हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? भाग ३

Author: Share:

जे लोक असे म्हणतात कि हिंदू हा नक्की धर्म आहे का, त्यांना धर्म या शब्दाचा खरा अर्थ समजला नाही, असे दिसतेय. धर्म म्हणजे आपल्या जगण्यापासून ते फक्त मरण्यापर्यंतच नव्हे, तर पारलौकिक अस्तित्वापर्यंत मार्गदर्शन ठरू शकणारी विचारधारा म्हणजे धर्म. धर्म म्हणजे फक्त Religion नव्हे. आपण असे म्हणतो, कि भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे. पण आपण असे म्हणत नाही कि, Barking  is dog’s religion. स्वभावधर्म, गुणधर्म आणि विशेषण हे सगळ्याच गोष्टी धर्मात येतात.

माणूस जन्माला आल्यानंतर सुरु होणारी ते मरेपर्यंत विविध विशिष्ट मार्गदर्शक कृती म्हणजेच संस्कार. हिंदू धर्मात अनेक लहान मोठे कृती हे संस्कार होय. तरीही सोळा प्रमुख संस्कार आहेत. यात जन्मसोहळा पासून ते अंत्यसंस्कार करेपर्यंत मनुष्याच्या आयुष्यातील सगळ्या प्रमुख गोष्टींचा समावेश होतो. हिंदू धर्मात तर जेवण करण्यालाही यज्ञ म्हटले आहे.

‘धारयते इति धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली आहे. जो समाजाला धारण करतो, तो धर्म. यात समाजाच्या प्रत्येक समाजघटकांचा समावेश होतो. असा एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्मच आहे. बाकी धर्मात एकतर टोकचा प्रवृत्तीवाद अथवा टोकाचा निवृत्तिवाद असे दोन भाग दिसतील. इस्लाम धर्मात प्रवृत्तीवाद आहे. या धर्मात संसारसुखाचा त्याग निषिद्ध आहे. तसेच अहिंसाही दिसत नाही. समाज जर पूर्णतः प्रवृत्तीवादी असेल, तर अनाचार बोकाळेल. आपण कितीही प्रयत्न केला, तरी फक्त नैतिकतेच्या आधारावर स्वार्थी वृत्ती नाही नष्ट करता येत. त्यासाठी निवृत्तीवादाची गरज असते. म्हणजे समाजमनावर बंधन राहते.

जैन, बौद्ध, ख्रिश्चन या धर्मात संन्यास घेणे, हीच ज्ञानाची सर्वोच्च पातळी आहे, असे मानले जाते. व्यक्तिगत ज्ञानासाठी ही सर्वोच्च पायरी असेलही. पण जर संपूर्ण समाजाने जर संन्यास घेतला, तर मानवी जीवाचा गाडाच कोसळून पडेल. मग त्याला काय अर्थ शिल्लक राहील? आणि जरी कुटुंबातील एका व्यक्तीने संन्यास घेतला, मग त्यावर अवलंबून असणाऱ्या बाकीच्या कुटुंबियांचे काय होईल? आणि जर महत्त्वाच्या व्यक्तीने संन्यास घेतला, तर मग निर्माण झालेली पोकळी कशी भरून येणार? यात अहिंसेचा अतिरेक आहे. ‘सीधी उंगली से घी नही निकलता’ अशा वेगळ्या परिस्थितीत अहिंसावादी भूमिका घेऊन काय उपयोगाची आहे?

पण या दोन्ही गोष्टींचा समन्वय हिंदू धर्मात दिसतो. ‘अहिंसा परमो धर्म, धर्मो हिंसा तथैव:च’ हे सांगणारी फक्त हिंदू संस्कृतीच आहे. यात प्रवृत्तीवाद आणि निवृत्तिवाद यांचा समतोल आहे. अहिंसेचा अतिरेक करून आत्मघातकी वृत्ती नाही, कि स्वार्थी वृत्तीचा अतिरेक करून भोगलंपट प्रवृत्ती नाही. गरज पडेल तेव्हा शस्त्र उचलणे आणि योग्य वेळ येताच संन्यास घेणे, हे हिंदू धर्मातच आहे. ‘कामोस्मि भरतर्षभ:’ असे म्हणून कामालाही स्वीकारण्याची ताकद फक्त भगवद्गीतेतच आहे. म्हणूनच हिंदू धर्म हा सगळ्याच बाबतीच वेगळा आहे. हे त्याचे वेगळेपण शेवटपर्यंत टिकून राहीलच.

अस्तु……..

समाप्त

लेखक: विवेक बाळकृष्ण वैद्य

Previous Article

नांदगाव-शोध पाण्याचा भाग-१

Next Article

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? भाग २

You may also like