शिरवळ लेणी

Author: Share:

आपल्या महाराष्ट्राला प्राचीनतेचा वारसा लाभलेला आहे. यामध्ये आश्चर्यचकित करणारी मंदिरे, त्यावर घडविलेली शिल्पे, कातळात घडविलेल्या लेण्या…यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये हरवून जातो आपण. यातला ‘लेणी’ हा प्रकार तसा अलीकडच्या काळातच अभ्यासावा असं अभ्यासकांना देखील जाणवू लागलं. मध्यंतरीच्या काळात काही मोजकेच भारतीय अभ्यासक आणि जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांसारखे परदेशी अभ्यासक यांनी यामध्ये मोलाचे काम केलेले आहे. अशा लेण्यांना आजही दुर्गांची भटकंती करणारे एका मुक्कामाची सोय म्हणून करताना दिसतात; तर ज्या किल्ल्यांवर लेण्या आहेत त्यांचा वापर तर हमखास मुक्कामासाठी होतो. एकूणच सांगायचा मुद्दा हा की पूर्वीपासूनच या लेण्या काही प्रमाणात वापरात आलेल्या आहेत; आजही त्यामध्ये खंड पडलेला नाही. पण त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य म्हणून पूर्वी कधीच पाहिलं गेलं नाही.

वास्तविक या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ, भाजे, बेडसे, कार्ले, घारापुरी, पन्हाळेकाजी या लेणी आता जगात प्रसिद्धी मिळवू लागल्या आहेत. त्यांची रचना, त्यांतील शिल्पे ही वाखाणण्याजोगी आहेत हे प्रत्यक्ष तिथे भेट देऊन आलेल्या व्यक्ती सांगतातच. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी असलेल्या लेणी हमखास जाऊन पहाव्यात अशा आहेत. त्यापैकी एक लेणीसमूह आहे तो शिरवळ जवळ, त्याच्या बाजूच्या डोंगरांमध्ये.

या लेण्या आधी सांगितल्याप्रमाणे शिरवळ गावाजवळ आहेत आणि त्यांना शिरवळ लेणी नावानेच ओळखले जाते त्यामुळे ओघानेच या गावाची तोंडओळख करून घेणे आवश्यक आहे. काही जुन्या कागदपत्रांमध्ये या गावाचे नाव श्री चे आलय असल्याचे आढळतं. तर बाराव्या शतकात एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात सापडलेल्या अष्टभुजा अंबाबाईच्या मूर्तीमुळे या गावाचा उल्लेख “श्री-आलय” किंवा “श्री-पल्ली” असा केला जात होता. आजचे शिरवळ हे नाव याच शब्दांचा अपभ्रंश आहे असे वाटते. शिवाय या गावाला शिवकाळात देखील महत्त्व लाभले होते. १६४७-४८ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली लढाई विजापूरकरांविरुद्ध लढली ती शिरवळच्या सुभानमंगळ गढीवरच. आज तिथे गढी होती हे सांगून सुद्धा पटणार नाही इतकी वाईट अवस्था झाली आहे त्या गढीची. खरंतर शिरवळ गावाचा इतिहास पहिल्या ते दुसऱ्या शतकापर्यंत मागे नेऊन ठेवता येईल इतका आहे. हे या लेणीवरून ठामपणे सांगता येऊ शकते हे निश्चित.

शिरवळ सोडल्यानंतर २ ते ३ किलोमीटर गेल्यावर एक रस्ता लॉकीम कंपनीकडे जातो. या कंपनीच्या शेजारून कच्च्या रस्त्याने गेल्यावर उजवीकडच्या डोंगरांमध्ये काही लेण्यांचा समूह दिसू लागतो. कच्च्या रस्त्याने जाताना दुचाकी अथवा जीप सारखे वाहन वापरल्यास उत्तम. या रस्त्याने २ ते ३ किलोमीटर गेल्यावर उजव्या हाताच्या डोंगरामध्ये काही लेण्यांचा समूह दिसतो. साधारण २० मिनिटांची चढण चढल्यावर आपण लेण्यांपर्यंत पोहोचतो. इथे एक चैत्य तर बाकी विहार आहेत. या लेण्या इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात घडवल्या गेल्या असाव्यात. या बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी बनवल्या गेल्या होत्या. नंतर काही काळाने त्या इतर धर्माच्या अनुयायांनी वापरल्या असाव्यात. या लेण्यांमध्ये असणारा स्तूप या लेण्या हीनयान पंथाच्या लेण्या असल्याचे दर्शक आहे.

