श्रद्धा आणि अंधश्रद्धा

Author: Share:

श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय हा प्रश्न सर्वांच्या जीवनात कधी ना कधी आलेला प्रश्न. श्रद्धा म्हणजे काय याचा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करत असतो. मलाही हाच प्रश्न पडतो. अजूनही मला संपूर्ण अचूक उत्तर मिळाले नाही. पण जेवढा जास्त विचार करतो तेवढे जास्त कळत जाते. तरीही कधी नवे प्रश्न पडतच जातात.

श्रद्धा म्हणजे अत्त्युच पातळीवरील विश्वास. आपला विश्वास खूप लोकांवर असतो. आई-वडिलांवर, नातेबवाईकांवर , शिक्षकांवर, मित्रांवर आणि बरेच लोकांवर आपला विश्वास असतो. विश्वास असण्याचे खूप काही कारणे असतात. पण श्रद्धा असायला कारणे असायलाच पाहिजे असे काही नाही.

आपण कोणीही देवाला पाहिले नाही. पण तरीही आपण देवावर श्रद्धा ठेवतो. म्हणूनच श्रद्धा ही विश्वासापेक्षा पुढची पायरी ठरते. कारण आपण वर ज्यावर विश्वास ठेवतो असे सांगितले आहे त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. मग ते कारण प्रेमाचे असो वा स्वार्थाचे ,अगदी अगतिकतेनेही. आपण त्या डॉक्टरांवरही विश्वास ठेवतो , ज्याला आपण कधी पाहिले नसते किंवा त्याच्याविषयी ऐकूनही नसतो. तरीही महत्वाच्या शस्त्रक्रिया करताना आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नसते. श्रद्धेच्या बाबतीत असे नसते. डॉक्टर चुकू शकतो हे आपल्याला माहीत असते. पण ज्यावर श्रद्धा आहे तो चुकू शकतो हे आपल्याला पटतच नाही.

आपल्या सर्वांत काही ना काही कमी आहेच. या अपूर्णतेनेच तर आपण परिपूर्ण आहोत असे म्हटले जाते. पण आपण ज्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवतो, तेव्हा तो परिपूर्ण असेलच, हेच आपले मन सांगते. देव पूर्ण आहे असे आपण मानतो आणि त्यावर श्रद्धा ठेवतो. देवावर श्रद्धा असली की आपण त्याची उपासना करतो. भजन, कीर्तन, आरती, पूजापाठ, पारायण हे सर्व त्याच्याविषयी असलेली श्रद्धा व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आपल्या श्रद्धास्थानावर असलेली आपुलकी प्रकट करणे म्हणजे त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे, त्यांच्या संबंधित जे काही असेल त्याविषयी आदर व्यक्त करणे. एवढेच नव्हे तर दुसऱ्या लोकांनीही आदर व्यक्त करणे अपेक्षित असते. या श्रद्धेतूनच परंपरा तयार होतात. आस्तिक लोकांत आपल्याला सर्वसामान्य हे दिसून येते.

पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान एक अंधुक अशी सीमारेषा असते. दुसऱ्या श्रद्धा असलेल्या लोकांनी आपल्याच श्रद्धा मानल्या पाहिजे अशी एक श्रेष्ठत्वाची भावना तयार होते. श्रद्धा  या श्रद्धा आणि परंपरा या त्या काळापुरते मर्यादित असतात. तेव्हाच्या गरज, जीवनपद्धती, विचारधारा, लोकांची वैज्ञानिक वृत्ती, श्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांची मानसिकता, विविध इतिहासाचा झालेला परिणाम आणि एवढेच नव्हे तर मागील काळात अस्तित्वात असलेल्या श्रद्धा या सगळ्यांचा परिणाम आता अस्तित्वात असलेल्या श्रद्धेवर होतो. श्रद्धा कधीच स्थिर राहत नाहीत, राहूच शकत नाही, कारण निसर्ग बदल मानणारा आहे. माणूस निसर्गाचा भाग असल्याने तो यापासून कसा अलिप्त राहू शकतो ?

