Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ६

Author: Share:

ऋग्वेद 3-31-2येथे मातापित्यांच्या संपत्तीचा वांटा केवळ पुत्रालाच मिळतो, कन्येस नाही असे विधान आहे. पुत्र-कन्या हा भेदभाव ईश्वर करेल काय? ईश्वराचे ठायी भेदभाव नसतो असे वेदाचेच तत्त्वज्ञान आहे ना?

ऋ.1-34-11या ऋचेत अश्विनीकुमारांना विनविले आहे की तुम्ही तेहतीस देवांना घेऊन पेयपानासाठी या, आमचे आयुष्य वाढवा, रोगनिवारण करा, आमच्या शत्रूंचा नाश करा. वेद रचणारा ईश्वर असता तर त्याने अशी विनवणी केली असती का? अशा विनवण्या वेदात अनेक ठिकाणी आहेत. त्या माणसांनीच केलेल्या दिसतात.

गीता 2/46मध्ये कृष्ण म्हणतो, ‘सगळीकडे जलमय झाल्यावर विहिरीला जेवढा अर्थ उरतो तेवढाच अर्थ उरतो सर्व वेदांमध्ये ब्राह्मणाला विशेष ज्ञान झाल्यावर! वेद जर ईश्वर रचित असते तर कृष्ण असे म्हणाला असता कां?

मुंडक उपनिषदात 1/5येथे म्हटले आहे की चारही वेद व वेदांगे ही अपरा विद्या आहे तर ज्यामुळे ब्रह्म कळते ती परा विद्या. वेद जर ईश्वर रचित असते तर वेदांना कमी कां लेखले एका महत्त्वाच्या उपनिषदाने? यावरून स्पष्ट दिसते की वेदान्ताने वेद ईश्वररचित मानलेले नाहीत. उपनिषद्कार वेदकालापासून अगदी नजिक होते त्यामुळे आजच्या लोकांपेक्षा उपनिषदांचे वेदसंबंधी मत जास्त ग्राह्य ठरते.

ऋक्, यजु, साम, अथर्व या चारांमध्ये काही ऋचा पुनःपुन्हा आल्या आहेत हे देवाला समजले नाही कां? मनुष्यच अशी चूक करतो, देव नाही करणार. व्यासांनी ती व्यवस्था चार शिष्यांकडून करविली, त्यामुळे त्या ऋचा दोन-चार ठिकाणी आल्या आहेत.

ऋ. 1-147-2येथे म्हटले आहे, ‘अग्ने, नम्रपणे तुला वंदन करीत मी तुझी स्तुतिस्तोत्रे रचत आहे ‘. हे विधान दीर्घतमस् औचथ्य या ऋषीचे आहे. ते देवाचे असणे शक्य नाही. देव अग्नीची स्तुति नम्रपणे कशाला करील? ऋ 3मध्ये म्हटले आहे, ‘अंध व पुण्यवान् दीर्घतमस् मामतेय ऋषीचे तू अंधारापासून रक्षण केलेस.’ हे विधान देवाचे असेल का? ऋक् 4म्हणते, ‘आमच्या शत्रूंचे कपट तू त्यांचेवरच उलटव. त्यांची दुष्टता त्यांच्याच शरीराला घातक बनव.’ ऋ 5म्हणते, ‘कपटी लोकांपासून आम्हाला वाचव, आम्हाला दुःखात टाकू नकोस’ हे देव म्हणेल का? का माणूस म्हणेल? ऋ. 2-23 मध्ये अशाच मागण्या आहेत.

ऋ. 1-148-2म्हणते, ‘सगळे देव माझ्या यज्ञाचा स्वीकार करोत’ ईश्वर यज्ञ करीत तो देवांनी स्वीकारावा असे विनवील कां?
ऋ. 1-150-1’हे अग्ने, संतुष्ट होऊन मला विपुल वर दे.’ 3-‘अग्ने, तुझे भक्त होण्याचा आशिर्वाद तू आम्हाला दे’ असे माणूस म्हणेल कां ईश्वर?
ऋ. 1-158-4’अश्विनीकुमारांनो, माझे रक्षण करा, लांकडांचा ढीग मला जाळत आहे, माझे शरीर गाडले जात आहे, 5-दासांनी मला बांधून जलामध्ये टाकले आहे, त्रेत नामक दास माझा शिरच्छेद करू बघत आहे, माझे रक्षण करा’ अशा विनवण्या ईश्वर करेल का? नाही. या विनवण्या माणसाने केल्या आहेत. 6-अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे दीर्घतमस् मामतेय दहा युगे जगून वृद्ध झाला, मानवलोकी श्रेष्ठ ठरला. हे विधान देव कशाला करेल? जगनिर्मितीचे वेळी कशाला करेल? दीर्घतमस् झाल्यानंतरच हे कुणी तरी लिहिले आहे.

ऋ. 1-164-31येथे म्हटले आहे, ‘गुप्तपणे रक्षण करणारा, व्यक्त न होणारा अशा त्याला मार्गावर चालतांना मी पाहिले आहे. तो साक्षी, सम, झांकलेल्या स्थितीत सर्वत्र असतो. गुप्त संरक्षक, अव्यक्त असा आत्मा येतो-जातो हे मी पाहिले आहे’ असे विधान ईश्वर करेल कां? कुणीतरी माणसानेच हे विधान केलेले आहे आणि तो दीर्घतमस् औचथ्य आहे हे वेदातच नोंदलेले आहे.

भेटूच भाग 7मध्ये…..

अधिक माहितीसाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.
लेखक- डॉ.प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ७

Next Article

स्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये श्रमजीवी युवकांचे जंबो शिष्टमंडळ

You may also like