‘बावन्न’कशी शिवसेना

Author: Share:

लेखास प्रारंभ करण्यापूर्वी एक स्पष्ट करू इच्छितो की मी शिवसैनिक नाही किंवा शिवसेनासमर्थकही नाही. सेनेबद्दल जेंव्हा लेखणी उचलली तेंव्हा ती टीका करण्यासाठीच होती. पण ती टीका तात्कालिक घटनेवर आधारित होती. यापुढेही असेल. पण आज मी जो विचार करतो आहे तो एक संघटना म्हणून मागील बावन्न वर्षांचा करतो आहे. आणि असा विचार करताना, एका डोळ्यात प्रश्न असतील, पण दुसऱ्या डोळ्यात कौतुक आहे हे सांगायला कचरावे असे मला वाटत नाही.

 १९ जून १९६६, महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील एक मोठा क्षण आहे. दिवंगत श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाच्या एका राजकीय पक्षाचा पाया घातला. त्या पायाला त्यांनी मार्मिक मधून उठवलेल्या व्यंगात्मक ठिकाणची दमदार पार्श्वभूमी होती. ‘वाचा आणि थंड बसा’ असे म्हणून त्यांनी संताप भरवलेल्या डोक्यांना एकत्र केले.आणि त्यांनी एकत्र येऊन रान पेटवले. ह्या मागे थोडे जायचे तर संयुक्त महाराष्ट्राची अभिमानी चळवळ महाराष्ट्रात झाली (आणि ती स्वतंत्र महाराष्ट्रात करावी लागली हे दुर्दैवही). या चळवळीच्या नेतृत्वाने आणि लोकसहभागाने ती चळवळ यशस्वी करून दाखवली आणि महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याच्या इतिहासात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. पण पुढे काय? याचे उत्तर चळवळीकडे किंवा नेत्यांकडे नव्हते. याबाबतीत त्यांना अजिबात दोष जात नाही कारण, त्यांचे कार्यक्षेत्र त्यांनी मर्यादित ठेवले होते, आणि तेवढे त्यांनी अंशतः साध्य केले. (बेळगावसह सीमेवरील प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने, ते कार्य पूर्ण सिद्धीस गेले असे नाही म्हणता येणार पण तात्कालिक स्थितीत मुंबई महाराष्ट्रामध्ये आणणे हा एक टप्पा होता, तो त्यांनी पूर्ण केला). ‘यानंतर काय’ हा मोठा प्रश्न उभा असतानाच, मुंबईत अमराठी लोकांच्या आर्थिक आणि नंतर सामाजिक व राजकीय वर्चस्वाचा प्रश्न मराठी माणसापुढे दिसू लागला. हा प्रश्न सोडवण्यासाठी एका आक्रमक (लढाऊ नसली तरी) संघटनेची आवश्यकता होती. हि गरज प्रबोधनकरांनी आणि बाळासाहेबांनी हेरली. आणि त्यातून शिवसेनेचा जन्म झाला. थोडक्यात शिवसेना किंवा एखाद्या मराठी पक्षाचा जन्म हि त्यावेळची राजकीय आणि सामाजिक निकड होती जी शिवसेनेने पूर्ण केली. फक्त झाले इतुके, की केवळ आक्रमक संघटनेची गरज असताना, शिवसेनेने लढाऊ बाणाही दाखवल्याने, मूळ लढाऊ मराठी माणसाच्या आणि विशेषतः तरुणांच्या मनात ती खोलवर गेली.

