यशवंतराव चव्हाण

Author: Share:

जन्मदिन १२ मार्च १९१४

स्मृतिदिन: २५ नोव्हेंबर १९८४

यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नंतर दिल्लीत त्यांनी भारताचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री ही महत्वाची खाती सुद्धा भूषवली. मराठी माणसाने दिल्लीत महत्वाची खाती सांभाळणे मराठी माणसासाठी भूषणावह राहिले आहे.महाराष्ट्राच्या सहकार , शेती, ग्रामजीवन उद्योग आणि सांस्कृतिक विकासातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आदराचे स्थान आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१४ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र्राच्या आधुनिक जडणघडणीसाठी अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. प्रगतिशील विचारसरणीचे अभ्यासू आणि सर्व क्षेत्रात रस घेणारे यशवंतराव म्हणूनच महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. ९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधानपंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. सह्याद्री हिमालयाचं मदतीला धावून गेला अशा शब्दांत या घटनेचा आदरपूर्वक उल्लेख आजही मराठी माणूस करतो . पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

यशवंतराव चव्हाण हे त्यांचे ग्रामीण आणि शेतीचे अर्थशास्त्र आणि त्यासाठी सहकार तत्वाचा वापर यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे असे त्यांचे मत होते,   यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. जमीन कसणारा शेतकरी शेतजमिनीचा मालक असावा असे त्यांचे विचार होते. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. अनुत्पादक व पडीक जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे, शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे, शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत, नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत आणि धरणासाठी विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजेही  त्यांची मते शेतीविषयक धोरणांसाठी महत्वाची मानली आहेत.

ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी, शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल असे मत त्यांनी मांडले.

नियोजनबद्ध विकासावर त्यांचा जोर होता आणि देशाचा संतुलित आर्थिक विकास औद्योगिक विकासावर अवलंबून आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला. याही पुढे जाऊन अविकसित भागाच्या विकासासाठी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांनी अनेक योजनांद्वारे महाराष्ट्राच्या आधुनिक जडणघडणीचा पाया रचला. यामध्ये ‘पंचायत राज’ त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात, राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ, कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती, सहकारी साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाडा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आणि कोल्हापूर विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना, मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना या महाराष्ट्राच्या जीवनात महत्वाचे पाऊल ठरलेल्या घटनांचा प्रकर्षाने समावेश करावा लागेल.

त्यांच्यातल्या साहित्यिकाचे दर्शनही आपल्याला त्यांच्या पुस्तकातून मिळते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. मराठी विश्व्कोषाची रचना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनीच केली आहे.

 

संदर्भ : मराठी विकिपीडिया

Previous Article

दातांची निगा कशी राखावी?

Next Article

१२ मार्च 

You may also like