शिक्षक तुम्ही…

Author: Share:

काल शिक्षक दिन जाहला.. भारतीय संस्कृतीत शिक्षकाची आठवण होण्याचे दोन खास दिन … गुरु पौर्णिमा आणि शिक्षक दिन! यामध्ये अपवाद असतील खास! पण, सद्यस्थतीत, शिक्षक या जमातीची जी दुरावस्था राजकारणी आणि यंत्रणेने करून ठेवली आहे, ते पाहून, खरेच शिक्षक या घटकाचे स्थान समाजाच्या विकासात किती महत्वाचे आहे हे आपणास कळले आहे का हा प्रश्न येतो. आणि ज्या समाजाला प्रबोधनातील शिक्षकांचे महत्व पटले नसावे त्यांनी, समाजविकासाच्या गावगप्पा तरी का माराव्यात?

शिक्षकदिनानिमित्ताने, हे संपादकीय जाणार होते. मात्र, काल शिक्षकाच्या प्रेमाने सोशल मीडिया उतू गेला होता. आज आपण जरा ग्राउंड रिऍलिटी वर बोलूया!

सध्या आपण फक्त लौकिकार्थाने शालेय शिक्षकाचा पेशा असणार्यांविषयी बोलूया, गुरु विषयी नाही. पुलंच्या चितळे मास्तरांपासून, साने गुरुजींपर्यंत, आचार्य अत्रे, नासी फडके या थोर साहित्यिकानी शिक्षक म्हणून घडवलेल्या विद्यार्थ्यांपासून ते आपल्यापर्यंत, सर्वच शिक्षकांनी भरीव कामगिरी केली आहे. ‘भरीव’ शब्दाची व्याप्ती बदलू शकेल. कारण विद्यार्थ्यांची घेण्याची क्षमतासुद्धा त्यात समाविष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थी म्हणून समाज घेण्यासाठी कमी पडला असल्यास त्याचा दोष शिक्षकामाथी मारला जाऊ नये.

शिक्षक पिढी घडवतो असे आपण म्हणतो. हे वाक्य फार फार मोठे आहे. पिढी म्हणजे समाजातील उद्या असतो. समाजाचा भविष्यकाळ घडवणे, हे कार्य सोप्पे नाही. यासाठी फार तपश्चर्या करावी लागते. किंबहुना, गाठीशी पुण्य असल्याशिवाय, शिक्षक म्हणून काम करण्याचे पुण्य लाभत नाही. आणि “पुण्य” म्हणून कर्तव्य बजावल्याशिवाय समाज घडवण्याचे पुण्यही लाभत नाही. दुर्दैवाने, शिक्षकी पेशाच्या या व्यापक कर्तव्याकडे आम्ही दुर्लक्षच केले आहे. आजची शिक्षकांची स्थिती पाहता, ‘हे पिढी घडवता आहेत’, असे म्हणणे फार कमी शिक्षकांच्या वाट्याला येऊ शकेल. पण, असे पुण्यवंत आत्मे आम्ही पहिले आहेत, जे इमानेइतबारे, शिक्षक म्हणून आपली जबाबदारी ओळखून पोटतिडकीने काम करीत आहेत. ‘पोटतिडकीने’ काम करणे म्हणजे काय, हे शिक्षकी पेशात गेल्याशिवाय कळणारे नाही.

शालेय शिक्षकासमोर बालवर्गापासून ते दहावीपर्यंत म्हणजे तिसऱ्या वर्षांपासून ते पंधराव्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थी येतात. हे विद्यार्थी सहा पासून बारा तास शिक्षकांसोबत राहतात. हेच विद्यार्थी उद्याचे मतदार आहेत, पालक आहेत, नागरिक आहेत, कर्म करणारे आहेत. असे किमान ४०० ते १००० विद्यार्थी दरवर्षी शालेय शिक्षकाच्या समोरून जातात. या सर्व शिक्षकांचे कार्य देवाइतकेच महत्वाचे आहे. कारण इथे ‘घडवण्याची’च क्रिया आहे. आपण समाजाची पिढी घडवतो आहोत, ही भावना घेऊन शिक्षकांनी आपले काम करणे आवश्यक आहे.

