Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

टिळक: भारताला असंतोष व्यक्त करायला शिकवणारा शिक्षक

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

भारताचा स्वातंत्र्यपूर्व इतिहास अनेक महान विभूतींच्या पराक्रमाने भरलेला आहे. इतका, कि एकाच देशात साधारण १०० वर्षांच्या कालावधीत इतक्या प्रमाणात महात्म्यांनी जन्म घ्यावा हे कदाचित कुठेच न घडलेले अगतिक आहे. ‘अगतिक; यासाठी कारण कदाचित परिस्थितीने या लोकांना जन्मासाठी (दैव मानणाऱ्या लोकांसाठी) किंवा एकाच विचारातून प्रेरित कार्य (कर्मकारण भाव मानणाऱ्या लोकांसाठी) करण्यासाठी उद्युक्त केले असावे. मात्र नमूद करण्यासारखी बाब हि, कि जरी उद्दिष्ट्य एक असले तरी कार्यपद्धतीत आणि विचारसरणीतही कमालीची भिन्नता आढळून येते. असे असूनही प्रत्येक माणूस स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक होता.

विभिन्न विचारांती एकच ध्येय गाठण्याची सुद्धा इतिहासातील हि पहिलीच वेळ असावी. फ्रेंच राज्यक्रांतीत किंवा अमेरिकन राज्यक्रांतीत, ती मुळातच क्रांती म्हणूनच मान्यता पावली आहे, त्यामुळे संहार किंवा मनुष्य नाश करूनच ध्येयप्राप्ती सरळ आहे. मात्र भारताच्या बाबतीत , एकाच ध्येयासाठी विविध मार्गांचा वापर केला गेला आणि म्हणून कदाचित भारताचा स्वातंत्र्यलढा वेगळा आहे.

छत्रपती महाराजांच्या काळातही एकाच कालखंडात अनेक मोठी माणसे होउन गेली. स्वतः शिवाजीराजे एक असामान्य विभूती होतेच मात्र याच वेळेस बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळा, कोंडाजी फर्जंद, तानाजी मालुसरे यांसारखे शूरवीर होऊन गेले. स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेत या सर्वांच्या वेळोवेळीच्या असामान्य कार्याचा मोलाचा वाटा आहे. अर्थात, या सर्वांचे अनुसंधान बांधण्याचे श्रेय महाराजांच्या नेतृत्व कौशल्याला जाते.

मात्र आधुनिक स्वातंत्र्य युद्ध वेगळे आहे. इथे संपूर्ण कालखंडात एकच नेतृत्व नव्हते. काळाबरोबर नेतृत्व बदलले. नेतृत्वाबरोबर विचारसरणी बदलली. तरीही दोन्ही विचार समांतर कार्यरत होते. आज कोणामुळे स्वातंत्र्य मिळाले हा प्रश्न आम्हाला पडत नाही. कोणाचे किती योगदान होते यापेक्षा या सर्वांचे एकत्रित यश म्हणून आपण स्वातंत्र्याकडे पाहतो. आणि ते करीत असतानाच प्रत्येक व्यक्तीच्या विचारांना आणि या सर्वांच्या एकत्रित विचारांना राज्यशास्त्राच्या अभ्यासातून विविध अंगांमध्ये विभागून अभ्यासले जाउ शकते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीत किंवा अभ्यासात असणारा ‘इझम’ आपल्याकडे नाही, तरीही प्रत्येक विचार वेगळा आहे आणि स्वत:मध्ये स्वयंपूर्ण (दोषरहित नाही) आहे.

या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास फार रंजक आणि महत्वाचा आहे.

साधारणतः राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जहाल आणि मवाळ अशा दोन गटात हि विभागणी केली आहे.