समूहातील डाव्या बाजूच्या पहिल्या लेणीमध्ये ओटा आहे. दुसऱ्या लेणीमध्ये स्तूप आहे ज्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी मागच्या बाजूने मोकळी जागा ठेवलेली आहे. या स्तूपाच्या भागांना शास्त्रीय परिभाषेत काही निश्चित नावे आहेत. स्तूपाच्या छताला जोडल्या गेलेल्या भागास ‘छत्र’ तर त्याच्या खालच्या चोकोनी भागास ‘हर्मिका’ असे म्हंटले जाते. त्याच्या खालच्या गोलाकार भागास ‘अण्ड’ हे नाव आहे आणि हे अण्ड ज्या भागावर असते त्याला ‘वेदिका’ हे नाव आहे. स्तुपासमोरच कुणीतरी अलीकडच्या काळात नव्याने ओटा बांधून त्यावर शिवलिंग स्थापन केलेले आहे त्याशिवाय या शिवलिंगासमोर नंदीऐवजी कासव दिसते. या पुढची तिसरी लेणी येथील सगळयात मोठा विहार आहे. विहारात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस भग्न ओसरी आहे. इथे एकूण ८ शयनदालने आणि त्यांमधून ४ गवाक्ष आहेत. या विहारानंतरचं चौथं लेण्याचा बराचसा भाग भग्न झालेला आहे. या लेण्याच्या सुरुवातीस एक अर्धमंडप आहे ज्यात डाव्या बाजूला एक ओटा आहे. मंडपाच्या आतल्या बाजूला एक शयनदालन आणि त्यात एक ओटा आहे. या लेण्याच्या शेजारी एक कुंड आहे. ज्या ठिकाणी वस्ती करायची त्या ठिकाणी पाण्याची सोय ही आजही पाहिली जाते, या प्राचीन लेण्या देखील त्याला अपवाद नाहीत. या कुंडाच्या दर्शनी भागात जरी भिंत दिसत असली तरी दोन भागात असलेले हे कुंड एकसंध आहे. परंतु, येणाऱ्या पर्यटकांमधील स्वच्छतेच्या जाणिवेच्या अभावामुळे या कुंडामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या यांचा ढीग साठू लागला आहे.

याच्यापुढचं पाचवं आणि सहावं लेणं अर्धवट आहे. पाचवं लेणं येणारे पर्यटक व अभ्यासक यांच्या स्वयंपाकामुळे वरच्या बाजूने काळं पडलेलं आहे. सातवं लेणं देखील अर्धवटच आहे परंतु हे लेणं हिंदू लेणं असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे. याला हिंदू लेणं म्हणण्याचं कारण म्हणजे या लेणीमधील मागच्या भिंतीलगतच्या चौथऱ्याची उंची ही हिंदू देव-देवता स्थापन करायच्या पीठाच्या उंचीइतकी उंची आहे. याच्या मागच्या बाजूस आणखी एक ओटा असावा असे वाटते. यावर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. आठव्या लेणीमध्ये काही मूर्ती आणून ठेवलेल्या दिसतात. आजमितीला त्या जीर्ण झाल्यामुळे त्यांना ओळखणे शक्य नाही शिवाय आपल्याकडे अनघड तांदळ्याची सुद्धा पूजा करत असल्याने इथे शेंदूर लावलेली शिल्पे कोणती आहेत हे देखील सांगणे अवघड आहे. इथल्या लेणीशेजारी पावसाळ्यात पडणारा एक धबधबा आहे तो ओलांडूनच नवव्या लेण्याकडे वाट जाते. नवव्या क्रमांकाच्या लेणीला एक अर्धमंडप आणि उजव्या बाजूला ओटा आहे. लेणीच्या आत मध्ये देखील एक ओटा पाहायला मिळतो याव्यतिरिक्त इथे पाहण्यासारखे काही नाही. फक्त याचे गवाक्ष मोठे असून काहीसे कोरीव आहे. हेच याचे विशेष पण म्हणता येईल. अशा प्रकारचा मोठा व कोरीव गवाक्ष इथल्या इतर कोणत्याही लेणीमध्ये आढळत नाही. याच्या पुढचं दहावं लेणं हा या समूहामधील दुसरा सगळ्यात मोठा विहार आहे. इथे वटवाघूळांचा वावर असतो त्यामुळे आत जाताना काळजी घ्यावी लागते. या लेणीत प्रवेश केल्यानंतर उजव्या दर्शनी वरील बाजूस दोन खाचा आणि त्याशेजारीच एका खांबाचे अवशेष दिसतात. या दाराची लाकडी चौकट बसवण्याच्या खाचा आहेत ज्यामध्ये लाकडी दारं बसवली गेली असावीत. अशाच प्रकारच्या खाचा खालच्या बाजूला पण असणे अपेक्षित आहे पण त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यामुळे दिसू शकत नाहीत. विहार आतून मोकळा आहे पण भिंतीलगत काही शयनदालनांच्या खुणा आहेत. इथल्या बाजूस आणखी २ लेण्या आहेत पण त्या अर्धवट आणि कालप्रवाहामध्ये त्या आता जमिनीखाली गेल्या आहेत.

