Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ७

Author: Share:

ऋ. 2-23-19मध्ये म्हटले आहे, ‘हे ब्रह्मणस्पते, प्रसन्न होऊन तू आम्हास पुत्र दे’ ही मागणी ईश्वराने केली असेल कां? निश्चितच नाही. माणूसच असे मागेल.

ऋ. 10-129-6मध्ये सृष्टि-उत्पत्ति कशी झाली ते दिले आहे. त्यात मंत्र 6मध्ये म्हटले आहे की ही सृष्टि कशी उत्पन्न झाली ते निश्चितपणे कोण सांगेल? देवही सांगू शकणार नाहीत कारण देव सृष्टीनंतर निर्माण झाले आहेत. हे विधान देवाने नक्कीच केलेले नाही. मानवाने केले आहे.
प्रश्नोपनिषद्1-11येथे म्हटले आहे की पंचपाद पितर हा आकाशाच्या दुसर्‍या अर्धभागात उदकवृष्टी करणारा असतो असे हे म्हणतात, तर तो दुसर्‍या अर्धभागात दूरदर्शी असतो असे अन्य म्हणतात. हीच ऋचा ऋग्वेदातही 1-164-12येथे आहे. साहजिकच दोन तज्ञांची मते येथे उद्धृत केलेली दिसतात. ईश्वर असे म्हणणार नाही. तो ठामपणे निश्चित काय आहे ते सांगेल. या ऋचेत एकदा पांच ऋतु तर पुढे सहा ऋतु सांगितले आहेत. म्हणजे माणसांची मते सांगितली आहेत; देव ठामपणे एकच सांगेल.

वेदांमध्ये विविध देवतांच्या स्तुती व प्रार्थना आहेत. या प्रार्थना देव करेल कां ईश्वर करेल? नाही. मनुष्यच अशा प्रार्थना करेल.
‘एको सत् विप्रा बहुधा वदन्ति’ असे वेद म्हणतो. हे ईश्वर म्हणेल कां?

आकाशातील विंचवाने हे विष उतरवावे अशी विनंती ऋ. 1-191-15येथे केली आहे. अशी प्रार्थना ईश्वर करेल कां? नाही. माणूसच करेल.
ऋ. 1-84-17हत्तीला आकाशात कोण नेतो? कोण सांभाळतो? कोण शिकवितो? असे प्रश्न केले आहेत ते माणसानेच केले आहेत. सर्वज्ञ ईश्वर असे विचारेल कां?

विश्पलाचा पाय अश्विनींनी बसविला हे ऋग्वेदातील 1-116-15मधील विधान इतिहास म्हणूनच केले आहे, विश्पला राणीनंतर केले आहे. जगाच्या आरंभी ईश्वराने हे विधान केले असणे शक्यच नाही.

ईश्वरदत्त 100वर्षांचे आयुष्य आम्हाला नीट जगू दे अशी प्रार्थना वेदात आहे. ही ईश्वर करेल कां? नक्कीच नाही. माणूस करेल.
ऋ. 1-164-5मध्ये म्हटले आहे, ‘अज्ञानी व मूढ असा मी देवांच्या गुप्त रूपाविषयी विचारत आहे की परमेश्वराचे रहस्य कोणास समजले आहे कां? ‘अज्ञानी व मूढ असा ईश्वर नसतो. हे कुणी माणसानेच म्हटले आहे. 16मध्ये म्हटले आहे की माझ्या पत्नींना मी पुरुषाचे अधिकार दिले आहेत. हे विधान ईश्वराचे असणे शक्य तरी आहे कां? हे कुणा विद्वानाचेच विधान आहे. 21मध्ये म्हटले आहे की जगाचा प्रभू व संरक्षक असा ज्ञानमय परमेश्वर माझ्या अन्तःकरणात आहे. हे विधानही ईश्वराचे असणे शक्य नाही, विद्वानाचेच आहे. 26 सवितृ आमच्याकरिता चांगले दूध निर्माण करो, 27 धेनू आम्हावर प्रसन्न होवोत, आमचे ऐश्वर्य वाढवोत अशा प्रार्थना देव करेल कां? नाही. 33 ‘अन्तरिक्ष हा माझा पिता व उत्पत्तिस्थान असून त्याच्या पोटी मी जन्म घेतला आहे.

महान पृथ्वी माझी माता आहे’ हे विधान ईश्वराचे असेल कां? तो तर अनादि आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीचे हे विधान नाही कारण पृथ्वी ही माता असलेला कुणी तरी हे म्हणत आहे. साहजिकच तो पृथ्वीनंतर जन्मलेला आहे; त्यानंतर हे विधान वेदात समाविष्ट केले आहे. तेव्हा ते सृष्टिनिर्मितीपूर्वी लिहिलेल्या वेदात असणे शक्य नाही. 34 ‘पृथ्वीचा अंत कोठे आहे? जगाचा मध्य कोठे आहे? वळू नामक अश्वाचे रेत व वाणीचे स्थान कोणचे ते तूं आम्हास सांग.’ हे प्रश्न ईश्वरास पडणार नाहीत. अज्ञ मानवाचे ते प्रश्न कुणा मानवानेच वेदात लिहिले असणार. 35 ‘यज्ञवेदी ही पृथ्वीची अंतिम सीमा तर यज्ञ हाच मध्य होय’ हे उत्तर यज्ञ करणार्‍या कुणा माणसाचेच असणार, ईश्वराचे नव्हे.
भेटूच भाग 8मध्ये…..

अधिक माहितीसाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.
लेखक- डॉ.प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ८

Next Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ६

You may also like