ताजं पाणी – शीळं पाणी

Author: Share:

बाबा ट्रीपला कधी जायच ?” स्मित ने आपल्या बाबास विचारले. “जाऊ  यात!!” “पण कधी?” स्मित ने पुन्हा विचारले “या रविवारी” “नक्की” “हो नक्की”  “या हु !! “स्मित आनंदाने ओरडला.  “पण या रविवारी तर पाण्याचा वार आहे “स्मित ची आर्इ स्मिता, स्मित आणि त्याच्या बाबामधील संभाषण ऐकून म्हणाली “काही तरी करू, कारण मला रविवार शिवाय वेळ  नाही” स्मितचे बाबा रोहन ने सांगीतले.

                रोहन चा सोलापूर येथे स्वत:चा व्यवसाय होता तर स्मिता ही गृहणी होती.  त्यांचा मुलगा स्मित हा जवळ च्याच एका इंग्रजी शाळेमध्ये तीसरीला होता, परिक्षा संपुन स्मितला उन्हाळयाच्या सुट्ट्या  लागल्या होत्या.  सुट्टी  लागल्या पासून कोठेतरी ट्रीपला जाण्यासाठी तो त्याच्या आर्इ बाबाच्या पाठीमागे लागला होता.  रोहन व्यवसायामध्ये व्यस्त असल्याकारणाने त्याला वेळ नव्हता.  पण स्मितच्या हट्टापायी तो तयार झाला.  रविवारी त्यास सुट्टी   असल्याकारणाने एक दिवसाची जवळचीच ट्रीप  काढावयाची असे त्यांनी ठरवले.  त्यासाठी कुडलसंगम, विजापूर व अलमट्टी   धरण अशी ठिकाणं ठरवली.  सकाळी  लवकर कार ने निघून संध्याकाळी  परत यावयाचे असा त्यांनी बेत आखला.

“बाबा, कुडलसंगम्, विजापूर, अलमट्टी  येथे काय आहे?” स्मित ने उत्सुकतेने विचारले.  “अरे कुडलसंगम ला नदी व महादेवाचे मंदीर आहे, विजापूरला गोलघुमट आहे तर अलमट्टीला मोठे धरण आहे” रोहनने सांगीतले.  “अरे वा! म्हणजे भरपूर पाणी पाहायला मिळ णार” स्मित आनंदून म्हणाला “हो” रोहन हसून म्हणाला.  “पण घरच्या पाण्याचे काय?”स्मिता काळजीयुक्त स्वरात म्हणाली.  “अगं काही तरी ऍडजेस्ट करू, तू का एवढी काळजी करतेस?” रोहन तीला समजावत म्हणाला.  “फारतर पाण्यासाठी मी घरी थांबतो “ स्मितचे आजोबा रोहन व स्मिताचे संभाषण ऐकूण म्हणाले.  “ते काही नाही! जायचं तर सर्वांनी जायचं! घरच्या  पाण्याचाच प्रश्न आहे ना काही तरी करू” रोहन ने उत्तर दिले.

सोलापूरला तीन दिवसा आड पाणी येत असे व त्यानुसार ट्रिपचा दिवस हा पाणी येण्याचा दिवस होता.  घरात वापरायच्या पाण्यासाठी एक हौद व गच्चीवर टाकी असल्याकारणाने व तीन दिवसाचे प्यायचे पाणी भरून ठेवले जात असल्याने घरातील चार माणसांना ते पाणी पुरत असे. पण पाणी येण्या दिवशी घरी असणे व पाणी भरणे  गरजेचे असे.

