Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सोमवार बाजार

Author: Share:

आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे बाजार भरले जातात. अगदी जुन्या काळापासून हे चालत आलेले आहे. आठवड्याच्या एका ठराविक दिवशी हा बाजार भरला जातो. या बाजारात जनपोयोगी सर्व वस्तु मिळतात. कपडे, खेळणी, खाण्याचे पदार्थ आणि बरेच काही. आज जी काही मॉल ही आधुनिक महागडी परंपरा आली आहे, त्याचे मूळ या बाजारपेठेत आहे. मॉलमध्ये जशा सर्व वस्तु एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात. तशा बाजारात आपल्याला सर्व वस्तु मिळतात. मॉल संस्कृती वाढत असल्यामुळे बाजारपेठ ही संस्कृती लोप पावेल, अशी भिती निर्माण झाली आहे. परंतु काही ठिकाणी आजही बाजार भरला जातो. मुंबईचे उपनगर असलेल्या मालाड पश्चिम येथे सुद्धा “सोमवार बाजार” भरला जातो.

या सोमवार बाजाराचे मालाडकरांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आजही मोठ्या प्रमाणात हा बाजार भरला जातो व असंख्य गर्दीने सोमवार बाजार गजबजलेला असतो. हा बाजार दर सोमवारी भरतो. म्हणून याचे नाव सोमवार बाजार असे आहे. दर सोमवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत बाजार गजबजलेला असतो. लाखोंच्या संख्येने लोक येतात तरीही कुठेच चेंगराचेंगरी होत नाही. एरव्ही सुद्धा मासळी बाजार, भाजी बाजार भरलेला असतो. परंतु सोमवारी याला महा-जत्रेचं स्वरुप प्राप्त होतं. येथे मासळी मंडई, किराणा दुकाने आहेत. त्याशिवाय फळभाज्या, पालेभाज्या, हार-फुले, नवे-जुने कपडे, भांडी, खेळणी, महिलांसाठीची आभुषणं, इमिटेशन ज्वेलरी, भंगार, व छान छान खाऊ सुद्धा मिळतो आणि या सगळ्या गोष्टी इतर दुकानांच्या तुलनेत स्वस्त दरात मिळतात. सण किंवा उत्सवाच्या वेळेस त्या त्या सणाच्या किंवा उत्सवोपयोगी वस्तुही सहज उपलब्ध होतात. मे महिन्यात आंबे आणि प्रत्येक हंगामात त्या हंगामातील विशिष्ट गोष्टी उपलब्ध होतात. स्वस्त आणि मस्त हे सोमवार बाजाराचे वैशिष्ट्य आहे.

सोमवार बाजाराला ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. हा बाजार किमान २०० वर्षे जुना आहे. बाजाराला लागूनच मालाड देवस्थान ट्रस्ट आहे. समोरच हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराच्या शेजारी दर्गा आहे आणि चिंचोली बंदर रोडकडे जाताना एक मशिद सुद्धा लागते. या बाजाराचा विस्तार चिंचोली बंदरपासून तुरेल पाखाडी रोड येथपर्यंत पसरलेला आहे. आज मालामध्ये पुष्कळ बदल झालेला आहे. काही लोक याला प्रगती सुद्धा म्हणतात. मोठमोठी मॉल्स, सुपर मार्केट, कॉल सेंटर्स अशी अनेक परिवर्तने येथे झाली आहेत. तरीसुद्धा हा सोमवार बाजार आपले मूळ, आपले अस्तित्व तग धरुन आहे. कितीही मॉल्स, सुपर मार्केट उभारले तरीसुद्धा सोमवार बाजाराचे महत्व कमी होणार नाही. कारण सोमवार बाजार मालाड वासियांच्या सामाजिक आयुष्य़ातले एक सदस्यच आहे. लोकांच्या भावना त्यात गुंफलेल्या आहेत. म्हणूनच आजही सोमवार बाजाराला अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्व असेच टिकून राहणार यात शंकाच नाही.

लेखन: टीम स्मार्ट महाराष्ट्र

Previous Article

सिद्धिविनायक मंदिराची रोमहर्षक कथा

Next Article

१४ ऑगस्ट

You may also like