ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच ती वेळ, हाच तो क्षण

Author: Share:

मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे राष्ट्रवादी सोबत राजकीय संधान बांधण्याच्या तयारीत असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. हिंदुस्थान टाइम्स च्या वृत्तानुसार तर राष्ट्रवादी विरोधी पक्षांच्या मोठ्या सामायिक बंधामध्ये मनसेला घेण्यास उत्सुक आहे मात्र काँग्रेसला ते नको आहे. राज ठाकरे यांनी सातत्याने मोदींवर टीकास्त्र सोडलेच आहे. मधून ते शिवसेनेवरही टीका करत असतात. गेले काही दिवसांची वर्तमानपत्रे चाळता, राज ठाकरे विरोधी पक्षांच्या महामेळाव्यात सामील होताहेत की काय अशी शंका घेण्यास पुरता वाव आहे. लोकसभा निवडणूक दृष्टीपथात आल्याने आणि मागाहून विधानसभासुद्धा लागल्याने राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली असताना राज ठाकरे आपल्या सुपुत्राच्या लग्नाची पत्रिका घेऊन मातोश्रीवर आले आणि आज ठाकरे बंधूंचा शेकहँड करतानाचा फोटो वायरल झाल्यावर हे राजकारणात कधी पहायला मिळेल अशा स्वाभाविक प्रतिक्रिया उमटल्या. (लग्नाची पत्रिका द्यायला मातोश्रीवर आले म्हणौन लगेच राजकीय बंध जुळतील असे मानण्याएवढा मतदार मूर्ख नाही; ही मराठी मनाची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे). तर राजकीय गणिते काय असोत ती असोत, आणि त्या गणितांची उकल करताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांना वाटते तो मार्ग निवडोत, पण येत्या विधानसभा निवडणुकीपासून ठाकरे बंधू एकत्र यावेत असे  आम्हास वाटते. ते का याचे हे मुद्दे:

१. मराठी माणसाची बहुतांशी इच्छा तीच आहे. लोकशाही हे लोकांचे राज्य असे म्हटले तर, लोकांना काय वाटते हे महत्वाचे. किंबहुना कुठल्याही राजकीय पक्षाने, लोकेच्छेला मान देऊन राजकारण करावे हे आदर्शवादी आहे. मात्र अशा आदर्शांपेक्षा, राजकारण म्हणून पहिली जाणारी गणिते अधिक महत्वाची मानली जातात. ते वास्तविक अयोग्य आहे, आणि तुम्ही जर अशा गणितांची झालेली फरफट पाहिलीत तर, जे नैसर्गिक आहे तेच टिकले आहे हे तुम्हाला मागच्या ७० वर्षांचा इतिहास पहिला तर सहज लक्षात येईल. आज नैसर्गिक काय आहे?

शिवसेनापासून तुटल्यावर आणि अगदी गद्दार वगैरे ठरवल्यानंतरही, राज ठाकरेंनी एकत्र यावे असे काही शिवसैनिकांनाही, मनसैनिकांनाही वाटते. पण महत्वाचे म्हणजे, अनेक मराठी लोकांनाही ते वाटते. अगदी व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्याला दोन कंपन्यांनी जॉईंट व्हेंचर करण्यास उत्तम परिस्थिती कोणती असे विचारले तर तो सांगेल, जेंव्हा परस्परपूरक आणि भिन्न वैशिष्ट्ये असलेले नेतृत्व एकत्र येते असे जॉईंट व्हेंचर चांगले. राज ठाकरे यांचा बोलण्याचा करिष्मा आणि उद्धव ठाकरे यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे मराठी माणसाला अपेक्षित अशी राजकीय शक्ती निर्माण होण्यास मदत होईल हे तो विद्यार्थीहि सांगेल. शेवटी, ‘मराठी’ म्हणून राजकीय शक्ती महाराष्ट्रात निर्माण झालीच पाहिजे आणि ती टिकलीच पाहिजे. केवळ मराठी साठी आम्ही निर्माण झालो आणि राजकीय समुद्रात लाटेसोबत शिडे बदलतो असे पक्ष मराठी माणसालाही नकोत. महाराष्ट्रपुरुषालाही नकोत आणि महाराष्ट्रालाही नकोत. मराठी माणूस एक सक्षम राजकीय आवाज शोधतो आहे, आणि तो देण्याची पूर्ण ताकद शिवसेना आणि मनसे दोघांमध्येसुद्धा आहे, अर्थात एकत्र! त्यामुळे राजकीय शक्ती विखुरण्यापेक्षा एकत्र येणार असेल तर मराठी माणूस अशा युतीला भरभरून मतदान करेल असे आम्हास वाटते. यामध्ये शिवसेना आणि मनसे यांना मत देणाराही आला, आणि सध्या इतर पर्याय शोधणारा पण, मराठी माणसे एकत्र आल्याच्या आनंदात नव्याने मतदान करणाराही येऊ शकेल.

