पर्यावरणाला ‘अभय’ कधी मिळणार?

Author: Share:

विकास आणि पर्यावरण यांची लढाई जुनी आहे. आणि त्यात विकासाचा बऱ्याचदा विजय होतो. मात्र तो त्या राष्ट्राच्या आणि समाजाच्या भविष्याचा पराभव असतो. शाश्वत विकास ही संकल्पना फक्त शालेय आणि कॉलेज पुस्तकांमध्ये वाचण्यासाठी आणि चर्चासत्रांमध्ये चघळण्यासाठीच आपण ठेवणार आहोत का? विकासाच्या नावाने पर्यावरणाचा बळी देणे आपल्याला प्रचंड महाग पडणार आहे.

न्या. ओकांच्या विरुद्ध पक्षपातीपणाचा आरोप लावून राज्य सरकारने त्यांच्याकडील प्रदूषणविषयक याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे वळवण्याची मागणी केली. मुख्य न्यायमूर्तींनी ती मेनी केली पण , चहूबाजूंनी त्यावर टीका झाली. म्हणाल तर ह्या सर्वातून एक चांगलेच झाले. शासनाच्या आततायी अन्यायी मागणीविरुद्ध समाज एकत्र येतो हे समाजालाही कळले आणि शासनालाही! न्यायालयाचा विमान केल्याप्रकरणी आता त्याच अभय ओकांनी राज्य शासनाला माफीनामा सादर करावयास सांगितले आहे. हे सुद्धा चांगलेच झाले आहे. संविधानाने शासन आणि न्यायव्यवस्था वेगवेगळ्या ठेवण्यासाठी न्यायव्यवस्थेतील शासनाचा हस्तक्षेप टाळला आहे. राज्य शासनाने या प्रकरणी नेमके तेच करण्याचा प्रयत्न केला. हे दुर्दैवी आहे.  असो, मात्र यावरून विकास विरुद्ध पर्यावरण हा कळीचा मुद्दा पुन्हा एकदा रडार वर घ्यावासा वाटला आहे.

एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, निसर्गाकडे सर्वांची गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे, पण तुमची हाव भागवण्याइतके नाही.

निसर्गातील घटक, पर्वत-डोंगरांपासून जंगलांपर्यंत आणि पाण्याच्या  स्रोतांपासून ते प्राण्यांपर्यंत- आणि त्यांची संपूर्ण अन्नसाखळी, कार्बन सायकल, सर्व- सृष्टीच्या नियमनासाठी अत्यंत आवश्यक आहे. विकासाची भाषा कारण्यारांना कदाचित हे जुनाट वाटेल. पण आपण एक लक्षात ठेवले पाहिजे, हे सर्व आपल्यापेक्षा जुने आहे. आपण मानव फक्त याचा एक हिस्सा आहोत आणि निसर्ग चहातून माशी दूर करावी तसा आपल्याला दूर फेकून देऊ शकतो. अजस्त्र डायनॉसॉरस निसर्गाने संपवले, प्रजाती आल्या -गेल्या तर मनुष्य काय चीज आहे?

अधिक लोकसंख्येला अधिक घरे हवीत म्हणून डोंगर फोडले जातात, वाळू-तेलाचा अनिर्बंध उपसा होतो, मेट्रो आणि इतर वाहनांसाठी, घरांसाठी झाडे तोडली जातात, हे सर्व कुणाला विचारून? जे बेकायदेशीर आहे ते तर अनिच्छेचे आहेच, पण निसर्गाचा एखादा घटक तोडण्याचा आदेश देणारे आपण कोण? आपली काय लायकी आहे निसर्गात ढवळाढवळ करण्याची हा प्रश्न आपण स्वतः विचारला पाहिजे.

मग समुद्रावर भराव टाकला जातोय, जंगले तोडली जातायत, अविचारी अंतिबंध बांधकामे चालू आहेत या सर्वाला परवानगी कशी मिळते?  विकासाचं नावाखाली, मग तो कितीही योग्य आणि आवश्यक वाटला तरी, निसर्गाच्या कालचक्रात बदल करणारे आपण कोण?

आपले पूर्वज निसर्गाच्या कुशीत राहिले आणि मोठे झाले. अगदी मागचं तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही हे सर्व करत नव्हतो. आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गाचा आदर ठेऊनच आपण वागायचे आहे, हे साधे ‘संस्कार’ आपण आज का विसरलो? ऋग्वेदाने निसर्ग प्रथम मानला आहे. आज वेद प्रमाण मानणारे ऋग्वेदाच्या विरुद्ध का वागतोय? औद्योगिक क्रांतीने एवढी काय तीन शिंगे दिली आहेत आपल्याला कि माणूस स्वतःला निसर्गाच्या वरचढ समजू लागला आहे?