तो काळ डाव्यांच्या शक्तीचा होता. मुंबईच्या विशेषतः, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षितिजावर गिरण्यांच्या अर्थकारणाचे, कामगारांचे आणि अनुषंगाने कामगार चळवळीचे अधिपत्य होते. आणि ह्या कामगार चळवळी सक्षम डाव्या नेत्यांच्या हातात होत्या. त्यांना शाहिरांची आणि लोककलाकारांची साथ होती. जगण्याचे बिकट प्रश्न पुढे असलेल्या कामगारांना आपल्या बाजूने बोलणारे डावे जवळचे वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे, ह्या कामगार चळवळी हातात घेणे, आणि त्यावरील डावे वर्चस्व संपवणे सेनेला राजकीय दृष्टया आवश्यक होते. सेनाजन्माच्या काळात, डाव्यांचे लढाऊ आक्रमक वर्चस्व कमी होऊ लागले होते, ही सुद्धा अगदी सेना वाढीसाठी नियतीने बनवलेली योजना असल्याप्रमाणे झाले. शिवसैनिकांच्या आक्रमक पावित्र्याने त्यामुळे डावे हतबल होऊन गेले, आणि कामगार चळवळ अलगद शिवसेनेच्या गळ्यात पडली. अर्थात अलगद ह्या शब्दाचा अर्थ सहज असा नाही. ह्यामध्ये साम, दाम,दंड भेद ह्याचा वापर झाला.

बऱ्याचदा, शिवसेनेने गुन्हेगारांचे राजकीयीकरण केले असा आरोप होतो. मात्र सेना जन्माच्या आधीपासून राजकारणात गुन्हेगारी होती. डाव्यांनी त्याचा वापर केला होता. तो काळ आणि तत्कालीन समाजरचनाच अशी होती, की गिरणी कामगार मुळात आक्रमक, डाव्यांची आक्रमक छाप, त्यांच्या चाळीतील वसाहती, त्यामधून निर्माण होणारे चाळीतले दादा, त्यांच्या गॅंग वगैरे गोष्टी आपसूक निर्माण झाल्या होत्या. शिवसेनेने जर त्यातील काहींना किंवा बहुतेकांना आपल्याकडे ओढले असले म्हणजे सेनेने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले असा होत नाही. अगदी म्हणायचे तर असे म्हणू शकतो, की सेनेने त्यांना त्या दलदलीतून बाहेर काढून ‘व्हाईट कॉलर’ केले.

सेना कशी वाढली याचा इतिहास ज्याला कळेल त्याला संघटन कसे उभारायचे हे समजू शकेल. संघटना कशी उभारायची आणि वाढवायची ह्याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पैकी शिवसेना मुळात लढाऊ आणि आक्रमक संघटन म्हणून वाढली आहे. त्यामुळे तिची उभारणी त्याच पायावर झाली. पण, सर्वसामान्यांच्या घरात शिरण्यासाठी सेनेने सामान्यांना शाखेची दारे उघडी करून दिली. त्यांच्या नोकरीच्या प्रश्नांपासून ते त्यांच्या घरातील भांडणापर्यंत शाखेत सामान्यांची पाऊले पडू लागली आणि इथेच सेनेने अर्धी लढाई जिंकली. आजच्या मॅनेजमेंट च्या भाषेत त्याला ‘फुटफॉल्स वाढवणे’ असे म्हणतात. शाखेच्या बाहेर फुटफॉल्स वाढले. प्रबोधनकारांनी बाळला जे सांगितले होते, की ‘आपल्या दरवाज्याबाहेरच्या चपला हीच आपली संपत्ती आहे’, बाळासाहेबांनी ती संपत्ती शाखे-शाखेबाहेर आणली.