पहिला मुद्दा, आपण त्यानं तसे काम करू देतो का? प्रबोधकच्या कामातून आमचा शिक्षकांशी संबंध येतो. एखादा उपक्रम करायचे म्हटले की आधी ते त्यांचे वेळापत्रक तपासतात. बरे, वेळापत्रक म्हणजे त्यांच्या सृजनशील उपक्रमांचे वेळापत्रक नाही. शिक्षण विभागाने जे तासिकांचे, आणि सक्तीच्या कामांचे जोखड त्यांच्या मानेवर ठेवले आहे, त्याचे! विद्यार्थ्यांची ही माहिती भरा, ती माहिती भरा.., त्यातून हे पूर्ण करा ते पूर्ण करा… नाही केलेत तर तुमच्यावर ही कारवाई करू आणि ती कारवाई करू. नवीन शासनाच्या कालावधीत हे प्रकार वाढलेले दिसतात. प्रक्रियांचे जंजाळ म्हणजे सर्वांगीण प्रगती असे शासनास वाटत असेल तर त्यांना फार मोठ्या मानसशास्त्रीय ट्रीटमेंट ची नितांत आवश्यकता आहे.

आपल्या शालेय शिक्षणाची प्रथा सुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी धोकादायक असावी असेच वाटते. म्हणजे एवढ्या तासिका आणि तेवढ्या तासिका पूर्ण झाल्या म्हणजे शिक्षकी कार्य संपले असे वाटावे अशी रचना आहे. म्हणजे मी शासनाने दिलेले हे काम केले म्हणजे माझे काम झाले असे नसावे ना! रादर काम झाले, ही भावनाच शिक्षकांच्या मनात येणे शिक्षकी पेशाच्या संकल्पनेच्या विरुद्ध आहे. भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात, मी माझे कर्म एक क्षण जरी थांबवले तरी सृष्टी संपेल. शिक्षकाचे कार्य असेच! म्हणून आम्हाला वाटते, शासनाने, शिक्षकांवर थोपवलेल्या सर्व अशैक्षणिक गोष्टी काढून घ्याव्यात! त्यासाठी क्लार्कची सोय करू शकतात. शिक्षकी विचारांचाच माणूस हवा असे गटात असेल तर कित्येक डीएड गावागावांमध्ये नोकरीशिवाय आहेत. त्यांना शासन अशा कामासाठी वापरू शकेल. शिक्षकांवर फक्त शिकवण्याची आणि मुले घडवण्याची जबाबदारी असावी. तेही कसे करावे हे त्यांना ठरवू द्यावे. त्यांना म्हणजे, शिक्षकाना आपापसात!

वाईट हे आहे, की शिक्षणाचा गंध नसलेले शिक्षण विकासाच्या प्रशासकीय कामांचे प्रमुख असतात. कदाचित, त्यामुळेच पुढील फळ नासके निघते. जे जे काही करण्यासारखे आहे, त्यावर शासनाने फक्त आपले मत द्यावे. शिक्षकांमधूनच प्रशासकीय नेतृत्व येऊ द्यावे. शिक्षकांना पाठवा फॉरेनला. काय चांगले चांगले शिकवले जाते आहे, त्यांना पाहू द्या! आणि त्यातील जेजे काही इथे केले जाऊ शकते ते त्यांना करू द्या!

त्यासाठी पैसा ओता. ही उद्याची इन्व्हेस्टमेंट आहे. दहा बारा वर्ष आपले सरकार कसे टिकून राहील यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’ खेळण्यासाठी जी एनर्जी आणि पैसा खर्च केला जातो, तो पुढील पिढी घडवण्यासाठी ‘मास्तर’स्ट्रोक खेळण्यात वापरला, तर येणारी पिढी नाव काढेल. इतिहासात जाऊन बसायचे आहे, तर असे बसा!

