Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

हीच ती वेळ हाच तो क्षण…समान नागरी कायदा

Author: Share:
समान नागरी कायदा, हा विषय फक्त एखाद्या राजकीयपक्षाचा निवडणूकपूर्व अजेंडा नाही, हा विषय तुमच्या आमच्याशी अत्यंत जवळचा, देशाच्या वर्तमान आणि भविष्यावर प्रचंड परिणाम पडू शकणारा विषय आहे. भाजपच्या अजेंड्यावर असल्याने मागील दोन वर्षे तो भारतीयांच्या चर्चापटलावर आहे. मात्र हा विषय फार जुनाही आहे आणि वेळोवेळी चर्चिला गेलेलाही. आज सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या तीन तलाक पद्धतीवर कायदा करण्याचा संसदेला हुकूम देत तोपर्यंत या प्रथेला स्थगिती दिल्याने, समान नागरी कायदा पुन्हा टेबलवर आला आहे. आणि दुरावस्थेला ठिगळे जोडण्यापेक्षा समान नागरी कायद्याची आणि त्यापायावर आधारित समान समाजाची रचना व्हावी हे आवश्यक आहे. 
विविध धर्माचे लोक एकत्र राहत असलेल्या देशात समान नागरी कायदा, हा कदाचित बऱ्याच भारतीयांना लांबचा पल्ला वाटत असेल, आणि असेलही! पण कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना तो तेव्हढा दूरच वाटणार नाही. अर्थात इथे प्रश्न फक्त कायद्याचा नाही, धार्मिकतेच्या जाणिवांचा ,धर्मशास्त्र मोठे की आधुनिक कायदे यातील वादाचा आहे. प्रचलित विचारांना भेद देणारा विषय मांडला गेल्यावर, आमच्या दुखावणाऱ्या भावनांचा आहे. लांबचा पल्ला गाठायचा आहे तो ह्या सर्वसंमती मध्ये! कायदा मोठा विषय नाही!
१९५५ मध्ये हजारो वर्षे हिंदू विचार, आचार आणि संस्कृती नियमन करणारे धर्मशास्त्रे (हिंदू कायदे धर्मशास्त्रे आणि स्मृतींमधून सांगितले आहेत) दूर सारून हिंदू विवाह आणि घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान हे आधुनिक कायदे आणले गेले, ते हिंदू समाजाने स्वीकारले. त्या प्रक्रियेत आधी मांडल्या गेलेलया हिंदू कोड बिलाला हिंदूनी विरोध केला. मात्र त्यानंतर आलेले हे चार कायदे हिंदूंनी स्वीकारले. आज आम्ही हिंदू त्याच कायद्याने

बांधील आहोत आणि आमच्या रितीरिवाजावर, वागण्यावर, लग्नासारख्या पवित्र बंधनावर हेच कायदे लागू होतात. तरीही आमच्या हिंदू असण्यावर, धर्माच्या अभिमानावर आणि आमच्या श्रीमंत प्राचीन इतिहासावर, वैचारिक वारशावर कुठेही फरक पडला नाही. आधुनिक कायदे, वैचारिकदृष्ट्या प्रगत हिंदू समाजाने हे कायदे स्वीकारले. इथे हे लक्षात घ्या, की हिंदू नेते आणि सनातन धार्मिक सुद्धा हे विचारात होते, की जर सामाजिक बदल करायचाच असेल तर फक्त हिंदूंसाठीच कायदा कशासाठी? सामाजिक बदल करायचा असेल, तर सर्व धर्मीयांसाठी कायदे केले पाहिजेत, किंवा समान नागरी कायदाच घेऊन का नाही? मात्र ह्या मुद्द्यावर आम्ही विकासाला बगल दिली नाही!

