Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

राजियांचे मन.. सिंधुदुर्ग १

Author: Share:

महाराजांनी एक पाय तटाच्या दगडावर ठेवत दूर आसमंत न्याहाळला. संध्याकाळी मावळत्या सूर्याची किरणे समुद्राच्या रेषेवर पडलेली पाहणे त्यांना खूप आवडे. दूर क्षितिजरेषेच्या अलीकडे असलेला सूर्य..त्याची समुद्राला भिडणारी किरणे..ती आपल्या लाटांवर साठवत सोनेरी होण्याची हौस भागवणारा समुद्र आणि त्याच्या सिंधूदुर्गाच्या तटांना भिडुन गाज ऐकवणाऱ्या अजस्त्र लाटा ह्या समुद्रमंथनात हरवलेले महाराजांचे मन…राजियांना ही समाधी आवडत असे. प्रचंड शारीरिक आणि मानसिक ओझे पेललेला आणि पेलणारा तो अलौकिक जीव निसर्गाच्या ह्या नजार्यात हरखून जायचा. आपण काही मोठे करतो आहोत ही भावनाच मुळी त्यांच्या मनाला शिवली नव्हती. त्यामुळे सिंधूदुर्गाच्या रेखीव बांधणीत आणि समुद्रामध्ये खंबीर उभ्या असलेल्या दुर्गाच्या पत्थरात मी पणा नव्हता. तसा तो राजगडच्या पद्मावती माचीत किंवा रायगडवर उभ्या होत असलेल्या नगारखान्याच्या खडकातही नव्हता. कारण तो त्यांच्या धन्यातच नव्हता. ये तो श्रींची इच्छा तोच करवून घेतोय हे रायरेश्वराच्या मंदिरी लहानपणीच पक्के झाल्याने मी पणाने कधी जन्म घेतलाच नाही. महाराजांशी बोलताना त्यांना मुजरा करताना त्यांचे पवाडे गाताना त्यांचे हुकूम झेलताना मावळे सेनापती सरदारांच्या मनात एक गहिवर असायचाच..कारण ते एका काळपुरुषाला याची देही पाहत आहेत हें त्यांना माहीत होते. मात्र ह्या मायेचा स्पर्श त्या पुरुषाला झाला नव्हता. मी पण नसल्याने राजे लहान मुलासारखे निसर्गाच्या ह्या खेळात रमून जायचे.

