वांगणी चे रहस्य…

Author: Share:

आपण डोळ्यांनी पाहू शकतो. त्यामुळे आपलं जीवन सुसह्य आहे. हव्या त्या पद्धतीने आपण प्रवास करु शकतो. पण ज्यांच्या दृष्टीपटलावर कायमचा अंधार आहे. त्यांचं काय? रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेक अंधांना गाणी म्हणताना, पैसे मागताना किंबहुना जीवनावश्यक वस्तू विकत घेताना पाहिलयं. आपण त्यांना भिकारी समजून मोकळे होतो. परंतू अंधांच्या विश्वात डोकावून बघितल्यास त्यांच्या जगण्याची दाहकता अन् जगण्याची उमेद आपल्या लक्षात येते. अंधांच्या विश्वाचा रेल्वेप्रवास करताना त्यांना येणाऱ्या शारिरीक समस्या अन् व्यवसायातील अडचणी यातील समस्यांचा खोलवर वेध घेण्याचा प्रयत्न आमच्या परिवर्तन ग्रुपने केला.

वांगणी परिसरात जवळपास ३०० ते ३५० अंध लोक राहतात. पण एवढ्या मोठ्या संख्येने एवढे अंध स्थिरावलेचं कसे हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आम्ही या विषयावरती अभ्यास करताना पहिल्यांदा वांगणी या परिसराचा अभ्यास केला अन् त्याच्यातून समोर आलं वांगणीचं रहस्य. या लेखनमालेच्या पहिल्या भागात आपण वांगणीच्या रहस्याचा वेध घेणार आहोत…


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


वांगणी चे रहस्य…

वांगणी हे ठिकाण ठाणे जिल्यात आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे पट्ट्यातील एक छोटंसं शहर आहे. निम ग्रामीण भागात वांगणी चा समावेश होतो. वेगाने या ठिकाणी विकास होत आहे. रस्ते बांधणी, घरांची निर्मिती, पायाभूत सोयी सुविधा विकसित होत आहेत. इथे राहणारे बरेचशे लोक मजुरीचा व्यवसाय करतात. तर काही स्थानिक नागरिक शेती करतात.

मुंबई पासून ७० किलोमीटर वांगणी आहे. वांगणी रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळी व पत्र्याची घरे आहेत. याठिकाणी राहणारी बहुतांश वस्ती हि दृष्टिहीन लोकांची आहे. बरेचसे दृष्टिहीन बांधव अनेक वर्षांपासून वांगणी मध्ये वास्तव्यास आहेत.

अंध बांधवांची ची वांगणीतील पश्चीमेला वस्ती आहे. वांगणी मध्ये राहणाऱ्या बऱ्याचशा अंध बांधवांची उपजीविका ही रेल्वे प्रवासादरम्यान केलेल्या वस्तू विक्रीतून होते. मुलाखतीदरम्यान एका अंध व्यक्तीने सांगितले कि ते “साधारण 1993 ते 94 पासून इथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वांगणी मधील वास्तव्याचे कारण विचारले असता त्यांनी असे सांगितले की पंचवीस वर्षांपूर्वी इथे जागेचे भाव खूप कमी होते. तसेच जागाही मुबलक प्रमाणात होती. अगदी 300 ते 500 रुपये भाड्याने घर घेऊन इथे राहण्याची सोय होणे शक्य होतं. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन पासून जवळ असल्यामुळे रिक्षाचे भाडेही खर्च होत नाही.या सर्व कारणास्तव आम्ही स्वबळावर वांगणी मधे आमची वस्ती वसवली” असे त्यांनी सांगितले.

1994 पासून ते आजपर्यंत वांगणी ग्रामपंचायतीने घरकुल योजनेच्या माध्यमातून 25 दृष्टिहीन बांधवांना घरे उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितलं आणि वांगणी मध्ये राहणाऱ्या एकूण अंधांची संख्या त्यांच्या मते साडेतीनशेच्या वर आहे. वांगणी मध्ये संशोधनादरम्यान पाहणी करत असताना अनेक प्रकारची निरीक्षण आम्ही नोंदवली.

