आजचा पाऊस आणि पहिले पाढे पंचावन्न

Author: Share:

तसा पावसाळा म्हणजे सगळ्याच जणांचा आवडत ऋतु. पावसाळा या ऋतुवर जेवढी गाणी लिहिली गेली तेवढी इतर कोणत्याही ऋतुवर लिहिली गेलेली मला तरी माहीत नाहीत. ‘गारवा’ यातील ‘पुन्हा ढग दाटून येतात पुन्हा आठवणी जाग्या होतात’ या ओळी म्हणजे आम्हाला पार nostalgic (जुन्या आठवणीत रममाण) करून टाकतात. पण हा ५ दिवस सलग चाललेला तुफानी पाऊस मात्र आम्हाला काही प्रेमाची नाहीतर कॉलेजची आठवण करून देणारा मुळीच दिसत नाही. झालीच कशाची आठवण तर २६ जुलै या दिवसाची आठवण करून देतो.

जेव्हा लहान होतो तेव्हा मला त्या दिवशी शाळेत सुट्टी मिळाली होती. ३ दिवस घरी बसून होतो. तेव्हा फक्त सहावीत होतो. त्या वयात महाभयंकर पावसाचे दुष्परिणाम ऐकून होतो, पण समजून नाही. तो पाऊस आणि हा पाऊस. मागच्यापेक्षा हा पाऊस थोडासा कमी तीव्रतेने पडला असेल, पण तीव्रता जाणवू लागली आहे. आणि हा असाच पडत राहिला तर पुढील दुष्परिणामही तसेच असतील.

तो पाऊस झाला आणि त्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात लोकांना त्याच पावसाची धास्ती बसली. धास्ती कसली, दहशतच ती. मुंबईचे नेते दरवर्षी सांगत होते की यावर्षी मुंबई तुंबणार नाही कारण आम्ही हे केलंय आणि ते केलंय. तसा २६ जुलै सारखा पाऊस परत झालाच नाही. त्यामुळे लोकांचाही यावर विश्वास बसलाच होता. आणि तसंही विश्वास न ठेऊन सांगतोय कोणाला !! मुंबईचे नेते बोलबच्चन देण्यात मश्गुल, मुंबईचे पहारेकरी निवडणूक जिंकण्यात मश्गुल आणि दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष हे प्रमुख विनोदी पक्ष झाले आहेत. निवडणूक जिंकणे आणि जास्तीत जास्त सत्ता स्वतःच्या हातात घेणे हेच सगळ्यांचे उद्दीष्ट झाले आहे. मग सत्ताधारी असेल वा विरोधी, याला झाकावा आणि त्याला उघडा करावा अशीच परिस्थिती.

या पावसाने करून दिलेली दुसरी आठवण म्हणजे ‘सोनू , तुला BMC वर भरोसा नाही काय ‘ हे आरजेने गायिले गाणे. (या गाण्याचा उल्लेख करण्याअगोदर मी माझ्या घरात कुठेही अळ्या नाहीत याची खात्री करून घेतली आहे). जेव्हा हे गाणे सगळीकडे व्हायरल झाले तेव्हा सत्ताधारी आरजेवर टीका करीत होते आणि पहारेकरी मज्जा घेत होते. विरोधी पक्ष नेहमीप्रमाणे सुस्त पडून होता. पण कोणालाच या गाण्यातील मार्मिक पण महत्त्वाचा अर्थ समजून घ्यायची गरज वाटली नाही. मुळात हे गाणे राजकीय विरोध म्हणून लिहिले गेले नसून आपल्या समस्या मांडण्यासाठी लिहिले गेले आहे, याचाच मुळात सर्वाना विसर पडला. मांडणारा कोणीही असेल पण त्याचे म्हणणे समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढणे हेच बाजूला राहिले. मतदार किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो , पण त्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या या त्याच असतात,या मुद्द्यालाच बाजूला सारले जाते. गाण्यात एक ओळ आहे की ‘पावसाळ्यात authorityची पोलखोल’. ती पोलखोल झालेली आहे. हिंदमाता, परेल हे मुंबई शहरी भागातील परिसर आणि संपूर्ण मुंबई उपनगर ठप्प झाले आहे. ठाणे, विरार, पनवेल या मुंबई लगतच्या शहरांची हीच अवस्था आहे.