१८८५ मध्ये काँग्रेस ची स्थापना झाली तेंव्हा मवाळ विचारसरणी फारच वेगळी होती. म्हणजे, चित्तरंजन दास प्रभृती अगोदरच्या काळातील मवाळ गटांचे मत, इंग्रजांचे राज्य हे भारताच्या इतिहासाला मिळालेली देणगी असून, इंग्रजांनी भारतावर राज्य करून भारतावर उपकारच केले आहेत या विचारधारेवर आधारलेले होते. इंग्रज पूर्वकाळात, भारत विविध राज्यांमध्ये विभागलेला होता आणि म्हणून त्यात एकसंधता नव्हती, इंग्रजांमुळे ती आली, कारण त्यांनी गुलामगिरीत का होईना पण राज्ये खालसा करून भारत हे एक अखंड राष्ट्र बनवले. आता या अखंड राष्ट्रात,इंग्रजांनी आपले राज्य ठेवावेच, मात्र त्यात फक्त भारताला अर्ध-संविधानिक दर्जा द्यावा (डोमिसाईल स्टेटस) आणि भारतीयांना थोडेसे प्रशासकीय स्थान द्यावे हि मवाळ गटाने मागणी केली. युरोपच्या अभ्यासाने आणि युरोपातील मानवी अधिकाराच्या अभ्यासाने भारावून गेलेली हि मंडळी होती, त्यामुळे त्यांना इंग्रज देवासारखे वाटणे स्वाभाविक होते. कदाचित आज आम्हाला हे माहीतही नसावे. मात्र अगोदरच्या काँग्रेसचे मत हेच होते. पुढे १९०७ साली काँग्रेस फुटली ती याच कारणामुळे.

कारण या अतिमवाळ विचारांमुळे काँग्रेस चे कार्य अगदीच मुळमुळीत बनले. टिळकांना हे मान्य नव्हते आणि त्यांनी अंतर्गत बंद पुकारले. भारतातील असंतोषाचा इथे जन्म झाला. एखादी गोष्ट चुकीची असेल तर तिला चुकीचे म्हणा, आणि त्याविरुद्ध आवाज उठवा, इतका मोठा कि शत्रूची कानशिले फुटली पाहिजेत, हा विचार भारताच्या आधुनिक इतिहासात नवीन होता. १८५७ चे युद्ध, त्याआधी आणि नंतरही विविध उठावांमध्ये आणि विचारांमध्ये दिसणारा असंतोष या सर्वाला एक स्वतंत्र वाट करून देण्याचे कार्य टिळकांनी केले. पुढे होऊ घातलेल्या क्रांती विचारांचा तो पायाच होता.

टिळकांनी पत्रकारितेचा एक अस्त्र म्हणून वापर केला. याआधी पेनाची ताकद कोणास ठाऊक नव्हती असे नाही, पण टिळकांच्या लेखणीत एक खदखद दिसते. आणि ती व्यक्त करताना, योग्य शब्दांचा समर्पक वापर, अग्रलेख आणि त्यांचे हेडिंग या सर्वाचा टिळकांनी फार चतुराईने उपयोग केला. आणि म्हणून कित्येक कारवायांमागे टिळकांची फूस आहे अशी शंका इंग्रज शासनाला असूनही ते कुठेही त्यांना अडकवु शकले नाहीत.

प्रत्यक्ष लेखणीचे सामर्थ्य आणि धग बंदुकांमध्ये उतरली पाहिजे या विचारातून त्यांनी तरुण सावरकरांच्या रक्ताला योग्य दिशा दिली आहे. शामजी कृष्ण वर्मा आणि इंडिया हाउस मह्डील कारवायांची माहितीही त्यांना असेल कुणी सांगावे? अर्थात, त्यांनी स्वतः एक मार्गदर्शक म्हणून हिरीरीने भाग घेतलेला दिसतो.  कारण आर्य चाणक्यांनी गुरूचेच कार्य करावे, चंद्रगुप्ताचे कार्य करण्यात स्वतःला अडकवू नये. म्हणून सावरकरांनी आयोजित विदेशी कापडाच्या होळीत त्यांनी भाषण केले, या आगीची धग इंग्रज पार्लमेंटला जाणवल्यावाचून राहणार नाही.

