आम्ही सारे बेडूक

Author: Share:

शीर्षक थोडेसे वेगळे वाटेल, पण परिस्थितीजन्य आहे. मी एके ठिकाणी वाचले होते की खाणारे बेडूक कसे उकळवतात. पहिले जिवंत बेडकांना साध्या पाण्यात ठेवतात आणि मग पाणी हळूहळू गरम करतात. वाढत्या तापमानाशी बेडूक अनुकूलन करून जुळवून घेते आणि स्वस्थ बसून राहते. पण जेव्हा पाणी प्रमाणापेक्षा जास्त तापवले जाते, तेव्हा बेडूक आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. पण त्याच्या शरीराला फक्त अनुकूलन करण्याची सवय लागल्याने तो उडी मारून पातेल्याबाहेर पडू शकत नाही. त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. याउलट जर जिवंत बेडकाला अचानक उकळत्या पाण्यात टाकले तर तो लगेचच उडी मारून बाहेर पडू शकतो.
आता तुम्ही विचार करत की मग आपण बेडूक कसे ? आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे ते बघितले की समजून येते. मागे काही महिन्यांपूर्वी एक वाद चालला होता की ‘वंदे मातरम’ हे गीत म्हणावे की नाही. बऱ्याच मुस्लीम संघटनांनी याला विरोध केला. विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे मुस्लिम धर्मात इतर देवांसमोर झुकणे निषिद्ध आहे, त्यामुळेच भारताला माता म्हणून पूजन करणे गैर आहे, हे ते मानतात. परंतु कारण देताना म्हणतात की संविधानात ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत म्हणून दिलेले नाही. त्यामुळे आम्ही ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही. याला हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी आक्षेप घेतला. यावर बराच गदारोळ उडाला. मग विषय शांतही झाला.
मग काही महिन्यांपूर्वी कोर्टात याचिका दाखल झाली की ‘जन गण मन’ म्हणताना उभे राहणे सक्तीचे आहे की नाही. कोर्टानेही निर्णय दिला की केवळ उभे राहणे यावरून देशभक्ती दिसत नाही. ज्या भारतीयाला आपले राष्ट्रगीत प्रिय आहे , अश्या प्रत्येकाला या निर्णयाचा राग येणे साहजिकच होते. राष्ट्रगीत सिनेमागृहात वाजवणे याबाबत कदाचित प्रत्येकाचे वेगवेगळे मतमतांतरे असू शकतात. नव्हे ती असावीत. हेच तर लोकशाहीचे लक्षण आहे. पण राष्ट्रगीत चालू असताना उभे न राहणे अथवा राहणे, हासुद्धा मूलभूत हक्क असेल, तर मग धन्यच आहे.
याअगोदर जेव्हा जेव्हा कोणते हिंदू सण येतात, त्याअगोदर नेमकी काहीतरी केस कोर्टात येते. त्यावर तातडीने सुनावणीही होते आणि बंधनांची मोठी यादी कोर्टाकडून सादर केली जाते. प्रसारमाध्यमे प्रत्येक गोष्टीला असा काही रंग देतात की भारतात जे काही प्रदूषण आणि गरिबी यासारख्या समस्या आहेत त्याला जबाबदार म्हणजे सर्वसामान्य हिंदू सण आणि त्यावर होणारा खर्च. म्हणजे साप साप म्हणून भुई थोपटण्याचा हा प्रकार आहे. आताच दिल्लीत होणारे प्रदूषण बघता हे चित्र आणखी स्पष्ट होईल. नशीब आता दिवाळी नाही, नाहीतर याचेही खापर फटाक्यांवर फुटले असते.
मूळची समस्येला व्यवस्थित बगल देऊन भलताच विषय पुढे न्यायचा, हे तथाकथित पुरोगामी कारस्थान आता खूप चांगलेच सुपरिचित झाले आहे. पूर्वी माध्यमे ठराविक लोकांच्या हातात होती, त्यामुळे त्यांचे मत हेच संपूर्ण जगाचे मत असे भासवले जात होते. पण या तंत्रज्ञानाचा फायदा जेवढा या लोकांना झाला नाही,त्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना झाला. सर्वसामान्य लोकही व्यक्त होऊ लागले, पण व्यक्त होण्यात नवी पिढी जास्त दिसते. याचे कारण म्हणजे मागच्या पिढीला सवय लावून ठेवली होती ती सतत adjustment करण्याची. सण कोणाचेही असो, ऍडजस्ट आम्हीच करणार. मोठ्या मंदिरात जमा होणाऱ्या दानासाठी सरकार विविध अधिकारी नेमणार. मग दर्गे, चर्च, मशिदी यांच्यावर नियंत्रण कोणाचे हे लोकांना कधीच कळायचे नाही. लोकांना यात वावगेही वाटत नसायचे. जर कोणी याला प्रतिप्रश्न केलाच, तर त्यालाच प्रतिगामी, बुरसटलेला, मनुवादी बोलून गप्प केले की झाले काम.
पण तापलेल्या पाण्यात अनुकूलन साधून पाणी उकळेपर्यंत वाट बघणे आणि मग त्यातच मरून जाणे हे दिवस सध्या बंद झाले आहेत. पण असे वारंवार होणारच नाही, असे कोण खात्रीने म्हणू शकत नाही. म्हणून आपण याविरुद्ध आवाज उचलला पाहिजे. कधी कधी नव्हे, तर जेव्हा जेव्हा असे दुहेरी धोरण लादले जाईल, तेव्हा तेव्हा. तरच आपण या फक्त देशात नाही तर जगात सन्मानाने जगू शकू. नाहीतर पाणी प्रमाणाबाहेर उकळलेले झाले, तर उडी मारण्यासाठी त्राण आणि शक्ती आपण गमावून बसलेले असू.
सूज्ञास अधिक सांगणे न लगे.

लेखक: विवेक बाळकृष्ण वैद्य

Previous Article

१३ नोव्हेंबर

Next Article

मुंबईच्या फलंदाजांचे खडुसपणाचे दर्शन…

You may also like