Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

श्रद्धा…

Author: Share:

माणूस एक समाजशील प्राणी आहे. माणसाचे मन अतिशय संवेदनशील आहे. म्हणून माणूस एक संवेदनशील समाजाभिमूख प्राणी आहे. हे समजून घेतले म्हणजे माणसाला श्रध्दा का आवश्यक असते हे समजते. एखाद्या उच्च ठिकाणी आपले मन वाहणे आवडते. तिथे कुणाशी स्पर्धा नसते मद मत्सर राग लोभ वासना तिथे राहत नाही. श्रद्धा माणसाच्या मनाला संतुलित ठेवते. भगवद्गीता सांगते सर्वधर्म परित्यज माझ्याकडे ये. माझ्याकडे ये याचा अर्थ समजणे म्हणजे मोक्ष. हिंदू धर्मावर टीका करणारे अनेक जण धर्मातील काही मान्यतांवर विशेषत: पुराणावर टीका करताना धर्माच्या श्रद्धेवरच टीका करतात. श्रद्धा ही गोष्ट माणसासाठी आत्यंतिक महत्वाची आहे. मग त्याचे ओरिएंटेशन काहीही असो. धार्मिक असो आस्तिक असो नास्तिक असो! आणि श्रद्धा का महत्वाची आहे हे समजण्यासाठी गणेशोत्सव उत्तम स्रोत आहे. 

गणपती ही विद्येची देवता आहे. तो गणांचा पती आहे. तो आरंभदेव आहे. विद्या, कला, ज्ञान, विज्ञान,सुख आनंद अशा सर्व पवित्र गोष्टीशी गणपती जोडलेला आहे. तो विघ्नहर्ता आहे. ह्या सर्व भावना मानवी जीवन सुंदर समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत. आणि ह्या भावनांचे मूळ हे देवाच्या अधिष्ठानात ठेवण्यात आले आहे. भारतीय माणूस हा धार्मिक आहे, आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय माणसाच्या प्रत्येक गोष्ट धर्मकारणातून पचनी पडते. अर्थात मानवी जीवनात वरील सद्भावनांचा अंतर्भाव करण्यासाठी ईश्वराचे अधिष्ठान महत्वाचे आहे. समर्थ रामदास म्हणतात तसे सामर्थ्य आहे चळवळीचे.. मात्र तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हिंदू धर्मातील मान्यतांशी तुम्ही जर ह्याचा संबंध जोडलात तर तुम्हाला सहज समजेल की आनंद, सुख, विद्या, ज्ञान, कला ह्या गोष्टी हिंदू धर्माच्या अंतर्भूत बाबी आहेत. धर्मापासून त्या वेगळ्या करता येत नाहीत. आणि गणेश हे त्या अंतर्भूततेचे एक शक्तीअधिष्ठान आहे.

हिंदू धर्माच्या मुलस्थानात म्हणजे वेदोपनिषदांमध्ये आणि ह्या दुधाचे अमृत म्हणजे भगवद्गीतेत वरील सद्भावनांविषयी प्रचंड चर्चा करण्यात आली आहे. त्यावर आपण विस्ताराने नंतरच्या लेखात बोलू. मात्र वेदान्तातील ते तत्वज्ञान रोजच्या जगण्यात आणण्यासाठी ईश्वराचे अधिष्ठान सांगितले आहे, ज्याच्यातून सर्वसामान्य माणूस सहज ह्या सद्भावनांशी सांगड घालू शकतो.

या अनुषंगाने तुम्ही गणेशोत्सवाकडे पहा. गणरायाची मूर्ती प्रेमळ असते. अगदी तो उत्तुंग असला तरी त्याच्या डोळ्यात प्रेम आहे. गणपती चतुर्भुज आहे. हे चार हात कर्माचे प्रतीक आहे. दो- हाती शस्त्र आहेत. एका हाती आशीर्वाद आहे. एका हाती शास्त्र आहे. कधी गणेश बाळ रूपात तुम्हाला दिसेल. कधी कलेचे अधिष्ठान करणारा दिसेल, कधी विघ्न हरण करणारा दिसेल. हे सगुणरूप आहे असे धर्म सांगतो. त्यामुळे सगुण रूपात जेंव्हा मूर्ती सतत तुमच्या समोर असते, तेंव्हा वरील सद्भावना तुमच्या मनात दाटून येतात. ही श्रद्धा आहे, जी आसुसून तुमच्यातील चांगल्या भावना वर आणत असते. अगदी दुर्गेचे रूप पहा. दैत्याचा संहार करणारी ती चेहऱ्याने प्रसन्नवदना असते. हे स्त्रीशक्तीची रूप आहे. दुष्टांचा संहार करणारी ती मूळ एक ‘आई’ आहे. ही श्रद्धा आहे जी समस्त स्त्री जातीविषयी तुमच्या मनात आदर निर्माण करायला प्रेरित करते. शंकराचे रूप पहा. पिंडाच्या स्वरूपात तो तुम्हाला संहारक शक्तीची जाणीव करून देत असतो. स्मशानात राहून वैरागी असणारा, उमेच्या प्रेमात तल्लीनही होतो, आणि वैरागीपणे आपल्या कर्माचे पालनही करतो, भग्वद्गीतेचा कर्मसंन्यास योग वेगळा काय आहे? हे सगुण रूप आहे जे तुमच्या मनात विशिष्ट चांगल्या भावना, विचार आणि इच्छा निर्माण करते, ह्यातूनच तुमचे कर्म घडावे असे हिंदू धर्माला अपेक्षित आहे. म्हणूनच श्रद्धा हा हिंदू धर्माच्या व्यापकतेचा आधार आहे- मग तो राजयोग असो, कर्मयोग असो किंवा भक्तीयोग.

