अतिशय बळकट पण दुर्लक्षित असा ”किल्ले यशवंतगड”

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


सागर किनार्‍याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका आहे. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी नावाचे गाव आहे. हे रेडीगाव येथिल गणपतीच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. तसाच येथे असलेल्या मॅगेनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे.रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्यावर असलेला वेशिष्ठपूर्ण अशा यशवंतगडाची दुदैवाने कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे पाय यशवंतगडाकडे वळतच नाहीत.
यशवंतगडावर जाण्याचा मनसुबा अनेक दिवस मनात होता. दरवर्षी मामाच्या गावी जातो. पण तिथूनच जवळ असणा-या या गडावर जाता येत नाही याची खंत होती. यावेळी रेडीच्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने का होईना यशवंतगड पाहायला मिळाला ;-).

त्यासाठी मी आणि माझा मामेभाऊ असे दोघेजण सकाळी सव्वा सातची एसटी पकडून शिरोडा येथे आलो. शिरोड्यापासून नऊ किमीवर रेडी गाव आहे. याच गावात स्वयंभू द्विभूज गणेशाचे प्रसिद्ध मंदीर आहे. रेडीला जाण्यासाठी वेंगुर्ला शिरोडा तसेच सावंतवाडीतून एसटी रिक्षा वगैरे गाड्या मिळतात.

रेडीगावातून दहा ते पंधरा मिनीटात यशवंतगडावर जाता येते . रेडीच्या खाडीच्या किनार्यालाच लागून असलेल्या लहानशा टेकडावर यशवंतगड बांधलेला आहे. समुद्रसपाटापासून ५० मीटरची साधारण उंची आहे. गावातल्या नारळीपोफळीच्या जागा आणि त्यात असलेली कोकणी पध्दतीची वैशिष्ठपूर्ण घरे ओलांडून आपण यशवंतगडाजवळ पोहोचतो. येथून एक वाट खाली पुळणीकडे जाते. उजव्या हाताला जाणारी पायवाट झाडीत शिरते. या झाडीत शिरल्यावर दोन मिनिटांमधे आपण एका बुरुजाजवळ पोहोचतो. बुरुजाला वळसा घातल्यावर गडाचे प्रवेशव्दार नजरेत भरते. हे कमानयुक्त प्रवेशव्दार आहे. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडामधे केलेले असल्यामुळे प्रवेशव्दारही जांभ्यादगडामधे बांधलेले आहे.

इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. इ.स. १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला त्याच सुमारास हा यशवंतगड विजापूरच्या आदिलशाहाकडून जिंकून ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण केले व त्यास यशवंतगड हे नावही छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सावंतवाडकर फोंड सावंतांनी बळकावला इ.स. १८८९ मध्ये इंग्रजांनी फोंडसावंतांकडून यशवंतगड बळकावला. छत्रपती शिवाजी महाराज, सावंतवाडकर राजे खेमसावंत, इंग्रज, पोर्तुगीज यांच्यामध्ये यशवंतगडावर अनेक लढाया झालेल्या आहेत.

६ मार्च १७६५ रोजी सावंतवाडकर सरदाराच्या चाचेपणामुळे इंग्रज व्यापार्‍यांना होणार्‍या त्रासाचा बीमोड करण्यासाठी इंग्रज आरमारी अधिकारी मेजर गोर्डन आणि कॅप्टन वॉटसन यांनी सावंतवाडकर खेम सावंत यांच्या अधिपत्याखाली असलेल्या यशवंतगडाला वेढा घातला व गड जिंकून घेतला. सावंतवाडकरांनी तह करुन पुन्हा यशवंतगडाचा ताबा मिळविला..

प्रवेशव्दारामधून आत गेल्यावर पहारेकर्याच्या रहाण्याच्या जागांचे अवशेष दिसतात. गडाच्या आत बाहेर मोठय़ाप्रमाणावर झाडी झुडपे वाढलेली असल्यामुळे आतिल सर्व भाग झोकाळून गेलेला आहे. या प्रवेशव्दाराच्या आत शिरल्यावर डावीकडे बालेकिल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. ही पायवाट जाभ्यांदगडात बांधून काढलेली आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेर बुजत चाललेला खंदकही दिसतो. येथेहीएक प्रवेशव्दार आहे. त्याला काही पायर्याही आहेत. येथूनआत शिरल्यावर डावीकडे भक्कम बांधणीचा दरवाजा आहे. हा दरवाजा वैशिष्ठपूर्ण आहे. दरवाजा बंद असल्यास बाजूला दिंडी दरवाजा केलेला आहे. हा वळणदार मार्ग दरवाजाच्या आत निघतो.अशा प्रकारच्या रचना महाराष्ट्रामधे दुर्मीळ आहे. कर्नाटकातील पारसगडाला अशा प्रकारची रचना केलेली आढळते. दरवाजाच्या आत पहारेकर्यांसाठी असलेली जागा आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून सरंक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे.

येथे समोरच दोन गोलाकार बुरुजांच्या मधे बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा आहे. गोलाकार बुरुजांमुळे त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवडय़ा असून पुढील मार्ग कातळ कोरुन तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसर्या आणि तिसर्या दरवाजाच्या मधील जागेत बंदिस्त चौक आहे. या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे.

बालेकिल्ल्याच्या तिसर्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डावीकडे मोठी इमारत आहे. सरळ जाणारी वाट तटबंदी कडे जाते. या तटबंदीवरून फिरताना अरबी समुद्र आणि रेडीची खाडी यांच्या संगमाचे विहंगमय दृश्य दिसते. या तटबंदीवरुन फेरी मारताना काही ठिकाणी पंचविस ते तीस फुट उंचीची तटबंदी आहे. शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या केलेल्या दिसतात तसेच मजबूत बुरुजही दिसतात. तटबंदीवर वाढलेल्या झाडीमुळे मात्र त्यांची पार रया गेलेली आहे.

मधल्या भागामधे भव्य वाडा त्याच्या काही भिंतीसकट उभा असलेला दिसतो. त्याचे दरवाजे, तुळ्या कालौघात नामशेष झालेले असले तरी वाडय़ाची भव्यता लक्षवेधक आहे. गड उतरून आपण पुन्हा प्रवेशद्वाराजवळ येतो. तेथूनच पुढे झाडीत एक पायवाट जाते. एक दोन चालल्यानंतर आपल्याला एक छोटी विहीर पाहायला मिळते. या विहीरीला स्थानिक लोक ‘घोड्याची विहीर ‘ म्हणतात. इथूनच जरा पुढे चालत गेल्यानंतर एका चौकोनी घुमटीत श्रीगणेशाची कोरीव पण दुर्लक्षित मूर्ती पाहायला मिळते.

अशा या किल्ल्याच्या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक आठवणी स्मरणात ठेवीतच आपण पुन्हा परतीच्या प्रवासासाठी माघारी निघतो

लेखक : अमीत म्हाडेश्वर


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


 

Previous Article

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा..

Next Article

शिवछत्रपती, रमझान, शास्ताखान आणि शस्त्रसंधी

You may also like