                “पाण्याचे काय करायचे?” स्मिताने रोहन ट्रिपल्या जायच्या आधी दोन दिवस विचारले.  “हे बघ! घरात पाणी किती शिल्लक आहे ते मला सांग”.  “वापरायचा बाहेरचा हौद पुर्ण भरलेला आहे तर गच्चीवरील टाकी अर्धी आली आहे” स्मिता म्हणाली “नक्की “ “हो आजच मी बघीतले आहे”.  “बरं म्हणजे पुढील पाणी येर्इपर्यंत ते नक्की पुरेल” रोहन म्हणाला “हो” स्मिता हसुन म्हणाली.  “बरं बार्इसाहेब प्यायच्या पाण्याची काय पोझिशन आहे” रोहन ने विचारले.  “एक स्टील चे टीप व तीन घागरी भरलेल्या आहेत” स्मिताने उत्तर दिले.  “अगं मग ते पाणी पुरेल, तु पाण्याची का एवढी काळ जी करतेस”.  “अहो पुरेल पण ते प्यायचे पाणी शीळ होऊन जार्इल, मी दर पाण्याच्या दिवशी ताजं पाणी भरत असते” स्मिता म्हणाली.  “अगं शीळ पाणी ताज पाणी असं काही नसते पाणी स्वच्छ आहे ना?”. ”  हो मग मी काय तुम्हा सगळयांना रोज घाण पाणी पाजते असे वाटले का तुम्हाला ? “स्मिता रागाने म्हणाली. | “मी ते नीट झाकून ठेवलेले असते व दर पंधरा दिवसाला मी सर्व पिण्याच्या पाणी साठवण्याची भांडी घासत असते” स्मिता पुढे म्हणाली.  “मग ठीक आहे ना! पाण्याची काळ जी मिटली” रोहन म्हणाला.  “वापरायचे काही नाही ते पुरेलही  प्यायचं  पण आहे, पण ते शीळ होणार आणि मला ते चालणार नाही”.  “अगं तीन दिवसाआड आपल्याकडे पाणी येतं, तेव्हा तीन दिवसात ते शीळच होतं ना”.  “पाणी सोडणं आपल्या हातात नाही पण जेव्हा येतं तेव्हा पिण्यासाठी ते ताजचं भरणं आवश्यक आहे” स्मिता म्हणाली “तेच पाणी मी स्वयंपाकाला देखील वापरते. शीळ पाण्याने स्वयंपाक करू का ?तुम्हीच सांगा. ” “अगं ताजं पाणी शीळ  पाणी असे काही नसते पाणी प्यायला स्वच्छ असले ना बास. ” “ते मला काही माहित नाही मला मात्र ताजेच पाणी हवे” स्मिता ठामपणे म्हणाली.  “मगं तूच बघ पाण्याचे काय करायचे ते ? ” शेवटी रोहन वैतागून म्हणाला.  हे सर्व संभाषण ऐकत असलेल्या स्मितला वाटले ट्रीप कॅन्सल  होती का? तो काळ जीने म्हणाला “बाबा रविवारी ट्रीपला जायचा ना?”.  “अरे हो रे बाबा ! नक्की ”रोहन त्याच्याकडे पाहत म्हणाला “प्रॉमिस  !”  “ हो प्रॉमिस  !”

“शेवटी पाण्याचे काय ठरवले ?“रोहन ने ट्रीपच्या आदल्या दिवशी झोपतांना स्मिताला विचारले.  “वापरायचे पाणी कॉक  चालू केल्यामूळे  टाकीमध्ये आपोआप पडेल.  पिण्याचे, मी सर्व शीळ  पाणी टाकून दिले आहे व चार घागरया जोशीकाकूंकडे पाणी भरण्यासाठी आत्ताच देवून आले”. स्मिताने सांगितले “काय तू सगळ  चांगले स्वच्छ प्यायचे पाणी टाकून दिलेस” रोहन आश्चर्याने म्हणाला.  “हो मग ताजं पाणी प्यायला नको का?” स्मिता हसून म्हणाली.  झोपतांना वाद नको व उदयाचा ट्रीपचा मुड जायला नको म्हणून रोहन शांत राहिला.  स्मिता सारख्या कितीतरी बायका शीळ  पाणी या चुकीच्या समजुतीने स्वच्छ पाणी दर वेळेस टाकून देत असतात व लाखो लिटर पाणी वाया जाते या कल्पनने तो अस्वस्थ झाला.

ट्रीपचा दिवस उजाडला.  स्मित ट्रीपला जायचं म्हणून लवकर उठुन तयार झाला.  त्याने ट्रीप संदर्भात अनेक प्रश्न विचारून रोहन व स्मिताला अक्षरश: भंडावून सोडले.  सकाळी  १०  वाजता कुडलसंगमला ते पोहोचले.  देवदर्शन झाल्यानंतर नदीकडे जाण्याचे त्यांनी ठरवले.  “चला आता नदी कडे “स्मित म्हणाला.  मंदीराला वळून नदीकडे गेलो असता बघतेा तर काय ! नदी मध्ये थोडेच पाणी होते.  नदीचे पात्र आटले होते. नदीची ही अवस्था पाहून रोहन दु:खी झाला.  नदीत पाणी नाही हे पाहून स्मित हिरमुसला.  “अहो बाबा इथे तर काहीच पाणी नाही”.  “अरे हो !  कडक उन्हाळा   असल्याने व मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने नदी कोरडी पडली आहे”.  रोहन खेदाने नदीकडे पाहात म्हणाला “मग अलमट्टीला   तर पाणी असेल ना?” स्मितने विचारले “बघुया” रोहन त्याला जवळ  घेत म्हणाला.