गणेशोत्सव मग तो घरगुती असो किंवा सार्वजनिक आनंदाचे प्रतीक आहे. त्याला उत्सव म्हणतात. अवघे आयुष्यच उत्सव म्हणून साजरे करण्याची हिंदू धर्माची शिकवण आहे. आनंद घेणे हे गुणाचे लक्षण आहे. गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि तुमच्यातील पुरुषाला बद्ध करतात. पण म्हणून आयुष्य सुतकी चेहऱ्याने जगावे, आनंद घेऊ नये असे नाही. स्वतःला मला अर्पित करून आयुष्य जग असे भग्वद्गीता सांगते. गणपतीचे दिवस सर्व माणसे गणपतीसाठी झटत असतात, त्यातून त्यांना आनंद मिळतो. सकाळची पूजा असो, आरती असो, नैवेद्य असो, ऋषिपंचमी असो, अगदी विसर्जन..तो आनंद गणपतीच्या चरणी वाहून घेतल्याने भग्वद्गीतेच्या शब्दात ‘गुण आपल्या शरीराला बद्ध करत नाहीत. म्हणूनच एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पुढच्या गणेशोत्सवाची आतुरता ठेऊन आपण पुढच्या कर्मास लागतो. जीवन  उत्सव म्हणून उपभोगणे तरीही अडकून न राहणे, सर्व अर्पण करणे भगवंतापाशी ही शिकवण गणपतीचे दिवस देतात ते आयुष्यभरासाठी. ही श्रद्धा आहे, आणि त्याचे अधिष्ठान ईश्वर आहे.

विसर्जन.. आपल्या लाडक्या बाप्पाला आपण आनंदाने निरोप देतो. दुःखही असते ते एक उत्सव संपण्याचे. मात्र आपली भावना काय असते, देव आपल्या घरी पाहुणा म्हणून आला, आणि आता परत आपल्या घरी चाललेला आहे. विसर्जनाच्या दिवशीही आनंदाने निरोप का दिला जातो? गणपती बसतात, तेंव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते. अर्थात त्या पार्थिव मूर्तीत प्राण येतात. विसर्जनाआधी ते प्राण मूर्तीतून निघून जातात. अशा पार्थिवाचे (येथे मूर्ती मातीची आहे असे अपेक्षित आहे) आपण विसर्जन का करतो? कारण जे प्राण होते ते आपल्या ठिकाणी निघून गेले, जे पंचतत्त्व आहे, त्यात ते समाविष्ट झाले. पुढच्या वर्षी पुन्हा आपण त्यांना बोलावू, ते येतील.. भग्वद्गीतेत आत्म्याचे निर्गमन आगमन सांगितले आहे तो हाच तर सिद्धांत आहे. “ज्याप्रमाणे वस्त्र गहाळ झाले की आपण ते बदलतो तसेच शरीर गहाळ झाले की ते त्यजून आत्मा दुसऱ्या शरीरात जातो”. विसर्जनात हेच तत्व आपण जगत नाही काय? आणि गणरायांच्या पार्थिवात आपण आग्रहाने आमंत्रित केलेला पुरुषोत्तमाचा प्राण, आपला पाहुणचार घेऊन परत ब्रह्मतत्वात विलीन झाल्यावर ज्या मूर्तीचे साधन बनून ईश्वर आले होते ती मूर्ती आपण पंचतत्वांपैकी एक अशा पाण्यात विलीन करतो. जीवन जगण्याचे, मृत्यूचे, आत्म्याच्या प्रवासाचे, पुनर्जन्माचे आणि अंतिम स्वतःला ओळखण्याचे हे शिक्षण गणपतीचे पाच दहा दिवस देतात, ते याच श्रद्धेच्या माध्यमातून!

म्हणूनच, श्रद्धा हा माणसाच्या जीवनाचा आरसा आहे. त्यात तुम्ही तुमचे प्रतिबिंब पाहाल तर तुमचे बाह्यरूप नव्हे तुमचे अंतरूप तुम्हाला दिसेल. श्रद्धा तुम्हाला तुमचे अंतरूप सुंदर करण्याची प्रेरणा देते, आणि साधनाही. तुम्हाला आयुष्य जगण्याचे प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक आहे. तुमचे मन बुद्धी यांना एका शाश्वत शांत आणि सुखमय ठिकाणी विश्वासाने ठेवता यावे असे साधन आहे. मग तुमची श्रद्धा कुठेही असो. कुठल्याही धर्मावर, देवावर, कुणा सत्पुरुषावर, गुरुवर, पण त्यातून तुम्हाला हा आयुष्याचा अर्थ मिळाला पाहिजे. स्वतःला ओळखण्याचा, बद्ध न होण्याचा आणि आत्म्याच्या चिदानंद स्वरूपाचा अर्थ. तो समजण्याचे श्रद्धा हे स्थान आहे. मग ती कुणावरही असो. ह्याअर्थाने हिंदू धर्म सर्वमावेशक आहे, कारण श्रद्धा हा प्रत्येक माणसाचा स्थायीभाव आहे.

कारण स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे संस्कार ते नाहीत जे तुम्ही चारचौघांसमोर दाखवता, ते आहेत, जे तुम्ही एकटे असताना वागता! आणि गीता सांगते, संस्कार माणूस घडवतात, माणूस समाज आणि समाज राष्ट्र घडवतो.

म्हणून निश्चिंत भावनेने श्रद्धा ठेवा…

Previous Article

मंत्रपुष्पांजली अर्थात राष्ट्रप्रार्थना:

Next Article

राजियांचे मन.. सिंधुदुर्ग १

You may also like