सिंधूदुर्गावर त्यांचे अतीव प्रेम. गड हा विषयच त्यांचा ह्रदयस्थ. प्रचंडगडापासून ते प्रेम त्यांनी प्रत्येक गडावर केले. प्रत्येक गड हा त्यांचा मावळा आणि प्रत्येक मावळा त्यांचा एक एक गड. दोघांवर ते पित्याचे प्रेम करीत. म्हणूनच कोंडाण्यावर तान्या गेल्याची बातमी ऐकून महाराज अलगद म्हणून गेले..एक गड आला पण दुसरा गेला..ताना..माझा तानाजी..का असा सोडून गेलास…तानाजीच्या आठवणीने महाराजांचा कंठ दाटून आला. संध्याकाळच्या मावळत्या सावल्यांमध्ये मन बुडवणे महाराजांना आवडे खरे पण त्या सावल्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या ह्या आठवणी बाहेर काढायचे आणि महाराज कासावीस व्हायचे..मग त्यांना नकोसे वाटायचे. डोळे ओलावायचे. असे ओलावणारे डोळे आजूबाजूस असलेल्या मावळ्यांनी कैक वेळेस पाहिले होते. शून्यात हरवलेल्या आपल्या राजांचे पाणावलेले डोळे पाहिले की मावळ्यास समजे कुणी तरी भावनेच्या पटलाची तार हलकेच छेडुन गेला आहे. मग ते थोरले महाराजसाहेबच असतील असे नाही. महाराजांचे कुटुंब मोठे होते. लाखो मावळे आणि शेकडो गडकिल्ल्यांचे. यापैकी काळाच्या पडद्याआड गेलेला एखादा मावळा सुद्धा ती तार छेडू शकत असे. उद्या आपण कामी आलो तरी महाराज असेच कळवळतील ह्या विचारानेच तो मावळा हरखून जाई. आणि आपल्या राजासाठी तलवार गाजवण्याची उर्मी त्याच्या अंतरंगात उसळून येई. आपले मन आणि तन तो राजांच्या चरणी मनोमन अर्पण करे. त्यावर येथपासून हक्क फक्त राजीयांचा.
महाराजांचे मन फुलासारखे होते. फुलाच्या नाजूकपणाने ते वावरायचे.सुखावायचे कोमेजायचे फुलायचे..आश्चर्य वाटायचे सर्वांना उभा सह्याद्री आणि आडवा महाराष्ट्र आपल्या खांद्यावर पेलणारा हा गडपुरुष पण किती फुलाच्या मनाचा! पण महाराज हळवे होतेच.मनाचा निग्रह आणि कोमलता एकाच पारड्यात देऊन नियतीने पाठवली होती. पिता म्हणून. महाराष्ट्र अशा गभीर पित्याच्या छत्रसावलीत सुखावला होता.
महाराजांच्या मनात सिंधुच्या लाटांप्रमाणे विचार येउन फुटत होते. उभा मराठी प्रदेश आणि आडवा सह्याद्री महाराजांना प्रेमाने बोलावत होता. कोकणच्या बाजूचा समुद्रही साद घालत होता. आणि महाराज त्या सादेला हाक देण्यासाठी उत्सुक होते. आज मालवणातील ह्या कुरटे बेटावर महाराजांनी समुद्रात पलाण मांडले होते. एक जलदुर्ग मराठी साम्राज्याला जोडला गेला होता. हीच एक क्रांतिकारक घटना होती. जमिनीवर राज्य करणाऱ्या राजाने समुद्रावरही आपले राज्य असावे ही मनिषा ठेवली. त्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न केले. मराठी भगवा ध्वज छाताडावर फडकवत डौलाने उभे असलेले सागरी किल्ले याच प्रयत्नांना आलेले शिंपले होते. त्यात होते मोती…आजच्या लहान राज्याचे उद्याच्या शक्तीशाली साम्राज्यात बदल घडवण्याची क्षमता असलेले मोती.महाराजांना आपल्या माणसांचे मोठे कौतुक वाटले. त्यांचे मन भरून आलेच! जगदंबेने एक एक मोतीच त्यांच्या झोळीत टाकला होता. आपल्या एका शब्दाखातर ही माणसे काहीही दिव्य करायला तयार होतात. त्यांनी केलेले एक एक पराक्रम भीमपराक्रम आहेत. हे बळ कोठून आले? महाराजांना कसलेही श्रेय स्वतःकडे घेणे कधीच आवडत नसे. असा विचार जरी त्यांच्या मनात आला तरी ते अस्वस्थ होत. इदम न मम..हे त्या शंभू महादेवाचे आशीर्वाद. आई भवानीचे आशीर्वाद..आणि कवतुक हेही की केवळ शौर्य गाजवायलाच नाही तर राष्ट्रनिर्मिती साठी लागणारे सर्व काही करायला शिकायला ते तयार होतात. दहा वर्षांपूर्वी कल्याणला मराठी आरमाराचे सूतोवाच केल्यापासून आरमार वाढत होते. कधीही न पाहिलेले हे शास्त्र आणि ही कला मराठ्यांनी लीलया आत्मसात केली होती. महाराजांना आठवले बसनूरला जाताना महाराज मुद्दाम समुद्रामार्गे गेले होते. आपल्या माणसांच्या आरमारी कलेवर पूर्ण विश्वास ठेऊन. आणि खुद्द राजे नौकेवर आहेत हे पाहूनच मराठी आरमार सैन्याची मान उंचावली होती. छाती शिडासारखी फुगली होती. हाच विश्वास देण्यासाठीच महाराज मुद्दाम नौकेतून गेले होते. महाराज आपल्या आरमारात मोहिमेवर गेले तेव्हा त्यांनी केवळ आपल्या सैन्याला बळ दिले असे नाही एक इशाराही दिला नाविक सत्तांना मराठी नाविक सत्तेच्या सशक्ततेचा…

आपण बाजूला कप्तानाच्या डोळ्यातील चमक महाराजांना अजुन दिसत होती. समोरून इंग्रजांचे मोठे गलबत आले. ते मुद्दाम ताठररतेने आपला मार्ग सोडत नव्हते…त्याच्यासमोर आपली नाव लहानच होती. पण पठ्ठ्याने आपला मार्ग सोडला नाही. खुद्द राजा बाजूला असताना तो आपला मार्ग कसा बदलेल…महाराजांनीही एका शब्दाने त्याला काही सूचना केली नाही….आणि..अखेर त्या गर्विष्ठ इंग्रजी गलबताला मार्गातून बाजूला व्हावे लागले. ही एक प्रतिकात्मक सूचना होती एका मराठी राजाने आरमारी सत्तांना दिलेली. राजकारण जाणणारे महाराज अशा प्रतिकात्मक सूचना देणेही जाणत होते.

