वसंत कानेटकर

Author: Share:

नाट्यक्षेत्रातील अनेक प्रसिद्ध नावांपैकी एक म्हणजे वसंतराव कानेटकर. वसंत कानेटकर यांचा जन्म २० मार्च १९२० साली सातारा येथील रहिमतपूर येथे झाला. त्यांचे माध्यमिक व उच्चशिक्षण पुणे व सांगली येथून झाले. ईंग्रजी विषयात त्यांनी एम. ए. केलं होतं. नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयात तब्बल २५ वर्ष अध्यापन केले. विषयाचे सखोल ज्ञान, शिकवण्याच्या पद्धतीमुळे ईतर शाखेचे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या लेक्चरला उपस्थित राहायचे. २५ वर्ष अध्यापन क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी नाट्यलेखनासाठी हे क्षेत्र सोडले. कवी गिरीश हे कानेटकर यांचे वडील. त्यामुळे कानेटकरांना काव्य व साहित्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. कानेटकर यांना वि.स. खांडेकर यांचा सहवास लाभल्याने अप्रत्यक्षपणे कानेटकरांवर त्यांचा प्रभाव पडला. याचाच चांगला परिणाम कानेटकरांच्या साहित्यकृतीवर झाला.

नाशिकला आल्यावर कानेटकर हे कुसुमाग्रजांच्या सहवासात राहिल्याने कानेटकर यांच्यातील साहित्यिक फुलत गेला. नाटककार अशी ओळख असलेले कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कांदबरीपासून लेखनाची सुरुवात केली. अवघ्या १८ व्या वर्षी “जन्माचे गुलाम” ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. यानंतर १९५० साली “घर” ही कादंबरी प्रकाशित झाली. यानंतर “पंख” , “पोरका” , “तेथे चल राणी” अश्या लिखित व अनुवादीत कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या.  कानेटकरांच्या स्वतंत्र लिखाणशैलीने त्यांच्या कांदबकरीने मराठी कादंबरीला एक वेगळ्या ठिकाणी पोहचवण्याचा प्रयत्न केला. तसेच “लावण्यमयी” हा कथासंग्रह खूप गाजला. यानंतर कानेटकरांनी नाट्य क्षेत्रात प्रवेश केला, व या क्षेत्राचे सर्वेसर्वा झाले. ३० वर्षाच्या योगदानात त्यांनी जवळपास ४० नाटकं व काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत पाडल्या. प्रेक्षकांचा आवड जाणणारे प्रयोगशील नाटककार म्हणून ते प्रसिद्ध झाले.

“वेड्याचं घर उन्हात” हे पहिले नाटक मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. यानंतर “देवांचे मनोराज्या”, “प्रेमा तुझा रंग कसा” , रायगडाला जेव्हा जाग येते”, “मतस्यगंधा”, अश्रूंची झाली फुले”, यासारखी अनेक नाटके त्यांनी लिहिली. केवळ लिहीली नाही तर प्रत्येक नाटकात वेगवेगळे प्रयोग हाताळले. कानेटकरांच्या संवादात भाषेची लवचिकता, उत्कटता ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवत. मराठी रंगभूमीला स्थैर्य देणाऱ्या मोजक्या नाटककारांच्या यादीत कानेटकरांचे नाव अग्रेसर समजले जाते. १९८८ साली ठाणे येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला. कानेटकरांचा अखेरच्या काळात ते लिहीत असलेली नाटकं ही अर्धवट राहिली. ३० जानेवारी २००१ साली कानेटकरांचा मृत्यू झाला.

Previous Article

मराठी भाषा

Next Article

मर्ढेकरांच्या कविता

You may also like