या अवस्थेला कारण काय हे शोधण्यासाठी फार मोठे संशोधन अथवा अहवाल तयार करून काहीतरी मोठे करण्याची गरज नाहीये. साध्या सोप्या गोष्टी म्हणजे अतिक्रमण हटवणे, प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करणे,नद्या आणि नाले यातील गाळ काढणे जरुरीचे आहे. स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाली पण मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिका आजही ब्रिटिशकालीन सांडपाणी निस्सारण व्यवस्था वापरते. त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था ही तेव्हाच्या कालानुरूप तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय उत्कृष्ट होती. पण आजही यापण तशी व्यवस्था का तयार करू शकलो नाही, यावर कोणीही उत्तर देऊ शकत नाही. उत्तर तर सोडाच साधी चर्चा होऊ शकत नाही. आणि कोणी हा विषय मांडला तर एकतर त्याला विरोधी पक्षांचा एजंट ठरविणे किंवा आपल्या हातातील सत्ता वापरून त्याला दडपणे असले प्रकार केले जातात.

अतिक्रमण न हटवण्यामागे फक्त मतांचे राजकारण असते. उदाहरण द्यायचे झालेच तर बेहरामपाड्यातील अनधिकृत झोपड्या न हटवण्यामागे सत्ताधारी लोकांचा हात होता. त्याचाच फायदा म्हणून तिकडे सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक निवडून आले. नाहीतर या भागातील लोकांची विचारसरणी आणि सत्ताधारी पक्षाची विचारसरणी यात छत्तीसचा आकडा आहे. घाटकोपर येथील विद्याविहार स्टेशनजवळ असलेल्या अनधिकृत झोपडपट्टी बाबतीतही तसेच. येथील अर्ध्या झोपड्या निवडणूक होण्याअगोदर तोडण्यात आल्या आणि बाकीच्यांना सांगितले की आम्हाला मते द्या तुमच्या झोपड्या वाचवतो. यामध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात असलेले एक मंत्रीही सहभागी होते. ( मी अगोदर घाटकोपर येथेच नोकरीस असल्याने याविषयी स्वतः पाहिले आहे). हे फक्त उदाहरणादाखल दिले आहे. आपल्या परिसरात आपण जर नीट निरीक्षण केले तर आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींची अशी अनेक अनधिकृत कामे दिसतील.

हे झाले सर्व राजकारण करणाऱ्यांचे. पण सामान्य माणसाचे काय? आज सामान्य माणूसही या सर्व समस्यांना जबाबदार आहे. प्लास्टिकचा कचरा इकडेतिकडे फेकणारे आपण सर्वजण. बंदी असूनही प्लास्टिक पिशव्या वापरतो. आपण मते देतो ती जातीपातीच्या आणि धर्माच्या नावावर आणि आपल्याला सुविधा पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाची. वाह !!! जर जनतेने योग्य सुविधांचा पाठपुरावा केला तर सरकारला त्या द्याव्याच लागतील. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे असे आपण सगळेच म्हणतो. पण केवळ थोडासा पाऊस जास्त झाला तर ठप्प होणारे शहर आंतरराष्ट्रीय कसे असू शकते याचा विचार करावा.

मुंबई बंद पडली की जे श्रीमंत अथवा उच्च मध्यमवर्गीय असतात त्यांना याचा काहीच फरक पडत नसेलही कदाचित. पण ज्यांचे हातावर पोट आहे, आज कमावले की घरी जेवायला मिळेल अशा लोकांनी जायचं तरी कुठे !!! कित्येक लोकांच्या घरात पाणी शिरते तेंव्हा त्यांना होणार त्रास आपण कसे समजून घेऊ शकतो ? जर कोणाला काही वैद्यकीय उपचार हवे असतील आणि जर त्याला ते वेळेत मिळाले नाहीत होणाऱ्या नुकसानीची आपण कल्पना तरी करू शकतो का? अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संपत्तीची तरी गणनाच नाही. सरकारी आहेना, मग जाऊदे, हा दृष्टीकोन आपला असेल तर तर मग आपण या अव्यवस्थेत आहोत तेच योग्य आहे, असेच दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.

लेखक: विवेक वैद्य

Previous Article

३० ऑगस्ट

Next Article

लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथे होत असलेल्या अंधश्रद्धेच्या कुप्रथेविरुद्ध कारवाई होत नाही, पोलीस ढिम्म

You may also like