२. देशभरात, प्रादेशिक पक्ष स्वतःला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करताहेत आणि लोकही त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत, असे दिसते. मतपेट्यांतून प्रादेशिक पक्षांना झालेले मतदान पाहिले तर हे सहज लक्षात येईल. प्रादेशिक पक्षांची आवश्यकता असते का तर १००% असते. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्ष संपवण्याची दुर्बुद्धी सुचत असेल तर तो कुऱ्हाडीच्या पात्यावर पाय आदळत आहे असे समजावे. प्रादेशिक पक्षांची गरज राष्ट्रीय पक्षांनाही असते. रेल्वे असताना बस किंवा रिक्षा कशाला पाहिजेत? प्रत्येक शेवटच्या ठिकाणी रेल्वे पोचू शकत नाही. ती महत्वाची ठिकाणे घेईल. पण प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्यासाठी रोड ट्रान्सपोर्ट हवाच. प्रादेशिक पक्ष लोकशाहीतील रोड ट्रान्सपोर्ट आहे. प्रत्येक राज्यालाही प्रादेशिक पक्षांची आवश्यकता असते. मुख्याध्यापकापेक्षा आपल्या वर्गातल्या बाईंकडे मुलं जास्त मोकळेपणाने बोलू शकतात. प्रादेशिक पक्षांनी आपली ही भूमिका समजली पाहिजे. महाराष्ट्रात तर ती अधिक महत्वाची आहे. कारण मराठी अस्मिता हा एक मोठा अलंकार मराठी माणसाकडे आहे, आणि मराठी माणूस तो सन्मानाने मिरवतो. मराठी भाषा, मराठी कला, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती जपण्यासाठी ह्या प्रादेशिक पक्षांची आवश्यकता निश्चित आहे, आणि महाराष्ट्राला अधिक! बाळासाहेब ठाकरे हे मराठी अस्मितेशी नाळ साधतात. राज ठाकरे हेसुद्धा मराठी अस्मितेबद्दल भरभरून बोलतात. थोडक्यात शिवसेना आणि मनसे मराठी अस्मितेशी पूर्णतः संलग्न एकसंध आहेत आणि ते तसेच राहावेत ही मराठी माणसाची इच्छा आहे. त्यापासून कुणीही वळला तर मराठी माणसाला ते फारसे रुचेल असे वाटत नाही. मात्र दोघे एकत्र आले तर मराठी माणूस मतांचे सलाम ठोकेल यात शंका नाही. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांचे स्वतःचे स्थान आहे, गरज आहे, आणि ती गरज शिवसेना आणि मनसे दोघेही पुरवू शकतात अर्थात एकत्र!

३. मतांच्या बाबतीतीच बोलायचे झाले तर, शिवसेनेची काही मते मनसे उमेदवार घेतात, हे उघड आहे. मनसेची खिल्ली उडवायला, शिवसैनिक हे उघड नाकारतील, पण पूर्णतः तेही नाकारू शकणार नाहीत. बरे, मागील दोन निवडणुकांमध्ये मनसेची झालेली फरफट पाहता, ही मते आणि मनसेचे मतपेटीतील महत्व कमी झालेले वाटत असेल, पण त्या पक्षाचीही स्वतःची बलस्थाने आहेत, आणि त्याचाही विस्तार आहे. कुठल्या क्षणी अचानक मनसेची बलस्थाने पूर्ववत झालेली दिसतील हे सांगता येत नाही, आणि शिवसेना मनसे एकत्र आल्यास ह्या पट्ट्यातील मराठी अस्मिता जागृत असणारा जो कुंपणावरचा मतदार आहे तोही ह्या युतीला मते देईल. त्यामुळे मनसेची आजची ताकद आजच्या मतपेटीच्या मूल्यातून जोखता येत नाही. प्रत्येक कंपनीची खरी ताकद तिच्या बॅलन्स शीट मधून कळेलच असे नाही. आम्ही त्याला अंडरव्हॅल्यूड बॅलन्स शीट म्हणतो.एक मूव्ह आणि कंपनीची बॅलन्स शीट प्रचंड बदलते, हे आम्ही कैक वेळा पहिले आहे.

