शिवछत्रपती, रमझान, शास्ताखान आणि शस्त्रसंधी

Author: Share:

पाकिस्तानला ‘इट का जवाब पँथरने देण्याची’ भाषा करणाऱ्या, मोदी शासनाने मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘विनंती’ला ‘मान’ देऊन रमझान महिन्यात आतंकवाद्यांविरोधात कारवाई न करण्याची मागणी मान्य केल्याने आणि एकूणच शस्त्रसंधी स्वीकारल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. भारतावर आक्रमण करणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई करण्यामध्ये अशा ‘कंडिशन्स’ कशासाठी टाकल्या जात आहेत? त्यासुद्धा अशा पक्षाकडून ज्याने सत्तेत येण्याआधी काँग्रेसच्या पाकिस्तान धोरणावर टीका करून कठोर कारवाई करण्याची आक्रमक भाषा केली होती…!

सध्या मुसलमानांसाठीच्या विविध योजनांच्या जाहिराती दिसू लागल्याने, भाजप विशिष्ट गटाला गरजेपेक्षा अधिक गोंजारत असल्याची नाराजी बोलली जात आहे, ह्या मतांच्या राजकारणाशी काही घेणे देणे नाही आपले! पण! आपल्या पीडीपी मित्राच्या ह्या अवास्तव मागणीला गोंजारण्याची आवश्यकता खचितच नाही. कारण ही मागणी चक्क भारतावर आक्रमण करणाऱ्या आणि कट्टर भारतविरोध अंगात भिनलेल्या आतंकवाद्यांबाबतीतआहे. आणि स्वतःस राष्ट्रवादी विचारसरणीतून आल्याचे सांगणाऱ्या भाजपने आणि नरेंद्र मोदींनी ही मागणी मान्य करावी ह्यामुळे भाजपविरोधी चिडले आहेतच पण भाजपसमर्थकांमध्येही नाराजी आहे.

ह्या अनुषंगाने शिवछत्रपतींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मराठी माणूस म्हणून शिवछत्रपतींच्या चरित्राकडे एक आदर्श म्हणून आपण नेहमीच पाहतो. शिवछत्रपतींनी चैत्र शुद्ध अष्टमी शके १५८५ अर्थात ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर पुण्याच्या लाल महालावर केलेला हल्ला त्यासमयी प्रकर्षाने आठवतो. केवळ ह्या साठी नाही की त्यावेळेसही रमझान चा महिना चालू होता, पण रमझानचा महिना असल्यानेच महाराजांनी मुद्दाम हा दिवस ठरवला होता हे दिसते. (राजा शिवछत्रपती: बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजी अँड हिस टाइम्स: जदुनाथ सरकार). तो रमझानचा ६वा चंद्र होता. रमझानमध्ये दिवसा उपास केल्याने रात्री भरपेट जेवले जाते. त्यामुळे सैनिक जेवून ढाराढूर झोपले असतानाच हा हल्ला झाला आहे. शत्रूला गाफील समयी पकडण्यासाठीच महाराजांनी रमझानची रात्र निवडली असावी हे उघड आहे. ह्या वेळी महाराजांनी आणि ४०० मराठ्यांनी यथेच्छ कापकापी केली. शाईस्तेखानाचा मुलगा (जो आदल्या दिवशीच येऊन दाखल जाहला होता) मारला गेला, आणि शाहिस्तेखानाची तीन बोटे गेली. ह्या वेळेस, खानाचे आचारी लवकर उठले असल्याने त्यांना मराठे आल्याचे कळले आणि त्यांनी आवाज करू नये म्हणून त्यांनाही मारावे लागले, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. जदुनाथ सरकार ह्या हल्ल्याविषयी एक फार छान वाक्य वापरतात, ‘To surprise the Khan, here was a task that required no less agility and cunning than bravery and dash” (खानाला आश्चर्यात टाकण्यासाठी, शौर्यासोबत धूर्त वागण्याचीही आवश्यकता होती).

महाराजांची मुत्सद्देगिरी आणि राजकारण नावाजलेले आहे. महाराजांनी हे केले शत्रूविरुद्ध. मग तो देशी असो वा परकीय. महाराजांनी शत्रुंच्याही धर्म आणि धर्मभावनांचा आदर ठेवला, पण ते धर्मगुरू आणि धर्मग्रंथांच्या बाबतीत आणि शत्रूच्या स्त्रियांच्या बाबतीत. ह्याचे कौतुक औरंगझेबाचा इतिहासकार खाफीखानाही करतो. मात्र रमझानचा महिना आहे म्हणून शायिस्तेखानावर आक्रमण पुढे ढकलुया (शास्ताखान १६६० पासून पुण्यात होता त्यामुळे महाराजांनी असा धर्मविचार केला असता तर एक महिन्याने फारसा फरक पडला नसता.) असा बुळचट विचार राजांनी केला नाही. अगदी ह्या कालावधीत कुठलेही वर्ष काढून पहा, तुम्हाला आक्रमणे दिसतील, शत्रू सैन्याची कापाकाप दिसेल, बाबा रे ती दिवसाची भुकेली आहेत, त्यांच्यावरआक्रमण  नको, असा विचार त्यांनी केला असता तर राहिलेच असते सगळे! वेगळ्या मशिदी महाराजांनी तोडल्या नाहीत पण मंदिरे तोडून मशिदी बनवल्याचे समोर आल्यावर ती मशीद तोडून मंदिर बांधल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ‘कर्तव्य हा धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या हिंदू धर्माचे सच्चे पाईक असलेल्या महाराजांनी नको ती ‘धर्मनिरपेक्षता’ आपल्या कर्तव्याआड आणली नाही.

शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेणाऱ्यांनी ही मुत्सद्देगिरी आणि कर्तव्यातील राजकारणातीत प्रामाणिकपणा मात्र उचलला नाही ह्याचा खेद आहे. इथे भाजप कर्नाटक मध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप काहीही राजकारण करू शकते हे देशाने अनुभवले, काँग्रेसला ते पक्षाचा राजकीय शत्रू मानत असतील म्हणून त्यांना येन तेन प्रकरणेन परास्त करणे त्यांना उचित वाटत असेल तर वाटो बापडे!

पण तो न्याय देशाच्या शत्रूबाबतीत ते का करत नाहीत हा संतप्त सवाल आहे.

Previous Article

अतिशय बळकट पण दुर्लक्षित असा ”किल्ले यशवंतगड”

Next Article

न्यायदानात राजकारण नको

You may also like