विकासाच्या नावाखाली शहरे निसर्गाला गिळंकृत करताहेत : डॉ. अनिल अवचट

Author: Share:

पुणे : विकासाच्या नावाखाली निसर्गाचे जे शोषण सुरु आहे ते चिंताजनक आहे. शहरे निसर्गाला गिळंकृत करत आहेत. असे मत डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात इतिहास संशोधक कै. शं. ना. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार अर्चना जगदीश यांच्या ‘नागालँडच्या अंतरंगात’ या पुस्तकाला डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होत. व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. डॉ. प्रतिमा जगताप आणि डॉ. मेधा सिधये याच्या निवड समितीने पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून काम पहिले.

डॉ. अनिल अवचट म्हणाले, ‘संवेदन शीलतेने अभ्यास करणारे अभ्यासक हेच समाजाचा आधार आहेत. त्यांचे महत्व समाजाने समजून घेतले पाहिजे. स्त्रियांचे साहित्य एका परिघात अडकले होते. त्यातून बाहेर पडून आज स्त्रिया संशोधनात रमत आहेत ही महत्वाची गोष्ट आहे.’

अर्चना जगदीश म्हणाल्या, ‘आपल्या देशातला एखादा प्रदेश आपल्याला माहीत नसणे ही अभिमानाची गोष्ट नाही. शाश्वत विकासाचा विचार करताना तिथली माणसे, त्यांची मानसिकता, संस्कृती यांचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे केवळ प्रवासवर्णन न लिहिता तिथल्या माणसाची आणि संस्कृतीचा अभ्यास करून मी लेखन केले.’

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘संस्कृती कधीही रेडिमेड नसते संस्कृती ही माणूस आणि समाज यांच्या सजीव संबंधाचा परिपाक असते. माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवितो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवीत असतो. संस्कृती ही वाहत्या नदी सारखी असते. काळाच्या ओघात तिच्या प्रवाहात सामील होणाऱ्या गोष्टी ती पुढे नेत असते. संस्कृतीचा अभ्यास हा समूह जीवनाचा अभ्यास असतो. या पुस्तकात समाजदर्शन आणि संस्कृतीदर्शन आहे.’ कार्यवाह दीपक करंदीकर, उद्धव कानडे, प्र. ना. परांजपे उपस्थित होते. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

Previous Article

विकृती आणि त्याच विकृत राजकारण

Next Article

आई

You may also like