दुसरीकडे, भाजप किंवा इतर पक्षांना विखुरलेली काही मते, शिवसेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या नंबर वर आणून टाकतात हेही आपण पाहिले आहे. जर मनसेची मते आणि कुंपणावरची मते एकत्र आली तर हे अंतर कित्येक ठिकाणी नाहीसे होईल आणि आज जिथे शिवसेनेची दुसऱ्या नंबर वर वर्णी आहे ती पहिल्या नंबर वर लागलेली दिसेल.

४. मराठी उमेदवारांची प्रामाणिक इच्छा असते, की मराठीसाठी आग्रही असणारा, आणि मराठी उमेदवार आम्हाला मिळावा. मागील काही वेळेस, भाषिक मताधिक्याचा विचार करून अमराठी मतदार देण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र मराठीसाठी काम करणाऱ्या पक्षाकडून मराठी मतदार मराठी उमेदवार अपेक्षित करतो. त्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा मराठी उमेदवार अपेक्षित करतात. आम्ही उपस्थित असलेल्या कित्येक व्यासपीठांवर, अमराठी उमेदवार निवडून येण्याचे विशेषतः महापालिकेत, काही तोटे अधोरेखित केले गेले आहेत. त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यासाठी, मुंबई आणि पुणे ठाणे आणि राज्यात मराठी उमेदवार हवेत अशी मराठी मंडळींची इच्छाच आहे. या इच्छेला मान शिवसेना-मनसे एकत्र आल्यास मिळेल ह्यात शंका नाही.

५. लोकशाहीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे बंधूंमध्ये आणि त्यांनी घडवलेल्या पक्षांमध्ये जातीभेद हा फॅक्टर नाही. दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्ते ह्याबाबतीत अभिमान बाळगतात. आजच्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ह्याची अपेक्षा आहे. जाती जातींविषयीचा अभिमान आणि त्यांचे अधिकार हा मुद्दा वेगळा आहे. अगदी एखाद्या ठिकाणी विशिष्ट जातींचा उमेदवार देणे हे सुद्धा, प्रत्येक जातीला प्रतिनिधित्वाचा अधिकार असला पाहिजे ह्या संविधानिक मुद्द्यावर समर्थनही होऊ शकते. उदा. ठाणे ग्रामीण भागात आदिवासी बहुल भागात आदिवासी उमेवार देणे योग्यच आहे.  मात्र जातीभेद ही वेगळी खेळी आहे आणि राजकीय हेतूंसाठी जातीभेद पोसणे अयोग्य आहे. ठाकरे बंधू ते करत नाहीत हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळेच अशा युतीमुळे महाराष्ट्रात जातीभेदाचे  जर काही वातावरण कुणी तयार करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आळा बसण्यास मदत होईल.

ह्या पूर्ण लेखाचा मूळ मुद्दा एवढाच, की मराठी अस्मिता हा एक खूप महत्वाचा विषय आहे, आणि महाराष्ट्रात मराठी अस्मिता आहे, असलीच पाहिजे आणि ती टिकलीच पाहिजे. मराठी अस्मिता टिकली तर मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी ज्ञान, संस्कृती, साहित्य कला टिकेल. ही मराठी अस्मिता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आणि शक्ती प्रादेशिक पक्षांमध्ये आहे, आणि ती एकत्र अधिक मजबूत होईल. मराठी माणसाला उभं राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी एक सक्षम राजकीय आधार हवा आहे, आणि तो देण्याची ताकद ठाकरे बंधूंमध्ये आहे अर्थात एकत्र येऊन. आणि याचसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजेत. शिवसेना मनसे एकत्र येऊन निवडणुकीत उतरल्यास व्यावसायिक भाषेत सांगतात तसे ऑरगॅनिक सिम्बॉयसिस निर्माण होणार आहे. (एकत्र आल्यामुळे दोन अधिक दोन चार न होता दोन अधिक दोन पाच असा अधिक फायदा होतो त्याला ऑरगॅनिक सिम्बॉयसिस म्हणतात.) अर्थात दोघांचीही शक्ती वाढेल आणि पर्यायाने मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची शक्ती वाढेल.

यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण!!

जय महाराष्ट्र!

Previous Article

१२ जानेवारी 

Next Article

पत्रकार दिन- अर्थात पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण’ सुरु झाले तो दिवस

You may also like