वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग २

Author: Share:

नांव न सांगता केलेले काम दुर्लक्षित होते, पण वेद दुर्लक्षित झालेले नाहीत, उलट त्यांचा बहुमानच सगळीकडे केलेला दिसतो; म्हणून ते देवाने रचले असे काहीजण म्हणतात. परंतु नांव न सांगता वेदात सूक्ते दिलेलीच नाहीत. प्रत्येक सूक्ताचे आरंभी सूक्तकर्ता कोण आहे ते सांगितले आहे.

या मुद्यावर काहीजण म्हणतात की ऋषींची नांवे वर लिहिली असली तरी मी हे सूक्त रचले असे ऋषींनी म्हटलेले नाही. पण त्यामुळे ते सूक्त ईश्वराने रचले असे ठरत नाही. काही जण म्हणतात की ऋषींनी ऋचा ऐकल्या असे ऋषीच म्हणतात. हे विधान तर निखालस खोटे आहे कारण ऋषींनी तसे विधान कुठेही केलेले नाही.

वेदांना ‘अपौरुषेय’ असे म्हणण्यात ते कुणा पुरुषाने रचलेले नाहीत, तर ईश्वराने रचले आहेत असा भाव असतो. पण पुरुष हा शब्द आत्मा किंवा ईश्वर या अर्थाने वेद-वाङ्मयात सर्वत्र वापरलेला दिसतो. मुंडकोपनिषद् 2-5 येथे ‘प्रजाः पुरुषात् संप्रसूताः’ असे म्हटले आहे. त्यात अग्नि, सूर्य, सोम, इ. सर्व पुरुषाने उत्पन्न केले आहे असे म्हटले आहे. पुमान् रेतः सिंचति’ असे त्याच मंत्रात म्हटले आहे. तेव्हा पुमान् म्हणजे माणसातला नर वेगळा व पुरुष म्हणजे ईश्वर वेगळा असेच स्वच्छ सांगितले आहे. साहजिकच वेद अपौरुषेय ठरविले तर ते ईश्वराने रचलेले नाहीत असेच ठरते.
‘दिव्यो हि अमूर्तः पुरुषः’ असे मुंडक 2-2 येथे म्हटलेले आहे. पुरुष अमूर्त असल्याने तो ईश्वरच ठरतो. तेव्हा पुरुषाने म्हणजे ईश्वराने रचलेले नाहीत हेच निश्चित ठरते. अशा अर्थाने मुळात कुणा विचारवंताने वेद हे अपौरुषेय आहेत असे म्हटले असावे पण पुढे कुणी तरी अपसमज करून घेतला असावा.

‘पुरुष’ हा शब्द ईश्वर या अर्थानेच पतंजलींनी योगदर्शनात 1/16 व 3/35 येथे वापरलेला आहे.

पुरुष म्हणजे कुठलाही जीव असेही उपनिषदावरून दिसते. ‘स यश्चायं पुरुषे यश्च असौ अदित्ये स एकः|’ असे तैत्तिरीय उपनिषद् ब्रह्मानंद वल्ली, अनुवाक 8, मंत्र4 येथे म्हटले आहे. ‘तो जो या पुरुषात असतो आणि जो या आदित्यात असतो तो एकच’ असा याचा अर्थ आहे. हे वाक्य ईश्वर रचेल कां? ‘मीच पुरुषात आणि आदित्यातही असतो’ असे ईश्वर म्हणेल. सदरच्या वाक्यावरून दिसते की कुणा माणसाने हा शोध लावला आणि तोच असे उद्गारला.

काही जण म्हणतात की ईश्वराचे अस्तित्व जाहीर करण्यासाठीच वेद रचले आहेत. पण अशा अर्थाची ऋचा वेदात मिळत नाही. तरीही वेदांनी ईश्वराचे अस्तित्व मानले आहेच हे निर्विवाद आहे. साहजिकच वेद ईश्वरनिर्मित नाहीत. कारण ईश्वर स्वतःचे अस्तित्वाविषयी शोध घेत बसणार नाही.

ईश्वराचे ज्ञान वेदांवरून होते असे काहीजण म्हणतात, पण कुठल्या ऋचा ईश्वरासंबंधी ज्ञान देतात हे कुणीच सांगत नाही. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग वेद सांगतात असेही म्हणतात, पण कुठल्या ऋचा तो मार्ग दाखवतात?

वेद अनादि आहेत, त्यामुळे वेदकाळ ठरविण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे असते असेही काही जण म्हणतात. वेद अनादि आहेत हे सांगणारी एकही ऋचा वेदात नाही. ऋग्वेदातील नासदीय सूक्त सांगते की विश्वारंभी सत् नव्हते. वेद हे सत् आहेत असे सगळे तज्ञ म्हणतात. सत् असलेले वेद विश्वारंभी नव्हते हे वेदातील नासदीय सूक्तावरून स्पष्ट दिसते. साहजिकच वेद आनादि नाहीत. नासदीय सूक्त तर स्पष्टच म्हणते की सृष्टी निर्माण झाली तेव्हा देव नव्हते आणि सृष्टी कशी निर्मिली ते देवसुद्धा सांगू शकणार नाहीत; कारण देव सृष्टीनंतर निर्मिलेले आहेत. वेदात इतके स्पष्ट सांगितलेले असूनही देवाने सृष्टी आरंभतांनाच वेद सांगितले हे म्हणणे वेदविरोधी ठरते आणि तर्कदुष्टही ठरते.

ऐतरेय उपनिषद् सांगते की प्रथम ईश्वराने गाय निर्मिली, मग घोडा निर्मिला व सरतेशेवटी मनुष्य निर्मिला. वेद हे माणसांसाठी आहेत, इतर प्राणी वेद वाचू शकत नाहीत. तेव्हा सृष्टीच्या आरंभीच वेद देवाने निर्माण केले हे म्हणणे असत्य अन् वेदविरोधी ठरते.

भेटूच भाग 3मध्ये…..
अधिक माहितीसाठी डॉ..प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का?
लेखक- डॉ..प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

११ जुलै रोजी नाशिक येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाशिक जिल्ह्यातील चेअरमन, संचालकांचा मेळावा

Next Article

आजची तरुणाई आणि सावरकर…

You may also like