सांगली कारागृहात संवाद बंदीजनांशी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन

Author: Share:

जयसिंगपूर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय, जयसिंगपूर आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन भविष्यात त्यांना सुधारण्याची संधी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून ‘सुसंवाद बंदीजनांशी’ या उपक्रमाअंतर्गत सांगली कारागृह, सांगली येथे प्रबोधनपर व्याख्यानाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. कारागृहे ही आता केवळ गजाआडचे विश्व न ठरता गुन्हेगारीच्या विळख्यातील अडकलेल्यांच्या वर्तनात आमुलाग्र बदल करून त्यांचे मन परिवर्तन करणारी सुधारगृहे ठरू लागली आहेत.

भारतीय सैन्यात आपली सेवा बजावलेले; सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक संघटना आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेले. वाचन आणि लेखन ज्यांचे छंद आहेत असे वक्ते कॅप्टन हरी निवृत्ती जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगली कारागृहातील सुमारे ४०० बंदीजनांशी अत्यंत प्रभावीपणे सुसंवाद साधला. आपल्या प्रबोधनपर मार्गदर्शनात ते म्हणाले, आज येथे उपस्थित सर्व “बंदीजनांनी गुन्हेगारी विश्वाचा काडीमोड घेऊन उर्वरित आयुष्य आपल्या मुला-बाळांसह सुखात आणि समाजोपयोगी कार्याला वाहण्याची शपथ घेऊ या!”

बाहुबली विद्यापीठाअंतर्गत चालविल्या जाणा-या विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलेले आणि सध्या ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, ज्येष्ठ नागरिक वाचनालय, गीता परिवार अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माजी प्राचार्य बी. बी. गुरव यांचे प्रमुख व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून बंदिजनांचे प्रबोधन केले. विविध जिल्हा परिषदांच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी म्हणून आपली उत्तम सेवा बजावलेले आणि सध्या साहित्य सेवेबरोबरच ज्येष्ठ नागरिक संघटना, ज्येष्ठ नागरिक वाचनालय, गीता परिवार आणि अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सक्रीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब मारुती सूर्यवंशी यांनी अत्यंत प्रभावीपणे उपस्थितांशी सुसंवाद साधला.

अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ अधिकारी म्हणून ख्याती असलेले; बंदीजनांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि त्यांच्या मन परिवर्तनासाठी सदैव कार्यरत असलेले कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘संवाद बंदीजनांशी’ या उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी जयसिंगपूर येथील कवितासागर साहित्य अकादमीचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूरच्या वतीने कारागृहातील ग्रंथालयासाठी विविध विषयांवरील पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन देवकुळे गुरुजी यांनी केले.

 

Previous Article

७५ वर्षांच्या आजी करतात फायटींग

Next Article

जागतिक युथ कॉमनवेल्थ वेटलिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक विजेती निकीता काळेचे मनमाड येथे स्वागत

You may also like