मुळात बाळासाहेबांनी एकीकडे लोकांना शाखेशी जोडले, आणि सेनेकडे येणाऱ्या लोकांच्या हाताला काम दिले.मग घराघरात असलेले प्रश्न सोडवणे असो, चाळीतले प्रश्न सोडवणे असो किंवा अगदी त्यात उत्सवांचाही समावेश होता. पण तरुण चालता झाला. हे जे हाताला काम देणे आहे, हे फक्त दोनच संघटनांना जमले, एक सेना आणि दुसरी आरएसएस. ह्यातूनच संघटना वाढीस लागतात. अगदी जे आरएसएस ला जमले ते भाजपलाही जमले नाही. राष्ट्रवादी अगदी तळागाळात पोचलेल्या काँग्रेसलाही नाही. मनसे तर शिवसेनेच्या मुशीतून तयार झलेल्या लोकांचा पक्ष. पण अजूनही राज ठाकरेंना मनसैनिकांच्या हाताला काम देणे जमलेले नाही. शाखा उघडून बसणे म्हणजे काम करणे नाही. भगवा टिळा लावलेल्या आणि पांढरे कपडे घातलेल्या शिवसैनिकांच्या शिवरायांचे फोटो लावलेल्या बाईक्स रस्त्यातून फिरायच्या तेंव्हा लोकांना वाटायचे आपल्यातील कुणी आले आहे. हे जे काही आहे, ते शिवसेनेकडे होते. हे ‘आपलेपण’ भारतभर पसरलेली आरएसएस सुद्धा साध्य करू शकली नाही.

बऱ्याचदा ही टीका सेनेवर होते, की शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर सेना करत आली आहे. शिवरायांच्या नावाचा उपयोग केला हे सेना सुद्धा नाकबूल करणार नाही, कारण नावातच ‘शिव’ आहे. आता लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी महाराजांचा इतिहास पाया म्हणून सेनेच्या नेतृत्वाने वापरला असेल म्हणजे गैरवापर म्हणता येणार नाही. किंबहुना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगतात त्याप्रमाणे, शिवाजी महाराज हे एक ‘वैश्विक व्यक्तिमत्व’ आहे. ते कुणाच्या मालकीचे नाही ते विश्वाच्या मालकीचे आहे. त्यामुळे, मराठी माणसासाठी काम करू पाहणाऱ्या आणि त्यासाठी मराठी माणसाला कार्यकर्तृत्वाचा प्रेरित करू पाहणाऱ्या बाळासाहेबांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा, इतिहास, शब्द वापरले असतील, तर त्यात वावगे वाटण्याचे काही कारण नाही. भावी पिढ्यांना प्रेरित करण्यासाठी इतिहासाचे दाखले दिलेच पाहिजेत. मागे महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या भाषणातील ऐतिहासिक दाखले आणि शब्दप्रयोगांचे दाखले देऊन विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. जिथे भाषण शांतरसाचे असेल तिथे अभ्यासपूर्ण मांडणी होते, पण जिथे भाषाच लढाऊ आक्रमक असेल तिथे, रक्त चेतावणारी भाषा असणारच!

सेनेवर अजून एक टीका होते ती म्हणजे बाळासाहेबांनी आपली भूमिका अनेकदा बदलली. काळाच्या संदर्भात एखाद्या विचारवृत्तीचा अभ्यास करताना, विचार आणि आचारांचे कालातीत आणि कालसापेक्ष अशा दोन भागात विभाजन केले पाहिजे. सेनेने वेळोवेळी घेतलेल्या किंवा बदललेल्या प्रत्येक भूमिकेचा मी समर्थक नाही. पण, राजकीय पक्ष म्हणून वेळोवेळी  काही तात्कालिक भूमिका घेण्याची आवश्यकता असते. या भूमिका तुमच्या मूलतत्वांशी किती कोनात बदलत्या आहेत त्यावर त्यांची विश्वासार्हता अवलंबून असते. मात्र त्या काही भूमिकांसाठी तुम्ही संघटनेवर प्रश्न उभे करू शकत नाहीत. उदा. आज भाजपने कितीतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपले केले आहे, तिथे काश्मिरात पीडीपीशी ज्यांच्यावर त्यांनी फुटीरतावादाचा आरोप केला होता त्यांच्याशी संसार थाटला. आजच त्यांनी काडीमोड घेतला आहे.  भाजपच्या मूलतत्वांशी किती कोनात फारकत घेणाऱ्या आहेत हे ज्यांनी त्यांनी ठरवावे. भाजपला यात काहीही वावगे वाटत नाही म्हणून त्यांनी ते निर्णय घेतले. त्यांच्याप्रमाणे सेनेला त्या त्यावेळेस आपले निर्णय किती योग्य वाटले असतील त्याप्रमाणे त्यांनी भूमिका घेतल्या किंवा बदलल्या. त्या किती योग्य अयोग्य यांचे मूल्यमापन होऊ शकेल, पण मुळात ‘भूमिकाच बदलणे अयोग्य’ असे म्हणणे राजकीय विनोद ठरेल!

