Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ५

Author: Share:

श्रुति असे वेदांना म्हणतात कारण त्या ऋचा ऐकल्या गेल्या. त्या प्रत्यक्ष चर्मकर्णानी ऐकल्या नव्हेत, तर त्या मनात उमटल्या, मनाने ऐकल्या. आपल्या मनात एकदम एखादा विचार येतो, तसेच एखादे कवन सुचते, मनात येते. त्यालाच मनाने ऐकणे म्हणतात. तशाच त्या श्रुति मनाने ऐकल्या. जेव्हा केव्हा त्या मनाने प्रथम ऐकल्या, तो त्यांचा आरंभ ठरतो. म्हणूनच श्रुति अनादि नव्हेत. ज्याच्या मनात प्रथम श्रुतिउमटल्या तो ऋषि व तो काळ ठरविणे इष्ट असते, इतिहासाच्या व संस्कृतीच्या दृष्टीने ते आवश्यकच असते. इतिहास व संस्कृती विषयक ज्ञानाचे महत्व ज्याला समजत नाही तोच वेद अनादि आहेत असे म्हणत स्वस्थ बसतो. अडाणी लोकच असे म्हणतात.

बायबल व कुराण देवाने निर्मिली असे ख्रिश्चन व मुसलमान लोक म्हणतात, त्यांचीच री ओढून आमचे हिंदूही वेद देवाने रचले असे म्हणू लागले. प्रत्यक्ष वेद तसे म्हणत नाहीत.

वेदामध्ये मानवांचा इतिहास लिहिलेला आढळतो. तो देवाने लिहिला कां? तसे म्हटले तर त्या देवापूर्वी ती माणसे होती हे सिद्ध होते. दस्युयुद्ध आणि दाशराज्ञ युद्ध या दोन महायुद्धांचा इतिहास ऋग्वेदात लिहिलेला आढळतो. पृथु वैन्य राजाच्या काळी दस्युयुद्ध आरंभले ते दिवोदासाच्या काळात संपले सुमारे पंधराशे वर्षे चाललेल्या या युद्धाचे वर्णन ऋग्वेदात आढळते. हे युद्धवर्णन देवाने लिहिले असेल तर तो देव दिवोदासाच्याही नंतर निर्माण झाला असला पाहिजे. आणि सृष्टीच्या उत्पत्तीचे वेळीच वेद तयार असतील तर सृष्टीनिर्मितीपूर्वीच दस्युयुद्ध झाले हे मान्य करावे लागेल.

परंतु ऋग्वेद व पुराणे यांचा समन्वय साधला तर हे दस्युयुद्ध मनु वैवस्वतापासून इक्ष्वाकुकुलोत्पन्न अज राजापर्यंत म्हणजे सुमारे 74 पिढ्या चालले होते हे दिसते. याचा अर्थ या किमान 74 पिढ्या सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी झाल्या असे मानावे लागेल अन् ते वेडेपणाचे ठरेल.
दस्युयुद्ध समाप्तिनंतर काही पिढ्या लोटल्या आणि दाशराज्ञ युद्ध झाले. हे एक महायुद्धच होते. ऋग्वेदाच्या दहाही मंडलात हे युद्ध प्रतिबिंबित होते. म्हणजे हे युद्धही वेदरचनेपूर्वी म्हणजे सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वीच घडले असे म्हणावे लागते. ते शहाणपणाचे ठरेल का?

ऋग्वेदात सुमारे 49कथासूक्ते, 22संवादसूक्ते आणि विभिन्न राजांनी केलेल्या दानाची स्तुती असलेली 20सूक्ते आहेत. या सगळ्यांची रचना देवाने सृष्टीरचनेच्या वेळीच केली असे म्हणावयाचे कि काय? वेदांपूर्वीच हे सगळे घडले असणार हे उघड आहे. म्हणजेच सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी वेद नव्हते हे निश्चित.

ऋग्वेदात विभिन्न देवतांच्या कृपेची मागणी आणि त्या देवतांनी संरक्षण करावे अशी विनवणी केलेली दिसते. ही विनवणी वेद रचणार्‍या ईश्वराने केली की काय?

देवाला अनन्यभावे शरण जाऊन त्याची करुणा भाकित असल्याची अनेक सूक्ते ऋग्वेदात आढळतात. ही करुणा वेद रचणारर्‍या देवानेच भाकिली असेल, का कुणा मानवाने भाकली असेल? अर्थातच मानवच करुणा भाकेल, ईश्वर नव्हे. तेव्हा वेद मानवांनीच रचले हे स्पष्ट आहे.

भेटूच भाग 6मध्ये…..

अधिक माहितीसाठी डॉ. प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा.

या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात वृक्षारोपण

Next Article

एका फर्जंद मावळ्याच शिवाजी राजांस पत्र

You may also like