वांगणीमध्ये दृष्टीहीनांना ग्रामपंचायतीने ब्रेल ग्रंथालय उपलब्ध करुन दिलेले आहे. सदर ग्रंथालय वांगणी स्थानकाच्या पूर्वेला आहे. या ग्रंथालयाच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थी अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. सदर उपक्रम वर्षभर ग्रंथालयाच्या माध्यमातून चालतात असे ग्रंथपाल श्री. मुंजाबा यांनी सांगितले. मुलाखतीदरम्यान असे आढळून आले की, वांगणी मधील अंधांची शैक्षणिक पात्रता कमी अधिक आहे. मुलाखतीदरम्यान काही अंध बांधव अगदीच निरक्षर आढळून आले, तर काही अंध बांधव उच्चशिक्षित म्हणजे पदवीधर देखील सुद्धा होते.

उच्चशिक्षित असून देखील सुद्धा त्यांना नोकरी न मिळाल्यामुळे बेरोजगार असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. वांगणी शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकप्रकारचे उपक्रम अंधांसाठी राबवले जातात. खूप फायदा होतो असे स्थानिक रहिवाशी श्री. मुंजाबा यांनी सांगितले. ज्यामध्ये रेल्वे प्रवासादरम्यान स्वतःची काळजी कशी घ्यायची, गर्दीच्या वेळेला कोणती खबरदारी घ्यायची अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते.

मुलाखती दरम्यान असे आढळले की, भाऊ पाटील हे समाजसुधारक होते, त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी वांगणी याठिकाणी दृष्टिहीनांसाठी वस्ती निर्माण केल्याचे संदर्भ मिळाले. एकूणच वांगणीमधल्या दृष्टिहीन लोकांच्या दैनंदिन जीवनावर जर आपण प्रकाश टाकला तर हे लक्षात येईल की, तेथील अंधलोक खऱ्या अर्थाने संघटित आहेत. याचे कारण ते एकमेकांना सातत्याने मदत करतात.मुलाखतीदरम्यान आम्ही संशोधकांनी पाहिले की,कुठेही जाताना ते एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून एकत्र जातात. तसेच एकमेकांना योग्य त्या पद्धतीने मदत देखील करतात.ज्यामध्ये वांगणी मध्ये आलेल्या नवीन दृष्टीहीनांना तेथील अंध बांधव व्यवसायातले बारकावे समजून देतात.

प्रशासकीय व शासकीय पातळीवर अंधांसाठी असलेल्या विविध योजनांचा परिचय करून देतात. ग्रामीण भागातून रोजगारासाठी आलेल्या दृष्टिहीन बांधवाना वांगणी मध्ये आपले वास्तव्य प्रस्थापित करणे सोपे जाते. वांगणी या शहरांमध्ये ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळा आहेत. अंधांचे प्राथमिक शिक्षण तिथेच होते आणि पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी ते शहराकडील महाविद्यालय अथवा अंधांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या प्रशिक्षण केंद्रात आपलं नाव नोंदवून व्यावसायिक प्रशिक्षण घेतात. मुलाखतीदरम्यान एका दृष्टिहीन युवकाने अंबरनाथ मधील “नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड” संस्थेच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा उल्लेख केला. त्याने इथूनच आपले औद्योगिक व्यावसायिक शिक्षण (ITI) पूर्ण केल्याचे सांगितले.

वांगणी मध्ये राहत असलेल्या दृष्टीहीनांना रेल्वे प्रशासनाने अलीकडच्या काळात पादचारी पूल उपलब्ध करून दिला असल्याने रेल्वे स्टेशन पर्यंत सुरक्षित रित्या पोहोचता येते.जवळपास सर्व अंध याचा वापर करतात. या पुलाचा वापर सर्व स्थानिक प्रवासी करतात.याबद्दल अंधांनी समाधान व्यक्त केले. तसेच या पुलामुळे अंधांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली. पूल नसताना अंध बांधव रेल्वे रूळ ओलांडून स्टेशन पर्यंत येत होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता.

पूल उपलब्ध झाल्याने हा धोका टळला. वांगणी हे रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे मुंबई व पुणे अशा दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेमधून व्यवसाय करणं शक्य होतं, असेदेखील त्यांनी सांगितले. काही अंध बांधव पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये सामान विक्रीचा व्यवसाय करतात. तर काही अंध बांधव मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये आपला सामान विक्रीचा व्यवसाय करतात. अशा प्रकारे वांगणी मधील अंधांची दैनंदिन जीवन पद्धती आह्रे.

(पुढील भागात वांगणी अन् मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधांची शैक्षणिक स्थिती व आव्हाने… )

@टिम परिवर्तन, पुकार संस्था मुंबई


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

‘बावन्न’कशी शिवसेना

Next Article

सैनिक

You may also like