यशवंतराव चव्हाण

Author: Share:

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च  १९१३ मध्ये सांगली जिल्ह्यातील (तत्कालीन दक्षिण सातारा) देवराष्ट्रे मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. द्विभाषिक राज्याचे आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रात संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधान ही महत्वाची पदे त्यांनी भूषविली. महाराष्ट्रातील लोकप्रिय नेत्यातील मानाचे स्थान त्यांचे आहे. राजकारणातील उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व आणि उत्तम संसदपटू म्हणून ते लोकप्रिय आहेत.

लहानपणी त्यांना पितृशोक झाला. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आई आणि काकांनी केले.  १९३८ मध्ये मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्रातून बीए केले आणि १९४० मध्ये एलएलबी झाले. याच काळात ते स्वातंत्र्यसंग्रामाकडे आकर्षित झाले आणि काँग्रेस पार्टी, आणि जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि केशवराव जेधे या नेत्यांशी संपर्कात आले. १९४० मध्ये ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

१९३० मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वातील असहयोग आंदोलनात त्यांना शिक्षा झाली. २६ जानेवारी १९३२ ला साताऱ्यात भारतीय ध्वज फडकवण्यासाठी त्यांना १८ महिन्याची शिक्षा झाली.  १९४० च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांना तुरुंगवास झाला.  १९४६ मध्ये दक्षिण सातारा मतदारसंघातून ते पहिल्यांदा निवडून आले. त्याच वर्षी मुंबई प्रांताच्या गृहमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून यत्तांची नियुक्ती झाली. मोरारजी देसाईंच्या आगामी सरकारात समाज कल्याण आणि वन मंत्री म्हणून ते नियुक्त झाले. १९५३ मध्ये महाराष्ट्र विकासासंबंधीच्या नागपूर करारावर त्यांचीही स्वाक्षरी आहे.

सह्याद्री हिमालयाच्या मदतीला

केंद्रातही त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. गृह, संरक्षण, वित्त, परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी पदे भूषविली. ते भारतचे पाचवे उपपंतप्रधानसुद्धा राहिलेले आहेत.  १९६२ मध्ये भारत चीन प्रश्न चिघळला तेंव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विनंतीवरून त्यांनी केंद्रात संरक्षणपद स्वीकारले. ह्याचे वर्णन आजही महाराष्ट्रात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे अभिमानाने केले जाते. १९६५ च्या पाकिस्तान युद्धावेळेस तेच संरक्षण मंत्री होते.  २६ जुन १९७० ला भारताचे अर्थमंत्री आणि ११ ऑकटोबर १९७४ ला परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. १९७७ मध्ये काँग्रेस निवडणूक हरली तेव्हा ते विरोधी पक्ष नेता बनले. पुढे चरण सिंग मंत्रिमंडळात त्यांनी गृहमंत्री आणि उपपंतप्रधानपद सांभाळले.

१९७८ मध्ये काँग्रेस पासून विभक्त होऊन ते काँग्रेस यु मध्ये गेले, मात्र नंतर त्यातही फाटाफूट झाली. १९८० मध्ये इंदिरा काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. १९८१ मध्ये यशवंतरावांनी इंदिरा काँग्रेस मध्ये पुनर्प्रवेश केला आणि १९८२ मद्ये भारताच्या आठव्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष झाले.

२५ नोव्हेंबर १९८४ ला महाराष्ट्राच्या या महान नेत्याचे देहावसान झाले.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्याने महाराष्ट्राच्या नवनिर्मितीत फार मोलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. नवीन महाराष्ट्राच्या धोरणांची रचना करण्यापासून त्याला आकार देण्यापर्यंत त्यांनी रचनात्मक कार्य केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यामुळेच महाराष्ट्रावर परिणाम झालेला आहे. राजकारणात पूर्णतः बुडून गेले असले तरी त्यांचे मन कला आणि साहित्याचे रसिकही होते. या रसिकतेतूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावरील विविध संस्थांना त्यांनी जन्म दिला.

पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शेती, उद्योग, सहकार, समाजवादीरचना, आर्थिक समानता, नियोजन या विषयात त्यांचे विचार कृतीत उतरले. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले.

शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकास यावर अधिक भर दिला. जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा, ह्या विचारातून कुळांचे अधिकार त्यांनी जोपासले. समाजवादाची दीक्षा मिळालेल्या यशवंतरावांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. अविकसित जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी नद्यांवर धरणे बांधण्याचा प्रोत्साहन दिले.

यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा विचार त्यांनी केला. ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन दिले. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली.

यशवंतराव चव्हाणांनी सुरु केलेल्या योजना

 • पंचायतराज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. महाराष्ट्र पंचायतराज स्वीकारणारे तिसरे राज्य आहे.
 • राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ
 • कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती
 • सहकार तत्वावर १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना
 • मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना.
 • मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. म्हणूनच मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तर्कतीर्थ लक्ष्मणराव जोशी यांनी घेतली.

यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा

 • आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
 • ॠणानुबंध (ललित लेख) (१९७५)
 • कृष्णाकाठ (आत्मचरित्र)
 • भूमिका (१९७९)
 • विदेश दर्शन
 • सह्याद्रीचे वारे (१९६२) ‌- भाषण संग्रह
 • युगांतर (१९७०) स्‍वातंत्र्यपूर्व व स्‍वातंत्र्योत्‍तर हिंदुस्‍थानच्‍या प्रश्‍नांची चर्चा
 • India’s foreign Policy – १९७८
 • उद्याचा महाराष्ट्र – (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
 • काँग्रेसच्या मागेच उभे राहा – औरंगाबाद येथील भाषण – पुस्तिका
 • कोकण विकासाची दिशा
 • ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान
 • जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका – १९७३)
 • पत्र – संवाद (संपादक: स.मा.गर्गे – २००२)
 • पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
 • महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका – १९६०)
 • महाराष्ट्राची धोरण सूची – (पुस्तिका – १९६०)
 • यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे – सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ – १९७१
 • The Making of India’s Foreign Policy – १९८०
 • युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह – १९७०)
 • लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
 • वचनपूर्तीचे राजकारण – अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका – १९६९))
 • विचारधारा – (भाषण संग्रह – १९६०)
 • Winds of Change – १९७३
 • विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) – (भाषण पुस्तिका – १९६०)
 • विदेश-दर्शन (परदेशांतून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह, संपादक – रामभाऊ जोशी, २०१७)
 • शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे – २०००; संपादक: राम प्रधान)
 • शिवनेरीच्या नौबती (भाषण संग्रह) – तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक – पुणे, व्हीनस बुक स्टॉल – १९६१
 • सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह – १९६२)
 • हवाएँ सह्याद्रि की (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)

महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची हा झब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट मार्च २०१४ मध्ये बनवला.

यशवंतराव चव्हाण यांच्या नावाच्या संस्था

 • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
 • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
 • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
 • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
 • यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
 • यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे

______________________________________________________________________________

संदर्भ: मराठी विकिपीडिया

Photo courtesy: www.ybchavan.in

Previous Article

२६ नोव्हेंबर

Next Article

चिकन – मोटली

You may also like