Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सत्तेसाठी नव्हे पाण्यासाठी महायुद्ध

Author: Share:

जगात यापुढे महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही. महायुद्ध झालेच तर ते सत्तेसाठी न होता पाण्यासाठी होईल अशी शक्यता आज वर्तवली जात आहे. एका बाजूला लोकसंख्या वाढते आहे. दुसऱ्या बाजूला पाण्याचे स्रोत कमी होत चालले आहेत. वृक्षवाढीसाठी जर आपण सतर्क राहिलो नाही तर पाण्याविना तडफडून आपणास मरण जवळ करावे लागेल. हे केवळ भाकीत नाही तर वास्तवतेचे चित्र आहे. आपणास शहाणपण कधी सुचणार हा खरा प्रश्न आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. केवळ मानवच नव्हे तर पशुपक्षी देखील आज पाणीटंचाई पुढे हतबल होताना दिसत आहेत.

आज पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे. शहरीकरण, औधोगिकीकरण, भूजल पातळीतील घसरण, पावसाचे घटते प्रमाण, खते कीटकनाशके यामुळे झालेले प्रदूषण याचा विचार केला तर जलसंकटाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल. पाणी ही नैसर्गिक देणगी आहे ज्यायोगे सजीव आपले अस्तित्व टिकवून आहेत. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पृथ्वीचा विचार केला तर 71 टक्के भूभाग व 29 टक्के भाग जमीन व्याप्त आहे. एकूण पाणी साठ्यापैकी 97 टक्के पाणी सागरात आहे. हे पाणी दैनंदिन वापर व शेतीसाठी उपयुक्त नाही. मानवाला उपयोगी पडणारा पाणीसाठा फार थोडा आहे. देशातील नद्यांची संख्या 2 हजाराच्या आसपास आहे. राज्याचा विचार केला तर आजही 40 हजार खेडी उन्हाळ्यात पाण्याच्या विवंचनेत असतात.

आज शहरीकरण जलद गतीने होत आहे. तेथे पाण्याची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आता पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची वेळ आली आहे. धरणातील पाणी शेती व वीजनिर्मिती यासाठीच खर्ची पडते. पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने हिमपर्वत वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. आज सांडपाण्यात घातक रसायने सोडली जात आहेत. नदी नाले यातील पाणी दूषित होत आहे.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


आपण पवित्र समजत असलेल्या गंगा नदीला शुद्ध करण्यासाठी 60 पेक्षा अधिक शुद्धीकरण प्रकल्प राबवावे लागले आहेत. पाण्याचा अनियंत्रित वापर आपणास संकटात लोटल्याशिवाय राहणार नाही. पावसाळ्यात सुरवातीला आमलवर्षा होत असल्याने पाण्याचे जलस्रोत प्रदूषित होतात.

आपण दैनंदिन जीवनाचा विचार केला तर विविध कारणासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी वापराच्या पद्धतीने पाणी कमी अधिक प्रमाणात लागते. आंघोळीचा विचार केला तर माणशी 20 लिटर पाणी लागते. तेच पाणी शॉवर वापरल्यास 80 लिटर लागते. आज ग्रामीण भाग सोडला तर शहरात सर्वत्र शॉवर आहेत. नळाच्या तोट्या लिकेज असतील तर दिवसाला 5 लिटर पाणी वाया जाते.याचा विचार आपण कधी करतच नाही.

शेती व्यवसाय तर आज अनियमित पावसामुळे बेभरवशाचा झाला आहे. राज्याचा विचार केला तर फक्त 13 टक्के शेती बागायती आहे. पूर्वी 60 ते 100 फुटावर कुपनलिकाना पाणी लागत होते. आज 400 ते 500 फुटांपर्यंत गेले तरी पाण्याचा स्रोत भेटत नाही. त्याचा परिणाम म्हणून ओढे, नदी, नाले, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडलेल्या पहावयास मिळतात. भूजलपातळी घटण्याची अनेक कारणे आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत आहे. त्या तुलनेत पुनर्भरण होत नाही. वृक्ष लागवड म्हणावी तेवढी नाही. वृक्षतोड मात्र बेसुमार आहे. वापर केलेल्या प्लास्टिक पिशव्या मातीतच राहतात. त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी जिरण्यात अडचणी येतात.

