लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण; भाग १

Author: Share:

कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने (राजोपाध्ये नव्हेत)स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वत: आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते. या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणकारांनी शाहु महाराजांच्या लक्षात हि गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने “छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!” असे उद्धट उत्तर दिले. पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरही तो ब्राह्मण ऐकेना, त्यातुन त्याने स्वत: शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या महामूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. मात्र हा विधी पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला, त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप आले.

स्वत: शाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती का नाही? त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते. कोल्हापुरच्या विद्याविलास च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र,

“माझ्या मतासंबंधि बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवत आहे.सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का? ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध ,थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काही तत्वे मला मान्य आहेत. मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले .मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? मला वेद मान्य असून ,मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का?

कळावे,

शाहू छत्रपती

मुंबई , ता २३ मार्च १९२१

अशा विचांरांचे हे छत्रपती या वेदोक्त वादात कसे फसले वा इंग्रजांच्या राजकारणाने फसून व काही लोकांच्या सल्ल्याने का वागले, लोकमान्यांची भूमिका काय होती याचा हा इतिहास!

लोकमान्य टिळक विरुध्द चिरोल

चिरोलच्या ’दि अनरेस्ट एन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांवर गरळ ओकणारे पुस्तक त्याचे मराठी भाषांतर भास्करराव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे व प्रो.म.गो.डोंगरे या तिघांनी केले व ते पुस्तक स्वखर्चाने छापून शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलच्या पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणा म्हणून ठेऊन घेतले. कागदपत्र परवले, पैसा दिला. महाराजांचे ॠण चिरोलने स्वत: प्रस्तावनेतच मान्य केले आहे. मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानी चा दावा दाखल केला. या खटल्यात भास्करराव जाधव आणि डोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिले. शाहु महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात टिळकांनी विरोध केला असे चिरोलने म्हंटले होते त्यासंदर्भात टिळकांच्या वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेऊन प्रश्न केला की “टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरोध केला ते दाखवा.” कारण काहीजणांनी तसा लेखी व तोंडि प्रचार केला होता. तेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधात लोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त “प्रकरणात व्यक्तीश: छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखवता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते.”

याच केस मधे सत्यशोधक भास्कररावांची जी साक्ष झाली ती त्यांची मनोवृत्ती स्पष्ट दाखवतात. जाधव म्हणाले , “मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोधी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतो. हिंदुंनाच काय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते!” तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मग तुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेल. त्यावर जाधवांनी उत्तर दिले. अद्याप त्यांनी ती मागणी केली नाही. जाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.

भास्करराव जाधव यांची कार्यशैली

राजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र ५ मे १९०२ ला पाठवले त्यावर दुसर्‍याच दिवशी महाराजांच्या खाजगी कारभार्‍याचे उत्तर आले व त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले व जप्तीचा हूकूम दिला. १३ मे ला शाहू लंडनला निघाले व १५ मे ला मुंबईला बोटित बसले. त्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित न करता खाजगी मालकिची उत्पन्नेसुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडो ब्राह्मणांना च्या लहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावले. हि सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार या मंडळिंना दान म्हणून मिळाली होती हि सर्व ब्राह्मण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेली. मूळ प्रश्न होता केवळ क्षत्रियत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्चित्त घेण्याचा होता. त्यांचे क्षत्रियत्व ब्राह्मण समाजाला मान्यच होते. जाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्या लग्नघडीलाच काढली. या सत्यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्ग निर्माण करु नये असे उद्गार काढले. वेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने वेदाभिमानी असल्याने छत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाच सपशेल माफी मागावी लागली.

टिळकांची भूमिका

शाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,- परधर्मियांनाहि- वेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होती. यासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द, ” जातिभेद हा हिंदु समाजाच्या हाडीमासी खिळलेला आहे. …. हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडून टाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्य केले पाहिजे व आम्हि आजच्या प्रश्नांचा जो विचार करणार आहोत तो याच धोरणावर करणार आहोत. समाजाच्या स्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे व तोही असा असला पाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईल. हल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरू झाली आहे ती त्या प्रकारची नाही…मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळात कोणी राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही…. निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हास पाहणे आहे व तशा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहीले आहेत.”

वेदोक्ता बाबत टिळकांचे जाहिर मत

५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात ” कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही…”

लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते. आधी राजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेच. पण या प्रकरणात त्यांची अकारण बदनामी केली गेली.

टिळक विधायक सुधारणावादी होते. जातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमने. खुद्द शाहु राजांनी तंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचा अधिकार आहे असे सांगीतले. म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचा अधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते.

