अर्ज- एक Application

Author: Share:

दिवसभराच्या कामात सविता खूपच व्यस्त असायची. इतकी व्यस्त कि तिला आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसे. तिचं कामच तसं होत. एका संस्थेसाठी ती समाजसेविका म्हणून काम करायची. घराकडे थोडंस दुर्लक्ष होत असलं तरी नवऱ्याने म्हणजे विलासने कधी तक्रार नाही केली. त्याने तिला प्रत्येक वेळी प्रोत्साहनचं दिल. कारण समाजसेवेची आवड त्याला हि होती. मात्र कौंटुंबिक जबाबदारी आणि ऑफिसमधील कामाचा वाढता व्याप यामुळे त्याला समाजसेवेसाठी वेळ मिळत नव्हता. आपली धर्मपत्नी आपलं काम करतीये याचा त्याला अभिमानाच होता.

आज सविता शाळेत आली होती. तिच्या मुलीला शाळेत प्रवेश घ्यायचा होता. या आत्ताच्या स्पर्धेच्या युगात नामांकित शाळेत प्रवेश घेण हे काही सोप्पं काम नव्हत. सगळी चौकशी अगोदरच तिने केली होती. प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून एक अर्ज तिच्याकडे देण्यात आला. फक्त अर्ज भरून दिला म्हणजे प्रवेश मिळाला अस होत नाही, याची तला पुर्ण जाणीव होती. असो, ती समोरच्या बाकड्यावर जाऊन अर्जामध्ये माहिती भरू लागली. मुलीचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, पालकांचे नाव , मोबाईल नंबर, हे सगळं पटापटा भरलं अन त्यानंतर एका ठिकाणी अर्ज भरत असताना ती अचानक थांबली.

समीर शेख. घराची परिस्थिती अगदी बेताची. त्याहीपेक्षा खाली म्हणा हव तर. अत्यंत काबाडकष्ट करून शिक्षण घेतलं. शिक्षण घेताना आई-वडिलांनी सुद्धा खूप प्रोत्साहन दिल.  आता शिक्षण पुर्ण झाल होत. नोकरी शोधण हे काळाची आणि पोटाची गरज बनली होती. शिक्षण घेत असताना मुसलमान म्हणून जी अवहेलना वाट्याला आली, जो तिरस्कार वाट्याला आला तोचं शिक्षण पुर्ण झालं तरी अजूनही वाट्याला होता. कित्येक ठिकाणी मुस्लीम असल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही तर मग शिक्षण घेण्याचा काय उपयोग ?

अशातच पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी मुलाखत घेण्यात येणार होत्या. हा तिथे अगदी सकाळीच हजर राहिला. नावनोंदणी केल्यानंतर एक अर्ज भरायला दिला आणि सोबतीला एक नंबर. तो नंबर आल्यानंतर त्याची मुलाखत घेतली जाणार होती. एका ठिकाणी बसून त्याने अर्ज भरायला सुरवात केली. नाव, गाव, पत्ता, शिक्षण, इतर किरकोळ बाबी भरल्यानंतर एका ठिकाणी अर्ज भरत असताना तो अचानक थांबला.

प्रतिक आणि कावेरी, या दोघांबद्दल अस म्हणता येईल, दो जिस्म- एक जान. इतक प्रेम होत या दोघांमध्ये. दुनियेतील कोणतीच ताकद त्यांना वेगळ करू शकत नव्हती, अपवाद फक्त दोघांच्या घरचे. कारण जेव्हा दोघांच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा अपेक्षेप्रमाणे कावेरीच्या घरून विरोध दर्शविला गेला. अगदी तशीच काहीशी हो नाही – हो नाही परिस्थिती प्रतीक च्या घरी होती. आता तर प्रकरण दोघ्यांच्याही हाताबाहेर जायला लागलं होत. त्यांनी पळून जाऊन लग्न करायचं अस ठरवलं, कारण दुसरा पर्यायचं नव्हता राहिला.

काही दिवसानंतर जेव्हा प्रकरण शांत होईल तेव्हा आपण घरी येऊ, त्यानंतर आपले नाते घरचे स्वीकारतील असा विचार करून दोघेही त्यादिवशी घरातून पळाले. दोघांच्याही घरी हाहाकार मजला होता मात्र त्या दोघांना त्याची पर्वा नव्हती, कारण दोन पाखर त्या जातीच्या पिंजऱ्यामधून बाहेर पडले होते, त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. दोन दिवस मजा मस्ती केल्यावर कोर्टात गेले. विवाहनोंदणी कार्यालयात जाऊन अर्ज घेतला. प्रतिक अर्ज भरत होता. कावेरी त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. किरकोळ माहिती भरल्यानंतर एका ठिकाणी अर्ज भरत असताना तो अचानक थांबला.

सविताने अर्ज पुर्ण भरला. कार्यालयात जाऊन जमा करत असताना तो फोर्म क्लार्क ने तो वाचला. एका ठिकाणाची माहिती वाचून तो आश्चर्यचकित झाला. हे अस का लिहिलंय हा प्रतिप्रश्न क्लार्क ने विचारला असता सविताने हसून उत्तर दिले, “ नागरीक्षास्त्रामध्ये तुम्ही लहान मुलांना संविधान शिकवता. त्यात काही मुल्ये-तत्वे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव. मी माझ्या मुलांना तेच शिकवते . म्हणून मी ते तसं लिहिलंय “.

