शिवसेना-भाजप युती झाली नाही तर…

Author: Share:

२०१९ चे रणशिंग आता फुंकले गेले आहेत. गुजरात आणि कर्नाटकची निवडणूक जणू सेमिफायनल होती. दोन्ही राज्यांच्या निवडणूकीवरुन भाजपचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमध्ये जरी भाजपचे सरकार स्थापन झाले नसले तरी कर्नाटकच्या जनतेचे भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. एनडीएकडे आता २२ राज्ये आहेत. त्यामुळे भाजपचा पगडा जड आहे. पण आपण महाराष्ट्र विधानसभेपूरती चर्चा करणार आहोत. भाजप आणि शिवसेनेमधील कटूता पाहता युती होईल की नाही ही शंका आहे. भाजपकडून युतीसाठी सकारात्मक वातावरण असले तरी शिवसेनेचे प्रमुख नेते युतीची शक्यता नाकारत आहेत. तरी देवेंद्र फडणविस ह्यांचं म्हणणं आहे की भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत, हिंदूत्व हा समान धागा आहे. म्हणून युती होऊ शकते असं फडणविसंचं म्हणणं आहे. जर निवडणूकपूर्व युती झाली तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा सफाया होऊ शकतो. पण युती न होण्याचेच चिन्ह दिसत असल्यामुळे आपण याच पार्श्वभूमीचा विचार करुया.

फडणविस म्हणतात ते अगदी खरं आहे की हिंदूत्व हा भाजप-शिवसेनेचा समान धागा आहे. आता शिवसेनेची भूमिका भाजपविरोधी आहे. शिवसेनेच्या मुखपृष्ठात भाजप हा पाकीस्तानपेक्षाही मोठा शत्रू असल्याचे म्हटले गेले आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेनेचे पारंपारिक मतदार हे मराठीवादी आणि हिंदूत्ववादी आहेत. इतर मतदार आपल्याकडे आकृष्ट होतील असे प्रयत्न शिवसेनेने अद्याप तरी केलेले नाहीत. बाळासाहेबांना मराठी आणि हिंदूत्व यात समन्वय राखण्यात यश मिळाले होते. हिंदूत्वात मराठीपण सुरक्षित आहे, असा विश्वास बाळासाहेबांनी दिला होता. त्यामुळे शिवसेने महारष्ट्रात एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले होते.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या विरोधात असलेला शिवसेना हा पक्ष आघाडीवर होता. पण ही वेगळी ओळख, हे वेगळे अस्तित्व आता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजे भाजप व शिवसेना हे उजवे पक्ष, तरीही शिवसेना सत्तेत राहून भाजपवर टिका करते. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणूकीत भाजप-शिवसेना लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. कॉंग्रेस भाजपविरोधी गट तयार करण्याच्या सिद्धतेला लागली आहे. अनेक राजकीय पंडीतांचं मत आहे की कर्नाटकपासून भाजपविरोधी गटाची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. हे जर खरं मानलं तर शिवसेना कोणाच्या बाजूने कौल देईल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

वर सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे पारंपारिक मतदार हे मराठीवादी आणि हिंदूत्ववादी आहेत आणि मोदी विरोध करणारे राजकीय पक्ष हे बहुतांश डाव्या विचारांचे आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत फारसा फरक नाही, तर मनसेने सुद्धा मोदीविरोधी भूमिका घेतली आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपवर टिका करत असते. त्यामुळे भाजप विरोधी सगळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे ज्या मतदारांना मोदी नको आहेत, त्यांच्यासाठी बरेच पर्याय आहेत आणि ज्यांना मोदी हवे आहेत, त्यांच्यासाठी भाजप हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सगळे विरोधक जरी मोदींविरोधात स्वतंत्र किंवा एकसंधपणे लढले तरी ते भाजपचा पराभव करतील असं सांगता येत नाही. त्यात मोदी विरोधकांमध्ये शिवसेना हा उजव्या विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे स्वतंत्र लढताना शिवसेनेला फटका बसू शकतो.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी आधी भाजपने १४४ जागांवर लढण्याची मागणी केली होती, नंतर १३० जागांवर लढण्यात भाजप तयार होती. पण शिवसेनेने भाजपला ११९ जागांवर लढण्यास सांगितले. या वादात युती तुटली. प्रत्यक्षात भाजपने स्वतंत्रपणे २८८ पैकी २६० जागा लढवल्या आणि १२२ जागांवर त्यांना विजय मिळाला. उलट शिवसेनेने २८२ जागा लढवल्या आणि केवळ ६३ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. म्हणजे भाजपपेक्षा निम्म्या जागा त्यांनी जिंकल्या. यात लढतीत कॉंग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. भाजपला एकूण १४,७०९,४५५ मते मिळाली आहेत, शिवसेनेला १०,२३५,९७२ मते मिळाली तर कॉंग्रेसला ९,४९६,१४४ व राष्ट्रवादीला ९,१२२,२९९ मते मिळाली आहेत. मनसेला केवळ एकच जागा जिंकता आली तरी १,६६५,०३३ एवढी मते ते यशस्वी झाले. महत्वाचे म्हणजे एमआयएमला ३व जागा मिळाल्या आणि ४८९,६१४ मते त्यांना मिळाली आहेत. ही मते मुस्लिमांची आहेत असे गृहित धरायला हरकत नाही. या सर्व मतांच्या गणितात भाजपचा पगडा भारी आहे.