सेनेशी अजून एका बाबतीत विरोधकांचे वाग्युद्ध भडकते ते म्हणजे सेनेचा हेकेखोर पणा. होय सेना हेकेखोर आहे. पण तसे सगळेच आहेत. कोण आपल्या चुका मान्य करतो?  आपण घेतलेली भूमिका आणि त्यासाठी सांगितलेले तात्विक कारण जर नेतृत्व बदलू लागले, तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही का निर्माण होणार?. त्यातून सेनेने स्वतःची उभारणीची विचारदिशाच शिवरायांच्या तत्वज्ञानावर आहे असे चित्र शिवसैनिकांसमोर उभे केल्याने, आपली चूक स्वीकारणे, म्हणजे आपण शिवतत्वांपासून ढासळले होतो हे मान्य केल्यासारखे होईल अशी रास्त भीती सेना नेत्यांना वाटत असावी. त्यामुळॆ, सतत शिवसेनेच्या नेतृत्वाकडून सैनिकांना बळ देण्यासाठी वीरोक्तीपूर्ण भाषाच वापरली जाते. यामध्ये सेनेला सोडून जाणारे गद्दार, पाठीत खंजीर खुपसणे किंवा सेनेला संपवण्याची भाषाच करणारे मातीमोल झाले असे वाक्प्रचार वापरले जातात. ह्यामध्ये सेनेच्या नेतृत्वाचा मानसिक विचार होणे आवश्यक आहे. उदा. जे बाळासाहेबांच्या अगदी जवळचे होते, असे छगन भुजबळ जेंव्हा सेना सोडून गेले, बाळासाहबांनी ज्यांना मुख्यमंत्रीपद दिले ते राणे सेना सोडून गेले, अगदी खुद्द साहेबांचा पुतण्या ज्याच्याकडे उद्योगसेना होती, जो बाळासाहेबांसोबत सतत असे आणि कुठेतरी बाळासाहेबांचा वारस म्हणून काही शिवसैनिक त्याच्या कडे पाहत होते, ते राज ठाकरे सोडून गेल्यावर, शिवसैनिकांची मानसिक अवस्था काय झाली असेल? म्हणजे ज्या सेनेला हृदयात स्थान ठेऊन, बाळासाहेबांना हृदयात बसवून आणि दादरमधून येणारा शब्द आणि शब्द फुलासारखा झेलणाऱ्या शिवसैनिकांना, दादरमध्ये दुभंग होतोय असे वाटत असेल, तेंव्हा ते आतून हलत नसतील का? ते हलू नयेत म्हणूनच त्यांना मानसिक बळ देण्यासाठी, जाणारे आपले नव्हतेच, त्यांनी खंजीर खुपसले अशी भाषा नेतृत्वाने वापरली, आणि त्यात सेनेच्या बाजूने विचार केला तर चुकीचे काही नाही.