हिंदू कोड आले तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री होते आणि हिंदू कोड बिल बनवण्यामागे आणि १९४८ आणि १९५१ ला संसदेसमोर ठेवण्यामध्ये त्यांची खूप मोठी भूमिका होती. डॉक्टर स्वतः समान नागरी कायद्याबाजूनेच होते असे म्हटले जाते. अर्थात चार कायदे संमत झाले तेंव्हा ते सरकारमध्ये नव्हते. हिंदू कोड बिलाला ला विरोध का झाला हा आपला मुद्दा नाही, एवढेच इथे आपण लक्षात घेऊया, की चार आधुनिक कायदे हिंदूंनी स्वीकारले आहेत.
हिंदू विवाह आणि घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक आणि मायनॉरिटी आणि गार्डीयनशिप हे चार कायदे हिंदू धर्म मानणारे सर्व पंथांशिवाय, बौद्ध, जैन आणि शिखांना सुद्धा लागू आहेत. म्हणजे बौद्ध, जैन आणि शिखांना सुद्धा हे कायदे स्वीकारले आहेत. म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू धर्मियांना लागू नाही.
आता इतर धर्मियांचे काय?
ख्रिश्चनांसाठी भारतीय घटस्फोट आणि ख्रिश्चन लग्न कायदा आहे तर पारश्यांसाठी पारशी लग्न आणि घटस्फोट कायदा आहे. आपण फक्त लग्न आणि घटस्फोटापुरते बोलू.
कोणामध्ये आणि कशाप्रकारचे लग्न कायदेशीर आहे, कायदेशीर घटस्फोट घेण्यासाठी कुठल्या परिस्थिती असणे आवश्यक असते, घटस्फोट घेण्याची प्रक्रिया या सर्व तरतुदी या तिन्ही (हिंदू इंडियन आणि पारशी) कायद्यांमध्ये दिलेल्या आहेत.
आता महत्वाचे म्हणजे, हिंदू, इंडियन आणि पारशांसाठी असलेल्या कायद्यांमधील लग्न आणि घटस्फोटाविषयीच्या तरतुदी जवळ-जवळ समान आहेत. साधारणतः क्रुएलटी म्हणजे अत्याचार, ठराविक प्रकारचे असाध्य रोग, सात वर्षांपर्यंत नवऱ्याची माहिती न मिळणे इ  कारणासांठी पत्नी आणि पती एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात. याव्यतिरिक्त सामंजस्याने घटस्फोट सुद्धा उपलब्ध आहे. न्यायालय घटस्फोट अंतिम पर्याय मानते आणि आधी दोन्ही पक्षांनी दिलजमाई करावी असाच प्रयत्न असतो.
सांगण्याचा मुद्दा असा, की आजही मुस्लिम सोडून इतर धर्मीयांसाठी एकच कायदा आणायचे म्हटले, तरी तो आणता येईल, आणि तो पूर्णतः हिंदू कायद्याची प्रतिकृती बनवली तरीही उत्तम पद्धतीने कार्यरत असेल, आणि सद्यस्थितीतील समानतेमुळे, (मुस्लिम वगळता) कुणीही धर्म त्यावर आक्षेप घेणार नाही. थोडक्यात, आजच्या घडीला, मुस्लिम वगळता इतर धर्मीयांसाठी समान नागरी कायदा आणणे फारसे जड जाऊ नये.
म्हणजे प्रश्न उरतो फक्त, मुस्लिमांचा!  समान नागरी कायद्यासाठी भारतातील इतर सर्व धर्मियांची संमती कठीण नाही. फक्त आणि फक्त प्रश्न एकाच धर्माचा आहे, ही बाब अधोरेखित करण्यासाठी आहे. त्यामुळेच, समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यात तीन तलाक साठी कायदा करण्याचा संसदेला दिलेला आदेश उत्तम संधी आहे.

सध्या स्पेशल मॅरेज कायदा सुद्धा लागू आहे आणि तो सर्वधर्मियांसाठी आहे. ज्यात वरील कायद्याच्याच तरतुदींचा पुनर्प्रवेश आढळतो. मग प्रश्न येतो , की आजच्या निकालाला, किंवा समान नागरी कायद्याला विरोध मुस्लिम समाजाचा आहे कि फक्त मुस्लिम पुरुषांचा? कारण शरियत मध्ये तलाकचा पुरुषांना स्पेशल अधिकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायद्याची आवश्यकता याआधी सुद्धा बोलून दाखवली होती. १९८५ मध्ये शहाबानो केस वर जजमेंट देताना सर्वोच्च न्यायालयाने शासनाला हे आवाहन केले होते.
संविधानाच्या ४४ व्या कलमात  मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. म्हणजे संविधानकर्त्यांना आज नाही तर उद्या देशात समान नागरी कायदा यावा हे सुचवावयाचे आहे. अर्थात, प्रत्यक्ष हे कलम टाकतानाही वादावादी झाल्याचे उल्लेख आहेत. एक गट होता, ज्याला सामान नागरी कायदा आत्ताच आणणे आवश्यक आहे असे वाटत होते, आणि दुसरा गट त्याला विरोध करीत होता. कदाचित तत्कालीन परिस्थितीमुळे त्या गटाला तसे वाटत असावे. कारण, या विषयाचा समावेश, राज्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेला आहे, यातूनच संविधानकर्त्यांची मूक संमती दिसून येते.
धर्मांच्या वैयक्तिक बाबींमध्ये शासनाने किंवा न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, असे मत आज काहींनी व्यक्त केले. ते तकलादू आहे, हे १९५५ साली आलेल्या हिंदू कायद्यांनी दाखवून दिले आहे. विचार प्रगत आणि गतिमान असतील, तर धार्मिक भावनांचा आदर ठेवूनही, नवीन दिशा स्वीकारता येतात हे हिंदू समाजाने दाखवून दिले आहे, आणि मुस्लिम सोडून इतर धर्मियांनी सुद्धा या सामाजिक प्रगतीला पाठिंबा दिला आहे, कायदा स्वीकारला आहे.. आणि वर पाहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने असला तरी कायदा मूलतः समान आहे. थोडक्यात समान नागरी कायद्यासाठी सर्व धर्मियांनी संमती दिली आहे.
फक्त प्रश्न एकाच धर्माचा उरतो.
म्हणून शरियत पूर्ण आहे, किंवा धर्मात ढवळाढवळ नको ही जुनी करणे सोडून, त्या धर्माने प्रगतीच्या नवीन वाटेवर चालण्याची आवश्यकताही आहे आणि वेळही!
Previous Article

२३ ऑगस्ट

Next Article

घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून सुरु झालेल्या श्रावणसरींमुळे पिकांना जीवदान

You may also like