पंडित तुलसीदास बोरकर

Author: Share:

मराठी संगीत क्षेत्राला लाभलेली जी कलाकार मंडळी आहेत त्यात हार्मोनियम वादकांचे विशेष स्थान नेहमीच राहिले आहे. केवळ साथीसाठी असणारे हे वाद्य, जादुई बोटांकडे गेले की बोलू लागते, गाऊ लागते, हरकती घेऊ लागते.आरोहापासून अवरोहात सापासारखी जाणारी सुरावट गुप्त होऊन परत येते, तो डोळे मिटायला लावणारा अनुभव असतो. हार्मोनियम किंवा ऑर्गनचे सूर कानी पडले की मराठी रसिक मंत्रमुग्ध होतो तो यासाठीच! उत्तम हार्मोनिअम पटूच्या हातचे हार्मोनिअम ऐकणे ही एक सुश्राव्य संधी असते.

पंडित तुलसीदास बोरकर हे महाराष्ट्राला लाभलेल्या अशा जादुई बोटांपैकी एक सन्माननीय नाव. गोव्यातील बोरी या गावी जन्मलेले तुलसीदास लहानपणीच गोवा सोडून पुण्यात आले. प्रसिद्ध हार्मोनिअम वादक आणि संगीतकार मधुकर पेडणेकर यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे धडे गिरवले. त्यासाठी त्यांनी पुणे मुंबई रोज ये-जा केली आहे.

नाट्यसंगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व स्वरावटींना त्यांनी साथसंगत केली आहे. साथसंगत अशी असावी की पानी तेरा रंग जैसा, समोर बसलेला गायक जसा असेल तशी त्यांनी साथसंगत केली. हार्मोनियम सोबत ऑर्गन सुद्धा ते उत्तम वाजवायचे.

वागण्यामध्ये पंडितजी अत्यंत विनम्र होते आणि बोलताना सुद्धा विनोदी होते अशी आठवण त्यांच्या सोबतचे कलाकार सांगतात. त्यांचे शिष्य आठवण सांगताना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ते त्यांच्या स्तरावर जाऊन ते शिकवायचे. जनार्दन बोरकर यांचा माझ्यावर प्रभाव पडला असे ते सांगायचे. केशवराव कांबळे यांची संगत मला आदर्शरूप वाटली अशी आठवण ते सांगायचे.

२००६ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. याशिवाय गोवा शासनाचा पुरस्कार, २०१६ साली भारत गायन समाजपुरस्कार, बेळगावच्या सुरेल संवादिनी संवर्धन चा पंडित विठ्ठलराव कोरगावकर पुरस्कार, आयटीसी संगीत संशोधन अकादमीचा पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, संगीतकार पद्मश्री वसंत देसाई पुरस्कार, राम मराठे पुरस्कार, नटवर्य केशवराव दाते पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना पुरस्कृत केले गेले आहे.

  Next Article

कविता महाजन

You may also like