सार्वभौमत्व..महाराज आवर्जून जपत होते..समोरच्या राजाने मला राजासारखेच वागवावे यासाठी..तो आपला मान नाही. मराठी साम्राज्याचा मान आहे. मराठी साम्राज्य कुणाचे अंकित नाही.होय..आज लहान असेल तरी उद्या ते मोठे होणार आहे..आणि ते स्वतंत्र आहे..आम्ही सार्वभौम आहोत…महाराजांनी ते नेहमीच जपले होते. आग्ऱ्याच्या किल्ल्यात महाराज मुघल मानमरातब सोडून गरजले ते ह्याच सार्वभौमत्वासाठी…कुठे उभे केलेय मला!! आणि मुळात उभेच का केले आहे!! आग्र्याच्या आठवणीने महाराजांच्या अंगावर शिरशिरी उमटली. राग संताप उफाळून आला…पण पटकन निवळलाही..कारण प्रसंग घडून गेला होता..मागील घटनेतून योग्य ते घेऊन पुढे जाणे हेच उत्तम पुरुषाचे लक्षण आहे..महाराजांना समर्थांचे शब्द आठवले.

…पुरंदरचा तह…महाराजांच्या जिव्हारी लागला होता. हिंदुस्थानच्या राजकारणावर ह्या तहाने प्रभाव पाडला होता. नाट्यविलक्षण घटना घडल्या होत्या तहानंतर…पण महाराज तह पाळत होते. कारण त्यांना शांतता हवी होती. आपले बळ वाढवण्यासाठी..एकाच वेळेस दोन सत्तांशी झुंज अयोग्य होतीच..पण राज्य निर्माण करणे म्हणजे फक्त भौगोलिक सीमा वाढवणे नव्हे.

त्यातून महाराजांना एका साम्राज्याची पायाभरणी करायची होती. जे त्यांच्या पश्चात टिकेल वाढेल भरभरेल…यासाठी रयतेची काळजी घेतली पाहिजे..उद्योग उदीम वाढवला पाहिजे. शेतकऱ्यांना सरकारातून मदत करून जमिनीतून सोने पिकवले पाहिजे..आणि सोबत आपले सैन्य सबळ केले पाहिजे…शस्त्रे वाढवली पाहिजेत. सैन्यरचना सक्षम केली पाहिजे..आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित हव्यात..भू आणि सागरीसुद्धा..राज्याचे सगळे किल्ले मजबूत केले पाहिजेत. त्यासाठी पुरेसा माणूस दारूगोळा आणि धान्य प्रत्येक गडावर पाहिजे. गडाची उस्तनवार ठेवण्यासाठी पुरेसा पैसा सरकारात पाहिजे. त्यासाठी सारा पद्धती हवी..त्यासाठी जमिनीची मोजणी हवी..किती किती गोष्टी..जणू महाराज करावयाच्या कामांची उजळणीच करत होते. किती किती काम महाराजांनी केले होते आणि किती किती काम त्यांना करायचे होते. पण महाराज मन लावून हे काम करत होते. मी काही केले हे त्यांच्या मनाला शिवत नव्हते आणि जे करायचे आहें त्यासाठी अविश्रांत मेहनत घेण्यासाठी ते कसूर ठेवणार नव्हते. देवप्रिय माणसाने मन लावून पूजा करावी तशी महाराज मराठी राष्ट्राची पूजा करीत होते. शेवटी हे श्रींचेच कार्य होते…श्रीच घडवत होते…श्रींच्याच चरणी अर्पण होते…

एक राज्य आणि एक राष्ट्र ह्यामध्ये हाच फरक आहे…महाराजांनी रायरेश्वररी राष्ट्रनिर्मितीची शपथ घेतली होती…आज राज्य घडत होते. आता महाराज राष्ट्रनिर्मितीमागे लागले होते…मंत्रपुष्पांजलीत वर्णन केलेले साम्राज्य घडवण्यामागे…

समुद्र आता शांत होत होता. लाटांचे आवाज वातावरण घनगंभीर करत होते. आणि सिंधुदुर्ग समुद्राचा ध्वनी मन लावून ऐकत होता…. (क्रमशः)

Previous Article

श्रद्धा…

Next Article

घेतलास तू जन्म…

You may also like