वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग १

Author: Share:

वेदांचा काळ ठरविण्याचा प्रयत्न जगभर चालू आहे. मॅक्स मुलर व लो.टिळक यांचे पासून आजपर्यंत हे प्रयत्न चालू आहेत. मीहि गेली कित्येक वर्षे तो खटाटोप करून यश मिळविले आहे. ज्योतिर्गणिताचे अनेक पुरावे देवून ऋग्वेद काळ हा इसवी सनपूर्व 25000वर्षे इथपासून 6000इ.स.पूर्व पर्यन्त इतका पसरला असल्याचे सिद्ध केले आहे. खूप पुरावे मी देत असल्याने विचार करणारी माणसे माझा काळ मानतात; परंतु भाविक लोक मात्र तो मानायला तयार होत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की वेद हे अपौरुषेय व ईश्वरनिर्मित असून ते अनादि आहेत. त्यांचा काळ सृष्टिनिर्मितीच्याही आगोदरचा आहे. या मतासंबंधी येथे विचार करू.

एका विद्वानाने तर परिसीमा गांठली व म्हटले की सृष्टि निर्माण केल्याबरोबर ईश्वर अवतरला ते वेदांचे पुस्तक बरोबर घेऊनच! पुस्तक घेऊन ईश्वर अवतरला या विधानात ईश्वर हा सगुण साकार आहे हे गृहित धरले आहे आणि वेदांमध्ये ईश्वर निर्गुण निराकार असा सांगितला आहे; सगुण साकार नव्हे. वेदांचे पुस्तक बरोबर घेतले होते त्या अर्थी कागद होते. पण वेदांमध्ये कागदाचा उल्लेखही नाही. वेद हे मुखोद्गत केले जात हे सर्वश्रुत आहे. सृष्टिच्या आरंभी मानव जात नव्हती, अन्य प्राणी होते हे वेदच सांगतात. {ऐतरेय उपनिषद 1-2-3} मग वेदांचे पुस्तक ईश्वराने कुणासाठी आणले? हा प्रश्न येतो. अन्य प्राणी पुस्तके वाचत असत असे वेदाने कुठेच म्हटलेले नाही. भावनाभरात वेदविरोधी विधाने करणे योग्य नाही हेही या विद्वानांना कळले नाही.

वेद जर देवनिर्मित असते तर त्यात समाज्ञा असावयाला हव्या होत्या, तशा वेदांत नाहीत. समाज्ञा म्हणजे माणसाने असे वागावे, तसे वागू नये अशी विधाने वेदात नाहीत. तशी विधाने उपनिषदात आहेत. {तैत्तिरीय उपनिषद्, भृगु वल्ली, अनुवाक् 7-10} अशा समाज्ञा गुरुने शिष्यांना दिलेल्या आहेत हे उपनिषदांवरूनच स्पष्ट दिसते. ‘ही भार्गवी वारुणी विद्या आहे’ असे तैत्तिरीय उपनिषदात भृगुवल्ली अनुवाक् 6मधे स्पष्ट म्हटले आहे. त्याचा अर्थ ती भृगुने आपला पिता जो वरुण त्याचेकडून घेतलेली विद्या होती. हेही तैत्तिरीय उपनिषद् अनुवाक् 5मध्ये स्पष्ट केले आहे. ही विद्या ईश्वराकडून मी ऐकली असे कुठलेही उपनिषद् म्हणत नाही. भृगु वरुणाकडे विद्या शिकायला गेला तेव्हा वरुणाने त्याला तप करायला सांगितले. तसे तप केल्यावर भृगुला ज्ञान स्फुरले.

काही विद्वान म्हणतात की वेद हे ऐकले गेले, ते कुणी लिहीलेले नाहीत. परंतु वेद किंवा श्रुति ईश्वराकडून ऐकल्या असे एक तरी विधान वेदात आहे कां? वेदांना श्रुति म्हणतात, कारण त्या ऋचा गुरुमुखातून किंवा ऋषिमुखातून ऐकत असत, ईश्वरमुखातून नव्हे. लेखनकला निर्माण होण्यापूर्वी ऋषीने सांगायचे अन् शिष्यांनी ऐकायचे हीच ज्ञानदानाची रीत होती. ऐकल्यावर ऋचा मुखोद्गत करत आणि पुढल्या पिढीला ऐकवत. या रीतीमुळे श्रुती हे नाव रूढ झाले आहे. पण हे समजून न घेता श्रुति या नांवामुळे अपसमज कुणीतरी करून घेतला व अर्थ काढला की देवाने वेद सांगितले व ऋषींनी ऐकले. हा अपसमजच पुढे पसरत गेला व सर्वत्र रूढ झाला.

वेद मी लिहिले असे कुणी म्हणत नाही म्हणून ते अपौरुषेय आहेत असे म्हणणारे एक विद्वान मला भेटले. पण वेद हे कुणा एकाने रचलेलेच नाहीत. अनेक ऋषींनी वेदातील ऋचा व सूक्ते रचलेली आहेत हे वेदातच प्रत्येक सूक्ताच्या आरंभी सांगितले आहे. ते अमान्य करणे म्हणजे वेदांनाच खोटे ठरविणे आहे. त्या नामनिर्देशांवरून तसेच ऋचेतील विधानावरून निदान त्या ऋचेचा काळ तरी निश्चितच ठरविता येतो.
भेटूच भाग 2मध्ये…..

अधिक माहितीसाठी डॉ.प.वि.वर्तक लिखित ग्रंथ ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ अभ्यासावा. या ग्रंथांसाठी संपर्क साधावा विधिज्ञ श्री.पुष्कर वर्तक 9823530501 यांचेशी.

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का?
लेखक- डॉ.प.वि.वर्तक
संकलन- गो.रा.सारंग(9833493359)


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

सन २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्त्पन्न दुप्पट करण्यासाठी भाजपा शासन कटिबद्ध – सुरेश बाबा पाटील

Next Article

दुहेरी निष्ठा: हिंदूंची आणि मुसलमानांची

You may also like