“ सर कोणतीही शेक्षणिक संस्था हि धर्मनिरपेक्ष असते, आपण मुलांना तेच  शिकविल पाहिजे ”  मुलाखतीदरम्यान समीर तेच बोलत होता. पुढे बोलताना तो म्हणला “ सर आपल्याकडे सर्व धर्माचे जातीचे विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात. खर तर आपणच धर्म वैगैरे अशा गोष्टी मानायला लागलो तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? पुस्तकी ज्ञान काही कामाचे नाही, त्यांचे विचार सुधारणे व विचारांनी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी महाविद्यालयात तयार करणे हेच शैक्षणिक संस्थेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. म्हणून मी ते तसं लिहिलंय.”

प्रतिक आणि कावेरी यावर काय बोलतायेत याकडे तो नोंदणी कार्यालयातील अधिकारी आतुरतेने पाहत होता. प्रतीकने बोलायला सुरवात केली, “ आम्ही दोघे वेगळ्या जातीचे असल्याने आमच्या दोघांच्याही घरून लग्नासाठी कडाडून विरोध झाला. मी कुणबी जातीचा आणि हि ब्राम्हण. आम्ही पण शेवटी माणसचं आहोत ना ? वेगळ्या जातीचे असलो म्हणून आम्ही प्रेमच नाही करायचं का ? असंच असेल तर प्रेम या अमुल्य भावनेचा-संकल्पनेचा अपमान आहे.”

सविताच्या बोलण्याने क्लार्क चक्रावून गेला होता. तो म्हणाला, “लहान मुलीचं आयुष्य किती सुंदर होईल कि जिच्या आईचे विचार किती प्रगल्भ आहेत. अगदी लहान वयात ती असे विचार घेऊन पुढे येत आहे, तिचं भविष्य उज्ज्वल आहे.” जास्त विचार न करता त्याने अर्जावर सही केली. प्रवेश प्रक्रियेतील अर्धी फी घेऊन बाकी शिल्लक रकमेची स्वतःच्या पैशाने त्या क्लार्क ने पैशाची पावती फाडली अन प्रवेश निश्चित झाल्याचा कागद सविताच्या हातात दिला. सविता, तिची मुलगी, क्लार्क आणि सोबतच कार्यालयातील सर्व कर्मचारी या सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारच समाधान दिसत होत. सविताच्या विचारांसाठी प्रत्येकाकडून टाळ्यांचा वर्षाव केला जात होता.

“ आमच्या संस्थेला तुमच्या सारख्या वैश्विक विचारांच्या प्राध्यापकाची गरज आहे. आम्हाला असा प्राध्यापक पाहिजे कि जो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती भर देईल. तुम्ही आजपासूनच कामावर हजर होऊ शकता. जाहिरातीत असणाऱ्या पगारापेक्षा दुप्पट पगारावरती आम्ही आपल्याला सेवेत रुजू करून घेत आहोत.”, असे म्हणत मुलाखत घेणारे तिघे प्राध्यापक उभे राहिले आणि पुढे येऊन  समीरच्या हातात हात मिळवला.

“मी सुद्धा असाच माझ्या मुलीला विरोध केला होता. तिने माझ ऐकल, मी ठरवलेल्या ठिकाणीच तिने लग्न केल. मात्र आज जवळपास २० वर्षे होऊन गेलीयेत, मी तिला पाहिलं नाहीये. मला मुलगी असूनही मी एक चांगला बाप होऊ शकलो नाही. बेटा, तुझ कन्यादान मी करणार.” प्रतिक आणि कावेरीच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद ओसांडून वाहत होता. सगळे सोपस्कार पुर्ण करून प्रतिक आणि कावेरीने त्यांचा आशीर्वाद घेतला. आपल्या लेकीला तिच्या नव्या घरी पाठवताना त्या वयस्कर व्यक्तीचे डोळे भरून आले होते.

या तिन्ही घटना , तीन वेगवेगळ्या ठिकाणी मात्र एकाचं वेळी घडतं होत्या. सविताने असं काय लिहिलं होत कि तिच्या मुलीला सहज प्रवेश मिळाला? समीर ने अस काय लिहिलं होत कि त्याला दुप्पट पगाराची नोकरी मिळाली ? आणि प्रतीक ने सुद्धा असं काय लिहिलं होत कि, कावेरीला कार्यालयातुन सासरी पाठवताना रक्ताचं नात नसलं तरी ती वयस्कर व्यक्ती आपल्या या क्षणभरच्या मुलीसाठी रडली होती ?

घटना तीन, ठिकाण तीन, मात्र एकच साम्य, ते म्हणजे तिघांनीही अर्ज भरताना धर्म म्हणून मानवता आणि जात म्हणून माणुसकी अशी नोंद केली होती.

 

@प्रा. विशाल पोपट पवार
रुईछत्तिशी, ता. नगर. जि.अ.नगर
9730921981,

vishalpawar153@gmail.com

( लेखक ATSS महाविद्यालय , चिंचवड, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत )


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

१३ ऑगस्ट १८९८

Next Article

जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम संपन्न

You may also like