माणसांचे आदर्श हेच फक्त शाश्वत असतात. माणसांची नीतिमूल्ये, तसेच बदलत्या परिस्थितीत जुळवून घ्यायची क्षमता किंवा अनुकूलता यामुळेच श्रद्धा तयार होतात. या श्रद्धा तयार करणारे त्या त्या काळातील आधुनिकतेची कास धरणारे लोकच असतात. श्रीकृष्णाने इंद्रपूजा बंद केली आणि गोवर्धन पूजा चालू केली, प्रेषित महम्मदने मूर्तिपूजा बंद करुन निर्गुणतेची उपासना दिली, येशु ख्रिस्तने देव न्यायवादीच नाही तर प्रेमळही आहे हे सांगितले, बुद्धाने धर्मातील कचरा बाजूला सारून धर्माचे मूळ रूप दिले. हे सगळे बदल त्यांच्या क्रांतिकारी विचारांची साक्षच देतात.

पण जेव्हा यांच्याच विचारांचा अतिरेक होतो ,या महापुरूषांना ठराविक साच्यात कैद करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा अंधश्रद्धा तयार होते. श्रद्धा ही डोळस असते, तिच्यात योग्य आणि अयोग्य या गोष्टींची जाण असते. विचार काहीही असो, त्या विचारांचा या अंतिम उद्देश हा मानवाचे पुनरुज्जीवन करणे हाच आहे हेच महत्त्वाचे मानले जाते. याउलट आमच्या महापुरुषांनी हे सांगितले आहे,त्यामुळेच जसे आहे तसेच केले पाहिजे, नाहीतर आम्ही ते खपवून घेणार नाही असा दुराग्रह म्हणजे अंधश्रद्धा. एखादी गोष्ट समजून न घेता करणे अथवा न करणे म्हणजे अंधश्रद्धाच होय, मग भलेही ती गोष्ट योग्य की अयोग्य का असेना. कारण ती कृती अथवा त्या कृतीला विरोध हा आंधळेपणाने केला जाते. त्यात ती कृती करण्यासाठी लागणारी समज नसेल , मग ती श्रद्धा डोळस असू शकत नाही.

या अंधश्रद्धेचे विविध रूपे आपण बघत असतो, मग ती कोणत्याही धर्मची का असेना. बऱ्याचश्या अशा गोष्टी अथवा कृती या तेव्हाच्या काळातील असतील , तर त्यांच्या चिकित्सा केल्यानंतर असे लक्षात येईल की आता त्याची गरज नाही. उदाहरणार्थ , पशुबळी देणे, जादूटोणा मानणे, अमावस्येला प्रवास टाळणे. काही अंधश्रद्धा या काळाच्या ओघात नष्ट होतात. उदाहरणार्थ, समुद्रप्रवास निषिद्ध मानणे वगैरे. तर काही अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था. जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी असलेले अधिकार नाकारले जातात, अशा सर्वच गोष्टींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा नष्ट होण्यास मदत होईल.

अंधश्रद्धा मुळापासून जर नष्ट करायची असेल तर सर्वच धर्मातील चालू अशा सर्वच परंपरांची चिकित्सा करणे आवश्यक ठरते (चिकित्सा म्हणजे फक्त टीका नव्हे). जसे जुने ते सर्वच सोने नसते ,तसेच जुने ते सर्व टाकावू नसते, हेही समजून घेणे गरजेचे आहे. तरच आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात असलेली सीमारेषा स्पष्ट करून घेऊ शकतो. एक सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्याला हे करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे, तर झपाट्याने बदलणाऱ्या या युगात टिकून राहण्यासाठीही आपल्याला हे करावेच लागेल.

लेखक: विवेक वैद्य

Previous Article

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे

Next Article

वाहून गेलेली माती आणि माणसे !

You may also like