चीनमध्ये नकली दूध , भाज्या, मासे बनवणारे व्हिडीओ व्हायरल होतात. यापासून स्वतःचे रक्षण करा असा मेसेज त्यात असतो, पण आपण दैनंदिन आयुष्यात जे वागतो त्यापासून आपले रक्षण कोण करणार? निसर्गाचे सोडून द्या, तो स्वतःला पुन्हा निर्माण करू शकतो, माणूस स्वतःहून स्वतःला निर्माण करू शकत नाही.

आणि यामध्ये अजून एक घटक, म्हणजे आदिवासी !

कालच ‘उंच माझा झोका’ पुरस्कारांमध्ये रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वैशाली पाटील यांचा सत्कार झाला. तथाकथित शहरी विकासाच्या भाऊगर्दीत या कातकरी, आदिवासी, गॊन्ड समाजाला आपण का विसरतोय? आजपर्यंत आम्ही ‘गोडवे गाऊन थकलेल्या’ विकासाची गंगा तिथे पोहोचलीच नाहीय. मग त्यांच्या हक्काची आणखी जमीन हिरावून, जंगले तोडून, प्राणी मारून कोणता विकास आपण करणार आहोत आणि कुठे?

वेळ आली आहे विकास या शब्दाचा अर्थ पुन्हा शोधण्याची. जंगले तोडून हिरवळ संपवून कॉक्रीटचे माजले उभे करून त्यात राहणारे आणि आता निसर्गाकडे परत चला म्हणून गावी पाडलेल्या प्लॉटवर बंगले बांधणारे आपण मूर्ख नाहीतर कोण आहोत?

पर्यावरण आणि या प्रश्नांवर एकत्र यायची वेळ आली आहे. विकासाची भाषा करणारे तथाकथित भांडवलवादी आणि विरोध करणारे तथाकथित कम्युनिस्ट अशा दोन टोकांपेक्षा वेगळा, बॅलन्स्ड विचार करणारे सामान्य आज आपल्याला हवे आहेत.

शेतकरी विरोध करीत असतील तरी हट्टाने प्रोजेक्ट पूर्ण करायचाच असा दुराग्रह अयोग्य आहे.  अनेकलाभ देणारी मोठी झालेली जुनी झाडे तोडून, त्याऐवजी आम्ही नवीन झाडे लावणार आहोत असा स्वतःला फसवणारा संदेश टाकणे आता बंद जाहले पाहिजे. एक जुने झाड निसर्गाच्या चक्रात कोट्यवधींच्या नफ्याच्या बरोबरीचे असते हे आपण समजून घेतले पाहिजॆ.

विकास म्हणजे उद्योगांचे इमले नव्हेत. मोठमोठी संकुले आणि त्यात ‘लावलेली’ झाडे नव्हेत. विकास म्हणजे, तुमचे आयुष्य सर्वार्थाने सुंदर करण्याचा प्रयत्न! फक्त लाखोंचा मोबदला देऊन विकास विकत घेता येत नाही. वाळू, तेल, पाणी हे निसर्गाचे घटक अपरिमित मूल्याचे आहेत. पण चार दोन मूर्ख अधिकारी, मंत्री, राजकारणी आपल्याला हवी तेवढी लाच देऊन त्यांचा उपसा करण्याचे कंत्राट देतात, तेंव्हा ते तुमच्या कत्तलीचे कंत्राट देत आहेत, हे सामान्य माणसाने समजून घेतले पाहिजे.

आपला देश सुजलाम सुफलाम आहे. तो सुजलाम ठेऊनच जेंव्हा आपण विकास करू तेंव्हाच चाणक्याच्या अर्थशास्त्रातील प्रजानां हिते हितं असे वर्णन केलेला आणि आजच्या आधुनिक अर्थशास्त्रात सांगायचे तर वेल्फेअर आणि ग्रोथ यांची सांगड घालणारी डेव्हलपमेंट आपण साध्य करू शकू..

सरकारला हे समजत नसेल, तर आपण ते त्यानं समजून दिले पाहिजे!

Previous Article

दातांची निगा कशी राखावी?

Next Article

न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे सरन्यायाधीश

You may also like