टिळक हे हिंदुसंघटक असून सर्व जाती एकत्र याव्यात असेच त्यांना वाटत होते. शिवजयंती व गणेशोत्सव यांना राष्ट्रीय स्वरुप देण्याच्या त्यांच्या चळवळीमागे सर्व जातींचे एकत्रीकरण हाच उद्देश होता.शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव या आपल्या लेखात टिळक सारांशाने म्हणतात,”…राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.एकराष्ट्रीयत्व म्हणजे काही दृष्य पदार्थ नव्हे……सर्व लोकांच्या आदरास पात्र असलेल्या जितक्या अधिकाधिक वस्तु असतात त्या मानाने एकराष्ट्रियत्वाची कल्पना अधिकाधिक दृढ होत जाते हे तत्व सर्वमान्य आहे. … अशा गोष्टी अद्याप दुर्दैवाने आम्हास फारशा उपल्ब्ध नाहीत.गाई आणि ब्राह्मण यांचा प्रतिपाळ अशा दोन गोष्टी एकेकाळी होत्या…पण याहीपेक्षा आजचा काळात सर्वांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रपुरुषांचे स्मरण होय.त्यातूनही ज्या शूर पुरुषांनी मरठे ,ब्राह्मण ,परभू,शेणवी वगैरे कोणताही भेद मनात न आणता “गुणा: पुजस्थानं गुणिषु नच लिंगम्‌ नच वय:” या न्यायाने ज्याचा जो गुण आढळण्यात आला त्याचा सारवजनिक कार्यात उपयोग करुन सर्वांस राष्ट्रीय एकत्वाच्या जाळ्यात आणले त्याचे स्मरण सर्वांस श्रेयस्कर होईल. श्री शिवछत्रपतींचे चरित्र अशाच प्रकारचे आहे….शिव छत्रपतींचा उत्सव करणार्‍यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. या उत्सवात मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण आणि परभु अशा प्रकारचा कोणताही भेद करणे अतिशय गैरशिस्त आहे…..शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्यात एक प्रकारची कृतज्ञता बुद्धी आमच्या मनात आहे त्याव्यतिरिक्त अशी जयंती साजरी करण्याने एकराष्ट्रीयत्वाचा उदय होईल हा फायदा लहान सहान नाही.”

सयाजी महाराजांची भूमिका

सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिला नाही. त्यांनी १८९६ ला एका पत्रात म्हंटले आहे की “मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वत:ला काही कमी जास्त श्रेष्ठ वाटत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जाते. पण अशा रितीने लोक केवळ विधी आणि कर्मे यातच बुडुन धर्माची तत्वे विसरुन गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे.”

राजोपाध्यांची भूमिका

शाहु महाराजांना अंघोळ न करता पूजा सांगू पहाणार्‍या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांना दरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असे विचारले गेले ते पत्र किंवा यादी ७ – १० – १९०१ चे आहे.

यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावर शास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील याच्या विचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले . छत्रपती शाहू राजांची मान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेले. शंकराचार्य ,काशी ,वाई इ, स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनी राजांना लेखी कळवले होते. त्यास मूक संमती मिळाली. राजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या ८-१० दिवसात कोणीतरी शाहू राजांचे कान भरले व राजोपाध्यांना काशी आदी हून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आली. वर उल्लेखलेले पत्र हि राजोपाध्यांना ७-१० ऐवजी १ महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ ला मिळाले.

५- मे १९०२ ला राजोपाध्ये यांनी महाराजांना पाठवलेल्या पत्राचा सारांश,

१. रा.ब.दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाही. आपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैव आहे. ….

२.सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधि असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावे एवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असो.

३. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझी काहीही हरकत नाही.

४.मला नेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाही. नेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मी हजर झालो हि.यावरुन असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाही.

५. काशी,नाशिक इ.क्षेत्रांकडून निर्णय आणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे.

६.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केले( संस्कार लोप पावल्याने प्रायश्चित्त करून पुन्हा वेदोक्त पद्धत सुरू करण्यासंबंधि) तर माझेवर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कार पडेल. मजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण?

७. १५ मे ला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहे. ते झाले की मी शास्त्राच्या निर्णय मिळवण्याच्या उद्योगाला लागतो, व तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चे आत उत्तर देतो. एखादी वहिवाट बंद पडली कि नव्याने सुरू करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहे. तो या बाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गेला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हे माझे दुर्दैव आहे.

८.सरकारांच्या परंपरागत उपाध्येपणावरुन मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादित मला विचारला आहे. या प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाहि.

पण यावर लगेच ६ मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले व लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउन राजोपाध्येंना काढून टाकण्यात आले व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असा खोटाच आरोप केला गेला. वास्तविक राजोपाध्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नच उद्भवत नाही असे लिहिले होते.

संदर्भ :- वेदोक्त ,शाहूमहाराज आणि टिळक, लेखक: कै.ग.रं.भिडे (कोशकार भिडे)

क्रमशः:

लेखक: श्री. चंद्रशेखर साने

Previous Article

शिक्षक तुम्ही…

Next Article

तेव्हा मी X आता मी

You may also like