वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ४

Author: Share:

सिंह राशीत सूर्य असतांना पावसाळा असतो असे ऋग्वेद 3-9-4, 5-83-3, 9-89-3 म्हणतो. त्यावरून या ऋचांचा काळ 6480वर्षे इतका प्राचीन ठरतो.

वृषभ राशीतील सूर्य वळिवाचे पाऊस आणतो असे ऋ. 6-47-5 सांगतो, त्याचा काळ 25000वर्षापूर्वीचा दिसतो. ऋ. 7-55-7सांगते की वृषभ राशीत सूर्य असतांना हेमंत ऋतु असतो. ही स्थिती 12960वर्षापूर्वी होती.

वृषभ राशीत सूर्य असतांना शरद् ऋतु ही स्थिती ऋ. 1-181-6मध्ये सांगितली आहे; त्याचा काळ 17280वर्षापूर्वीचा ठरतो.
कन्या राशी जलधारक व जलसंचय करणारी ऋ. 6-49-7मध्ये वर्णिली आहे. हा कन्येत पावसाळा असण्याचा काळ 8640वर्षे इतका प्राचीन दिसतो.

मेसेज राशीत सूर्य असतांना पावसाळा ऋ. 10-27-17मध्ये दाखविला असून तो काळ 21600वर्षापूर्वीचा आहे. ऋ.1-52-1सांगतो की सूर्य मेषेत असताना वसंत ऋतु असे. हा काळ 25000वर्षे इतका प्राचीन दिसतो.

धनु राशीतील सूर्य पावसाळा आरंभे असे ऋ. 1-33-4दर्शवते व तो काळ 12960वर्षे इतका प्राचीन दिसतो.
वृषभ अन् मिथुनेतील सूर्य पाऊस पाडतो असे ऋ. 1-131-3दर्शवते, त्याचा काळ 23720वर्षे इतका प्राचीन दिसतो.

ऋ. 1-89-6येथील शांतीमंत्र संपातबिंदु व अयनान्त बिंदु दर्शवतात व त्याचा काळ 8424वर्षापूर्वीचा दिसतो. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः| स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः| स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः| स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||6|| यातील इंद्र म्हणजे कृष्णयजुर्वेद 4-4-10अनुसार इंद्र ही देवता असलेले चित्रा नक्षत्र होय. इंद्र ही पर्जन्य देवता असल्यामुळे चित्रा नक्षत्री दक्षिणायनारंभ होता. पूषा ही देवता असलेले नक्षत्र रेवती येथे उत्तरायणारंभ होता. या दोघांमधील शरत्संपात तार्क्ष्य म्हणजेच विष्णु ही देवता असलेले श्रवण नक्षत्र येथे होता. वसंत संपात बृहस्पति ही देवता असलेल्या पुष्य नक्षत्री होता. त्यामुळेच वरील कालनिश्चिती करता आली.

ऋ. 4-26-5श्येन म्हणजे मीन राशीत पर्जन्यकाल दर्शवतो व त्याचा काळ 19440वर्षे इतका प्राचीन ठरतो.
असे विविध काल ऋग्वेदातूनच दिसतात. साहजिकच विविध काळच्या ऋषींनी त्यांचे वेळची वस्तुस्थिती लिहून ठेवलेली दिसते. एकाच वेळी देवाने या वेगवेगळ्या घटना लिहिल्या असणे शक्य नाही.

केवळ एका देवानेच वेद लिहिले असते तर वेदांच्या विविध भागात मतभेद दिसले नसते. एक देव एकच मत मांडेल, भिन्न मते भिन्न ठिकाणी मांडणार नाही. पण तशी भिन्नता दिसते. ऐतरेय उपनिषद् सांगते की सृष्टि उत्पन्न होत असताना अंभ व मरीचि बनल्यानंतर प्रथम ‘मर’ बनले व मग ‘आप’ बनले. तैत्तिरीय उपनिषद् म्हणते की आकाश व वायु बनल्यानंतर आधी आप व मग पृथ्वी बनली. ही दोन वेगळ्या ऋषींची मते आहेत, एकच देव अशी दोन मते मांडणार नाही, आणि जर मांडली तर तो देव ठरणार नाही.

ऋग्वेद 10-10येथे यम-यमी संवाद आहे. त्यात यम-यमी हे बंधु-भगिनी आहेत. भावाबहिणीनी लग्न करणे योग्य नाही असा नवा नियम यमाने केल्याचे त्यात सांगितले आहे. हा नियम देवाने का नाही केला? यमी म्हणते, ‘देव सुद्धा त्याज्य व निषिध्द कर्मे करतातच’. यम म्हणतो, ‘पूर्वजकृत पाप आम्ही करणार नाही’. यावरून त्या दोघांचे पूर्वज होते हे स्पष्ट दिसते. याचा अर्थ त्यांचे अगोदर मानव होतेच. साहजिकच सृष्टि उत्पत्तीनंतरचा हा संवाद आहे. तो देवाने लिहिला असेल का?

वेदांच्या अर्थाविषयी वाद आहेत हे महाभारतापासून प्रख्यात आहे. देवाने वेद लिहिले तर वाद असण्याचे कारणच नाही. पण पूर्वीपासून आजपर्यंत वाद आहेत. साहजिकच वेद देवनिर्मित नव्हेत.

भेटूच भाग 5मध्ये…..
अधिक माहितीसाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का?
लेखक- डॉ.प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

दिडोंरी तालुक्यात पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात पाच ते सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस पडत असल्याने शेती कामांना वेग

Next Article

सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद यांच्या वतीने शालेय लेखन साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 

You may also like