या समूहामधील १३ ते १७ क्रमांकाच्या लेण्या या समोरच्या डोंगरात दिसतात. इथे एक मुद्दा नमूद करायला हवा की या लेण्या डोंगराच्या साधारण अर्धवर्तुळाकार भागावर घडविलेल्या आहेत. त्यामुळे समोरचा डोंगर म्हणजे समोरच्या भागावर घडवल्या आहेत. या उत्तराभिमुख लेण्या इतर काही लेण्यांप्रमाणेच अर्धवट खोदलेल्या आहेत. शिरवळ लेण्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील १८ क्रमांकाची लेणी. ही या समूहामधील तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी लेणी आहे. पहिल्या लेण्याच्या बाजूने या लेण्यांपर्यंत जाता येते. बाहेरून पाहताना या लेणीची भव्यता लक्षात येत नाही, ती आत गेल्यावरच कळते. या लेणीच्या सुरुवातीस एक अर्धमंडप आणि त्यात उजव्या बाजूस ओटा आहे. मुख्य लेणी आतून पूर्णपणे भग्न झालेली आहे; त्याच्या शिल्लक राहिलेल्या भागावरून त्यामध्ये काही शयनदालने असावीत असे वाटते. तरी काळाच्याओघात त्याच्या भीती नाहीशा झालेल्या आहेत. इथे कायम थंडगार पाणी असते पण त्यात गंधकाचा अंश जास्त असल्याने ते पिण्यायोग्य नाही. या लेणीच्या डाव्या भिंतीच्या पाण्यामुळे पाघळलेल्या भागावर काही उभे आडवे पट्टे तर भिंतीतून काही पुढे आलेली टोकं दिसतात; याला लवणस्तंभ म्हणतात. असेच लवणस्तंभ छताच्या बाजूने देखील खाली आलेले आहेत. त्यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात. या विषयाचे अभ्यासक याच्या उंची वरून त्या ठिकाणचा काळ सांगू शकतात. त्यामुळे यांना देखील महत्त्व आहे.

या परिसरातून सतत गजबजलेला राष्ट्रीय महामार्ग दिसतो तसेच समोर पुरंदर किल्ला सुद्धा दिसतो. अगदी महामार्गावरून सुद्धा या लेण्या स्पष्टपणे पाहता येतात. सातारा-शिरवळ हे अंतर साधारणपणे ६१ किमी आहे तर पुणे-शिरवळ हे अंतर ५१ किमी आहे. परंतु, या लेण्यांना भेट देणाऱ्या मंडळींमध्ये अभ्यासक आणि पर्यटक कमी दिसतात तर दारू पिऊन इथे धिंगाणा करणारे लोकच इथे असल्याचे अधिक जाणवते. लेण्यांपाशी आल्यावर दारूच्या बाटल्या किंवा कुणी आपली नावं लिहून घाण केलेल्या भिंती दिसल्या की मन विषण्ण होतं. शिरवळ हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे. पण त्यामुळे इथले डोंगर नष्ट होऊ लागलेत. आपल्या पोटात इतिहासाचा इतका महत्त्वाचा पुरावा बाळगणारा डोंगर यात नष्ट झाल्यावर आपल्याला पश्चात्ताप करायची वेळ येऊ नये इतकीच अपेक्षा.

                                                                                                                                                         -दीप्ती कुलकर्णी, नागठाणे.

Previous Article

सेन्सेक्स ५१० अंकांनी घसरला.

Next Article

गणेश दामोदर सावरकर तथा बाबाराव सावरकर

You may also like