मुळात २०१४ ची निवडणूक सुद्धा जवळ जवळ मोदी विरोधातच झाली होती. अगदी शिवसेना सुद्धा सत्ताधारी कॉंग्रेसच्या विरोधात नव्हे तर मोदींच्या विरोधात लढत होती. याचा फटका त्यांना लहान भाऊ व्हावे लागले. कॉंग्रेसची शक्ती महाराष्ट्रात कमी होत असताना नैसर्गिकरित्या शिवसेना हा मोठा पक्ष व्हायला हवा होता. पण शिवसेनेने आपला राजकीय शत्रू निवडताना चूक केली. बाळासाहेबांना सर्वच प्रखर हिंदूत्ववादी म्हणून ओळखतात आणि पंतप्रधान होण्यासाठी मोदींची प्रतिमा सुद्धा प्रखर हिंदूत्ववादी म्हणूनच होती. म्हणून हिंदूत्ववादी मतदात्याला मतदान करताना निवड करणे कठीण गेले. त्यात मोदींनी स्वतःची प्रतिमा विकासवादी अशी केल्यामुळे नवोदित मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असणार. आता शहरी भागात विशेषतः मुंबईमध्ये भाजप सरकारचे काम समाधानकारक आहे. मेट्रोचे जाळे मुंबईभर पसरल्यामुळे मुंबईकर मेट्रो सुरु होण्याची प्रतिक्षा करीत आहेत व या कामासाठी ते आनंदी आहेत.

विधानसभेची निवडणूक मोदींच्या नावावर लढवली असली तरी आता भाजपला महाराष्ट्रात फडविसांच्या रुपात चांगला नेता लाभला आहे. यानंतरच्या सर्व निवडणूका फडविसांच्या बळावर भाजपने लढल्या व त्यांना बर्‍यापैकी यश मिळालेले आहे. त्यामुळे २०१९ ला महाराष्ट्रात भाजपचे बळ वाढणार आहे. सर्व पक्ष यंदा पूर्ण ताकतीने भाजपच्या विरोधात उतरत आहे. त्यात ठाकरे बंधू सुद्धा आघाडीवर आहेत. मनसेने कम-बॅक केले तर त्याचा फटका पुन्हा शिवसेनेलाच बसणार आहे. कारण ठाकरे कुटुंबाप्रति निष्ठा असणार्‍यांना उद्धवजीं व्यतिरिक्त राज हा पर्याय आहे. मराठीवादी मतदार सुद्धा मनसेकडे वळू शकतो. त्यामुळे जर युती झाली नाही तर भाजपपेक्षा जास्त नुकसान शिवसेनेचे होनार आहे. पण तरीही भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असं वाटत नाही. त्यांना कुणाच्या तरी साथीची गरज भासू लागते. कर्नाटकसारखी परिस्थिती इथे निर्माण होणार नाही. इथे भाजपला सत्ता स्थापन करण्याचा कौल मिळेल. पण जर शिवसेनेने हात वर उचलले तर सत्ता स्थापन करण्यासाठी महा-आघाडी हा दुसरा पर्याय असेल. म्हणजेच कॉंग्रेस+राष्ट्रवादी+शिवसेना+इतर.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
writerjayeshmestry@gmail.com


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाचा तिसरा वर्धापनदिन १७ जूनला !

Next Article

नियतीसमोर सगळे समान

You may also like