१८९८ च्या पुण्यातील प्लेगची साथ, हा असंतोष भडकावून गेली. टिळकांची पत्रकारिता येथे सलाखून निघाली आणि तिने क्रांतीची तलवार तळपवली. प्लेगच्या जांघेत आणि काखेत येणाऱ्या गाठी तपासण्यासाठी सरसकट पुरुष पोलिसांची नेमणूक करून आणि स्त्रियांना भर कुटुंबासमोर परक्या पुरषासमोर निर्वस्त्र होण्याचा लाजीरवाणा प्रसंग निर्माण करून इंग्रज शासनाने आपल्या असंवेदनशील कारभाराची चुणूक दिली. तेंव्हा इंग्रजांकडे स्त्री डॉक्टर नाहीत का? हा प्रश्न विचारणारे ते एकटेच होते. माणुसकीचा तोरा मिरवणाऱ्या इंग्रजांनी पुरुष डॉक्टरांच्या जागी पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करून कुठल्या माणुसकीचे दर्शन घडवले? हि असंवेदनशीलता मवाळ विचारांना दिसली नसेल का? कि असंवेदनशीलता भारतीयांना कळली नसेल का? टिळकांनी ‘प्रश्न विचारला’. टिळकांचे काम झाले होते. पोलिसांच्या जागी डॉक्टरांची आणि स्त्रियांची नेमणूक होऊन असंख्य भारतीय स्त्रियांची अब्रू वाचली. आणि हे दुष्कृत्य करणारा गोंद्या ढगाआड गेला. अशीच, बंगालच्या फाळणी नंतर त्यांनी स्वदेशी चळवळ सुरु केली.

टिळकांचा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा  इतका मोठा प्रश्न इंग्रजांसमोर निर्माण झाला कि इंग्रजांना त्यांना गप्प करण्यासाठी १९०८ मध्ये खुदिराम बोसांनी केलेल्या डग्लस च्या खुनानंतर राजद्रोहाचा खोटा खटला उभा करावा लागला.

अटकेनंतर टिळकांच्या कार्यात असा बदल झाला,कि त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट्य तेच राहिले, जरी मार्ग बदलला. त्यांनी शिक्षणावर भर दिला, जेणे तरुणांना इथल्या मातीचे शिक्षण मिळावे. पाश्चात्य शिक्षणामुळेच इंग्रज प्रेमी भारतीय पिढीचा जन्म झाला होता, हे टाळण्यासाठी आणि मेकेन्झीच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी टिळकांनी फार मोठे काम केले.

‘शिवाजी महाराज’ हा तो महाराष्ट्राचा अभिमान. तरुणांमधील अस्मिता जागृत करण्यासाठी त्यांनी शिवजयंती सुरु केली आणि श्री शिवाजी रायगड स्मारक समितीची स्थापना केली. शिवराज्याभिषेक सुरु केला. यातूनच रायगडावर लोकांचे येणे जाणे सुरु झाले. स्वराज्याच्या विचारांना धुनी मिळाली . गुरुचे काम हेच असते.

टिळकांनी भारताचा आवाज बुलंद केला. माणुसकीचा तोरा मिरवणाऱ्या इंग्रजांना स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे सांगण्याचे धाडस त्यांनी केले. म्हणूनच तरुणांच्या गळ्यातील ते ताईत बनले. ते लोकमान्य बनले.

टिळकांनी भारताला असंतोष व्यक्त करण्याचे शिक्षण दिले. लोकांना एकत्र केले. नवशिक्षित तरुणांची फौज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.

जदुनाथ सरकार म्हणतात, शिवाजी महाराजांनी काय केले, तर झोपी गेलेल्या लोकांना  जागे केले, जागत्या लोकांना चालते केले आणि चालणार्यांच्या खांद्यावर स्वातंत्र्याचे निशाण दिले. टिळकांच्या कार्याचे मूल्यमापन याच शब्दात करता येईल. अतिमवाळ विचारांना राष्ट्रवादाचे स्वरूप देण्यासाठी भारताला एका विचारी, प्रभावी माध्यमाची गरज होती. टिळक हे माध्यम आणि दुवा बनले.

मंडालेच्या अटकेत त्यांनी गीतारहस्य लिहिला. मात्र त्या अगोदरच या गीतेतील महत्वाचे रहस्य त्यांनी देशाला समजावले, दुष्टांचा संहार करण्यात काहीही चुकीचे नाही.

टिळकांच्या स्मृतीला या नम्र शिष्याचे अभिवादन.

 – हर्षद माने

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

महामुंबईत मराठयांचा शिस्तबद्ध एल्गार! विधानसभेचाही सकारात्मक प्रतिसाद 

Next Article

स्वामी विवेकानंद आणि त्यांची (आम्ही पूर्ण करावयाची) मोहिमेची योजना

You may also like