जलसंकट वाढत चालल्याने शुद्ध स्वच्छ पाणी मिळतच नाही. पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. जमीन व वने यांचे प्रमाण योग्य असायला हवे. भूजल पूनर्भरणाची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे ती खंडित झाली तर पाणी साठा कमी होतो त्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

पाणी संकटावर मात करण्यासाठी शिवकालीन पाणी योजना, घराच्या छतावरील पाणी जमिनीत पुन्हा जिरवणे, सांडपाण्याच्या शुद्धीकरणानंतर त्याचा पुनर्वापर करणे, शोषखड्डे निर्मिती करणे, शेततळी निर्माण करणे, वनराई बंधारे बांधणे, प्रवाहित पाणी बांध घालून अडविणे यासारख्या उपाययोजना राबवाव्या लागतील.
या सर्व उपाय योजना करीत असताना लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. पाणी संकटाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. आज आपण विविध दिन व सप्ताह साजरे करतो. त्यातून लोकजागृती होण्याची गरज आहे. पृथ्वीतलावर जल,अन्न, सुभाषित ही तीन रत्ने आहेत. पाणी मौल्यवान असल्याने ते रत्नतुल्य समजले आहे.

आपल्या राज्यात प्रामुख्याने नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. राज्यात तापी नर्मदा या पश्चिम वाहिनी तर कृष्णा, गोदावरी, भीमा, वैनगंगा या पूर्व वहिनी नद्या आहेत. राज्यात लघु, मध्यम, मोठ्या जलसिंचन प्रकल्पांची संख्या 2475 च्या आसपास आहे. मान्सुन पर्जन्य हा आपला जलसंपत्तीचा एकमेव स्रोत आहे. कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस पडतो तर महाराष्ट्र व विदर्भ अत्यल्प पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. देशाच्या तुलनेत 29 टक्के वापरा योग्य पाणी महाराष्ट्रात आहे. असे असले तरी त्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन होत नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.टँकरने पाणी पुरवणे, जनावरांच्या छावण्या उघडणे आशा उपाययोजना करण्याची वेळ राज्यावर नेहमीच येते.

आज ग्रामीण भागातील चित्र पाहिले तर चार ते पाच किलोमीटर अंतरावर लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याच्या बाबतीत आपणास गावे स्वयंपूर्ण करता आली नाहीत. ताकारी, टेम्भू, आरफळ, म्हैसाळ पाणी योजना सत्ता प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी पडल्या. लोकांच्या पाणी समस्या मात्र आजही तशाच आहेत.पीक पद्धतीत देखील बदल करण्याची गरज आहे.

पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून राळेगणसिद्धी, शिवणी, निधळ या गावांनी पाणीसमस्येवर कायमचा तोडगा काढला. धुळे जिल्ह्याने जलसंधारणाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन केले. काही ठिकाणी रुफ वाटर हार्वेस्टिंग ही संकल्पना राबवली गेली. पिण्याचा पाण्याच्या प्रवाहात लोकांना कोणतेही धार्मिक विधी करण्यापासून परावृत्त करावे. शेतीसाठी ठिबक, तुषार, सूक्ष्म जलसिंचन योजना उपलब्ध करून ध्याव्यात. पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी घरगुती नळांना मीटर बसवावेत. नगर पालिका महानगरपालिका क्षेत्रात आता त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.

पाणी समस्येवर आजच आपण उपाय योजना केली नाही तर वालुकामय प्रदेशासारखी आपली आवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही प्रदेशावर सत्ता स्थापन करण्यासाठी आता महायुद्धे होणार नाहीत तर पाण्याच्या उपलब्धतेसाठी ती जगाच्या पातळीवर होतील. त्यामुळे पाण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. एका बाजूला हवेतील उष्मा प्रचंड वाढतोय. तो जिवंत राहणे असह्य करतोय त्यात भर म्हणून पाण्याचे संकट वाढतच आहे. वेळीच विचार झाला नाही तर नजीकच्या काळात माणसे व जनावरे पाण्यावाचून तडफडून मेलेली आपणास पहावी लागतील. कोठेतरी वाचलेला विनोद मला आठवतो. एक प्रेमी युगुल हॉटेलमध्ये येते. वेटर ऑर्डर घेण्यासाठी येतो. तो माणूस पाणी मागतो त्यावेळी वेटर फुल की कटिंग असे विचारतो. विनोदाचा भाग सोडा. पाणी सुद्धा कटिंग मध्ये घेण्याचे दिवस आता फार लांब राहीले नाहीत.त्यामुळे वेळीच सर्वांनी विचार केलेला बरा.

प्रदीप जोशी ( जेष्ठ मुक्त पत्रकार)
मोबाईल.. 9881157709


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

न्यायपालिकेची प्रतिष्ठा राखा

Next Article

साधनेशिवाय कलाकार घडत नाही : कीर्ती शिलेदार

You may also like