                विजापूरचा गोलघूमट पाहून स्मितला खुप आनंद झाला.  अलमट्टी ला धरण आहे व तेथे खूप पाणी पाहावयास मिळणार असे समजून तो खुष झाला.  पण त्याची ही समजूत काही वेळातच खोटी ठरली.  धरणात देखील जास्त पाणी शिल्लक नव्हते.  ऐकीकडे आपण पाणी वाया घालवतोय तर दुसरीकडे पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत या कल्पनेने रोहन नाराज झाला.

                रात्री नऊ ला सर्व सोलापूरात पोहचले.  ट्रिप   चांगली झाली होती फक्त भरपूर पाणी पाहावयास मिळाले नाही या मुळे   सर्व थोडे नाराज झाले होते.  विशेषत: स्मित.

पिण्याचे पाण्याच्या ठेवलेल्या घागरी घेण्यासाठी रोहन व स्मिता शेजारच्या जोशींकडे गेले.  मोठी पार्इपलार्इन  फुटल्यामुळे  रविवारी पाणी आलेच नाही हे त्यांना जोशीकाकू कडून कळाले.  त्यांच्याकडे देखील अचानक पाहुणे आले असल्याने पिण्याचा साठा फारसा नव्हता.  त्यांनी स्वत:ची एक पिण्याच्या पाण्याची भरलेली कळशी स्मिताला दिली.  आजची रात्र त्यावरच भागणार होती. पण उदया पिण्याचे पाण्याचे काय ? या प्रश्नाने ती दोघं काळ जीत पडली.  ट्रिपच्या दमणूकीमुळे   लवकर सर्वजण झोपी गेले.

पिण्याच्या पाण्याच्या धास्तीने रोहन व स्मिताला सकाळी  लवकरच जाग आली.  “मी तुला सांगीतले होते चांगले पाणी टाकून देवू नकोस”रोहन रागाने म्हणाला.  “अहो ते पाणी शीळ  होतं” स्मिता म्हणाली  “अगं वेडे मग काल  जोशींनी दिलेले काय ताजं पाणी होते.  आता उरलेले तीन दिवस काय वापरायच्या टाकीतले पाणी पिणार?” रोहन चिडून म्हणाला.  स्मिताला तिची चूक उमजली.  आपण खोटया समजुतीने चांगले पाणी टाकून दिले या कल्पनने ती अस्वस्थ झाली.  पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामुळे  ट्रिपचा आनंद निघून गेला होता.  “माझंच चुकलं ! मी चांगल स्वच्छ पाणी टाकून दयायला नको होतं” स्मिता  म्हणाली.  काल आपल्याला नदी, धरणामध्ये मुबलक पाणी पाहावयास मिळाले नाही आणि दरवेळी  आपण असे कितीतरी पाणी वाया घालवतो याचा तिला आता पश्चाताप व्हायला लागला.  तीने ठरवलं की आता यापुढे ती शीळ  पाणी या खोटया समजूतीने  स्वच्छ पाणी टाकून देणार नाही व तसेच कोणतेही पाणी वाया घालवणार नाही.  तीने आपला निश्चय  रोहनला सांगतला. रोहन तीने घेतलेला महत्वाचा निर्णय  ऐकून खुष झाला.

ट्रिपमुळे  घडलेल्या घटनेने स्मिताचे डोळे  उघडले. ताजं पाणी शीळ  पाणी असे काही नसते हे तिला आता कळून  चुकले होते.  ती यापूढे हरतह्रेने   पाणी वाचवण्याचा प्रयत्न करणार  होती.  स्मितासारख्या प्रत्येक गॄहीणीने असा प्रयत्न केला व त्यास रोहन सारख्या पाण्याविषयी संवेदनशील असणाऱ्या साथीदाराची साथ लाभली तर कितीतरी पाण्याची बचत होर्इल व त्यामुळे  स्मित सारख्या भावीपिढीला जलसंकटाच्या समस्येला तोंड दयावे लागणार नाही.

 

@महेश भा.  रायखेलकर

गंगा- स्मॄती” घर नं.  १, रोहिणी नगर नं. १, सैफूल, विजापूर रोड, सोलापूर, ९३२६६१२४३६

 

 

Previous Article

स्वप्न पुणे आयोजित जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा 2017

Next Article

८ सप्टेंबर

You may also like