वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ३

Author: Share:

वेद घेऊनच सृष्टीच्या आरंभी देव अवतरला असे काहीजण म्हणतात. मग सृष्टीच्या आरंभी कागद होते कां? वेद लिहिले होते कां? देवाने वेदाचे पुस्तक कुणाला दिले? या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?

वेद म्हणजे ज्ञान. ज्ञान अनादि असते म्हणून वेद हे अनादि आहेत असे फार तर म्हणता येईल. अनादि म्हणजे ज्याला आरंभच नाही असे नव्हे तर ज्याचा आरंभ ठरविता येत नाही असे वेद आहेत हे म्हणणे उचित ठरेल.

वेद जर अनादि, सृष्टी उत्पन्न झल्यापासूनच आहेत असे मानले तर ऋभु हे मानवच होते व त्यांना त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी देवत्व दिले हे वेदात कुणी लिहिले किंवा रचले? ऋ.1-110-2,4; 3-60-3; 4-33-11 येथे हे स्पष्ट लिहिले आहे. त्याचा अर्थ ऋभूंच्या नंतरच हे कुणीतरी लिहिले असले पाहिजे. म्हणजे देवाने सृष्टी रचतांना हे लिहिलेले नाही.

वेद जर अनादि मानले तर व्यासांनी वेदांची व्यवस्था लावली हे कसे? देवाला व्यवस्था लावता येत नव्हती कां? कृष्ण यजुर्वेद ओकून याज्ञवल्क्याने शुक्ल यजुर्वेद रचला हे सगळे वेदाभिमानी मानतात. देवनिर्मित कृष्ण यजुर्वेद ओकला म्हणून याज्ञवल्क्यांना काय शिक्षा झाली? याज्ञवल्क्यांनीच शुक्ल यजुर्वेद रचला हे सर्वमान्य आहे; म्हणजे तो देवनिर्मित नाही, अनादि नाही. महाभारतानंतर याज्ञवल्क्याने तो रचला हेही सर्वमान्य आहे. तसेच इतरही वेद देवनिर्मित नाहीत हे मानणे उचित नव्हे कां?

अनंत काळच्या प्राचीन ऋचा नष्ट होताहेत हे पाहून व्यासांनी चार शिष्य हाताशी धरून वेदांची व्यवस्था लावली; म्हणून त्यांना व्यास म्हणू लागले. ‘विव्यासति वेदान् यस्मात् स व्यास इति स्मृतः|’ वेद जर देवनिर्मित होते तर ते नष्ट कसे होऊ लागले? व्यास नामक माणसाने त्यांची व्यवस्था लावण्याची पाळी कां आली? देवाला ती व्यवस्था कां नाही करता आली? प्रथम मंडलातील अनेक सूक्ते त्रुटित व संदर्भशून्य आहेत. देवनिर्मित वेदांची अशी अवस्था कां झाली? ही त्रुटी कालौघात पुष्कळ भाग नष्ट झाल्यामुळे आली असे सगळे वेदतज्ञ म्हणतात. प्रथम मंडलातील 99व्या सूक्तातील बराच भाग नष्ट झाला असल्याचे ‘ऋग्वेद सर्वानुक्रमणी’ मध्ये स्पष्ट केले आहे.

ऋग्वेदाच्या मूळ संहितेत नसलेली पण उत्तर कालात अंतर्भूत झालेली सूक्ते खिलसूक्ते नावाने प्रख्यात आहेत. ही मानवांनी रचली ना? कां तीहि देवाने नंतर आठवण झाली म्हणून पृथ्वीवर येऊन लिहिली?

वेद म्हणजे ज्ञान. अनंत काळाचे ज्ञान ऋषींनी ऋचांमध्ये सांठविले आहे. स्वतःला झालेले ज्ञान इतरांना मिळावे म्हणून ही यातायात ऋषींनी केली, देवाने नव्हे. त्या ऋचांमध्ये आलेल्या वर्णनांवरून त्या त्या ऋचांचा काळ ठरविता येतो. सबंध वेदांमध्ये विविध काळांची वर्णने सापडतात, एकाच काळाची ती वर्णने नव्हेत. देवाने सृष्टी उत्पन्न केली तेव्हाच जर वेद निर्मिले असते तर हे विविध कालखंड वेदात दिसलेच नसते, एकच काळ दिसला असता.

भेटूच भाग 4मध्ये…..
अधिक माहितीसाठी डॉ..प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का?
लेखक- डॉ..प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

‘चला, वाचू या’च्या ३१ व्या पुष्पामध्ये अश्विनी मुकादम व ‘अथांग आवली’

Next Article

भरपावसातही श्रमजीवीचे सैनिक आंदोलनात

You may also like