच्याच हॉटेलवर घतलेली हॉटेल म्हणजे एक कागदाची टपरी होती पण कोणीतरी कागद चोरून नेल्यामुळे तेही बंद केलेलं होत. परिस्थिती ने गरीब असलेला दत्ताभाऊं मनाने खूप श्रीमंत होता पाहुनचाराची कुठलीच उणीव त्याने ठेवलेली नव्हती काहीवेळाने जेवण सुद्धा आलं, रोस्टेड क्रॅब आणि ग्रेव्ही…

खेकडा कसा खावा हे सुद्धा आम्हा अडाणी लोकांना माहीत नव्हतं, पण त्या जेवणाच कौतुक कराव तितकं कमीच,

खरतर दिवासभरचा थकवा क्षणात नाहीसा झाला होता मनसोक्त जेवण केल्यानंतर आम्ही जरावेळ बसलो तोपर्यंत दत्ताभाऊने आमच्या तिघांसाठी तांदळाची शिदोरी बांधून ठेवली होती, त्याच्याकडे भाताची शेती होती, शिदोरीला नाही म्हणून उपयोग नव्हता करण ऐकेल तो दत्ताभाऊं कसला.   आता प्रवासाला पूर्णविराम लागणार होता, या दोन दिवसांच्या अविस्मरणीय आठवणींना मनाच्या गाठोड्यात बांधून परतीच्या मार्गाला लागलो…काही काळ गाडीत शांतता होती, दोन दिवसात घडलेल्या गोष्टी मनातल्या मनात उकरत असावे सर्वजण……

– अक्षय अंबादास गमे

Previous Article

आता “हेराम” करण्याशिवाय पर्याय नाही !: डॉ. शांताराम कारंडे

Next Article

१८ नोव्हेंबर