शिवसैनिकांचे शिवसेनेशी, बाळासाहेब ह्या शब्दाशी आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक अक्षरांशी भावनिक नाते निर्माण झाले आहे. ही भावना घट्ट करण्यासाठी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या विचारांशी सेनेने आपला सांधा सांधण्याची भूमिका दर्शवली आहे. त्यामुळेच भगवा, शिवसेना, बाळासाहेब, त्यांची माळ, “आता रडायचं नाही लढायचं” ह्या गोष्टी ऐकल्या तरी त्याच्या मनात कालवाकालव होते. ही भावनिक नाळच त्याला शिवसेनेशी जोडून आहे, जिने शिवसेना रुजवली, वाढवली आणि विस्तारली. कोकणात किंवा विदर्भातील एखाद्या शिवसैनिकाच्या हातातील शिवबंधन त्याला दादरशी जोडणारा अदृश्य गोंद आहे, तो तितकाच घट्ट आहे, जितका मातोश्रीवर किंवा सेनाभवनात रोज जाणाऱ्या शिवसैनिकाचा आहे.

हे नाते जितके घट्ट ठेवता येईल तितकी सेना एक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणून घट्टपणे आपले पाय रोवून उभी राहील. वरच्या विवेचनात, बाळासाहेबांनंतर शिवसेना काय होईल ह्या प्रश्नाचा विचारही घेतला नाही, कारण ती अजूनही टिकून आहे हे एव्हाना स्पष्टपणे दिसून आले आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर बाळासाहेब असतानाही जे सेनेला राजकीय दृष्टया यश मिळाले नाही (आकड्यांच्या स्वरूपात) ते उद्धव ठाकरेंनी मिळवले, अर्थात त्याला बाळासाहेबांच्या पुण्याईचाच पाया आहे.

वर केलेले सगळे विवेचन शिवसैनिकांच्या बाजूने केले आहे.  मात्र, शिवसेना नेतृत्वावर आणि नेत्यांवर प्रचंड जबाबदारी आहे आणि त्यात कसूर करून चालणार नाही. आपला शिवसैनिक वैचारिकरित्या गोंधळेल, डळमळेल, दुःखी होईल, त्याला छाती पुढे काढून विरोधकांसमोर बोलता येणार नाही असे कुठलेही कृत्य शिवसेनेच्या नेतृत्वाकडून, नेत्यांकडून, खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्याकडून घडणार नाही याची खबरदारी त्यांनी घेणे नितांत आवश्यक आहे. जिथे आपल्याला सत्ता आहे, तिथे प्रशासनात आपल्याकडून चूक घडणार नाही, ज्याची टीका शिवसैनिकाला आपल्या गावात सहन करावी लागेल आणि त्यावर तो बोलू हशकणार नाही अशा चुका आपल्याकडून घडणार नाहीत हे नेत्यांनी पहिले पाहिजे. आपण केवळ सत्तालोलुप आहोत, म्हणून सत्तेतून बाहेर न पडण्याचा दबाव आपण सेनेनेतृत्वावर आणत आहोत असे दृश्य दिसणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. थोडक्यात, जे शिवसैनिक आपले इमान मानतो, निष्ठा मानतो, जे विचार तो पोटतिडकीने एकांतात किंवा शिवसैनिकांसमोर व्यक्त करतो शाखेवर-कट्ट्यांवर, त्यापासून आपले कृत्य फार जास्त विसंवादी असणार नाही, शिवसैनिकाच्या स्वाभिमानाला, बाण्याला ठेच पोचणार नाही. ह्याची काळजी नेतृत्वाने घेतली पाहिजे.

भावनिक नात्यांची वीण बांधून जी संघटना तयार होते ती काचेसारखी असते. तोडायला कठीण, प्रयत्न करणाऱ्याचेच रक्त काढू शकणारी. पण ती आतून दुभंगली तर तो तडा न भरून निघणारा असेल.

ही काच शिवसेना नेतृत्व सांभाळेल अशा शुभेच्छा!! 

-हर्षद माने

______________________________________________

संदर्भग्रंथ :   जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे-प्रकाश अकोलकर

         कथा मुंबईच्या गिरणगावची: नीरा आडारकर, मीना मेनन

Previous Article

सत्तरी ओलांडलेला नवतरुण…

Next Article

वांगणी चे रहस्य…

You may also like