शिक्षकांनी सुद्धा नाहीरे पासून आहे रे होणे आवश्यक आहे. पण, प्रामाणिक तळमळ आम्ही सुद्धा पहिली आहे. कुजके आंबे कुठे नसतात? सगळ्याच ठिकाणी! पण सुदैवाने, शिक्षकी पेशा अजून व्यवसाय झालेला नाही, किमान सर्वच ठिकाणी तरी!

शिक्षणसेवक ही संकल्पना आता दूर करावी. शिक्षकांचा पगार वेतन आयोगाच्या कक्षेत येतोच! तो अजून वाढवा. ड्रायवर पेक्षा पायलटचा पगार अधिक असतोच ना! शिक्षक होणे हे सुद्धा तितकेच प्रोफेशनल आहे, आणि हजार प्रवासी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडण्याइतकेच हजार मुले मानसिक विकासाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेऊन ठेवणे जबाबदारीचे आहे.

आज आवश्यकता आहे, शिक्षक या घटकाच्या विकासाची!

शिक्षक हा समाजाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीतील अतिशय महत्वाचा भागीदार आहे. दुर्दैवाने, आपली राजकीय आणि प्रशासनिक यंत्रणा हे समजण्यात अक्षम्य कमी पडली आहे. आणि हा केवळ एका सरकारचा गुन्हा नाही…सार्वत्रिक, सर्वकाळ सरकारांचा आणि आपण सर्व नागरिकांचा हा सामूहिक गुन्हा आहे.. आणि जोपर्यंत सर्व शिक्षकांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलत नाही, समाज बदलण्याची आपली धडपड, व्यर्थ आहे..

दुर्दैवाने, शासनाचे मागील दशकाचे किमान धोरण शिक्षक पेशा मारण्याचे आहे. हे बदलले पाहिजे तातडीने! शिक्षक म्हणून रोजगार नाही जिवंत ठेवायचाय. शिक्षक होण्यातील रस तसाच टिकून राहिला पाहिजे. केवळ प्रवेश परीक्षांनी शिक्षक ठरवणे अशक्य आहे. शिक्षक म्हणून तुमची यूटीलिटी शाळांना ठरव द्या. यातूनच उत्तम शालेय पर्यावरण घडेल.

येथे, मराठी माध्यमाच्या शासनाच्या अख्त्यारीतील शाळा गृहीत धरल्या आहेत. खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांचे प्रश्न हा वेगळा मुद्दा आहे. फक्त तिथेही जाण्यासाठी उत्तम शिक्षक निर्माण करणे, आणि खासगी शिक्षण हा प्रकार शिक्षणाला पैसे कमावण्याचे माध्यम न बनवणाऱ्या घटकांकडेच देणे, हि महत्वाची  जबाबदारी शासनानेच पार पाडायची आहे.

खूप लिहूनही खूप काही मुद्दे राहून जातायंत.

तुम्ही आणि मी काय करावे? एक गोष्ट आपण आवर्जून करू, शिक्षक म्हणून शिक्षकांचा आपण आदर ठेऊ. जे शिक्षक आपली जबादारी पार पाडतायत ते सुखावतील आणि जे इतर व्यवसायासारखे आपले काम ‘उरकतायत’, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल.

शिक्षक.. तुम्ही आहात..म्हणून संपादकीय लिहिण्याइतकी जाणीव आमच्या ठायी निर्माण झाली! 

तुम्हाला ‘एक साथ नमस्ते!’

Previous Article

७ सप्टेंबर

Next Article

लोकमान्य टिळक, छत्रपति आणि वेदोक्त प्रकरण; भाग १

You may also like