विक्रम संवत २०७४ काय घेऊन येईल?

Author: Share:

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! उद्या पाडवा! विक्रम संवत २०७३ संपून उद्या २०७४ सुरु होईल..नवीन व्यापारी वर्ष! मागील झालेल्या नफ्या-तोट्याची (तोटा नकोच).. गणिते मांडून, चुका सर्वरून, नवीन जोडलेले व्यापारी बंध सोबत घेऊन पुढील वर्षासाठी एकमेकांना शुभेच्छा देऊन, पुढे जाण्याचा दिवस! आणि ह्यासाठी संपत्तीची देवता लक्ष्मीचे पूजन करून, तिची कृपा सतत रहावी आणि बरकत राहावी यासाठी प्रार्थना करण्यासाठी आजचे लक्ष्मीपूजन! नवीन चोपडीचे आणि जुन्या चोपडीचे आणि संपत्तीचे पूजन करण्याचा हा दिवस!

नवीन संवत सुरु होते तेंव्हा अजून एका लक्ष्मीगृहाबद्दल चर्चा रंगते, ते म्हणजे शेअरबाजार. शेअर बाजाराचा मार्गही, संवत ते संवत मोजण्याची प्रथा आहे. पाहूया, २०७३ ने काय दिले आणि २०७४ काय घेऊन येऊ शकतो.

सर्वप्रथम, हे सांगून तुमच्या तोंडी मिठाई भरवतो, कि २०७३ संवत वाढीवर बंद झाले. त्यामुळे २०७४ सुद्धा चांगल्या वाढीनेच बंद होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. हि वाढ १०-१२% राहू शकेल. याचा अर्थ, सर्वसामान्य स्टॉक्स २०% पर्यंत वाढ देऊ शकतात.

मागील वर्षी निफ्टी ८६२५ वर बंद झाला होता. वर्षभरात तब्बल १५०० अंकांनी निफ्टीने वाढ दर्शवली आहे. सेन्सेक्स सुद्धा ३२५८४ या पातळीवर बंद झाला आहे. सेन्सेक्स ने मागील वर्षी १६.%, मागील दोन वर्षात १९.१ % आणि तीन वर्षात २३% रिटर्न्स दिलेले आहेत. मागील सहा महिन्यात ११% आणि महिला १९ ऑकटोबरचा विचार करता तब्बल २४.७६% टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. त्यामुळे, पुढील वर्षभरात शेअर बाजाराचा बैल उधळलेलाच राहणार यात शंका नाही. आता या तेजीत तुम्ही सहभागी होणार कि नाही? तुम्ही कुठल्या शेअर्स मध्ये गुंतून राहता, यावर हे अवलंबुन आहे.

हा लेख, ह्या गृहितकावर लिहिला, आहे कि मराठी माणूस साधारणतः शेअर बाजारामध्ये गुंतवण्यास कचरतो. शेअर बाजार सट्टा आहे इथपासून ते आपले काम नव्हे इथपर्यंत, शेअर बाजाराविषयी प्रचंड गोंधळ स्वतःच्या मनात आपण भरून घेतला आहे. त्यामुळे जे पाण्याबाहेर राहून पाणी निरखने पसंत करतात किंवा कडेकडेने पोहतात आणि ज्यांना शेअर बाजारामध्ये उतरायचे आहे.. त्यांच्यासाठी हा मुख्यतः लेख आहे.

सर्वप्रथम, डे ट्रेडिंग विषयी असणारी आस्था दूर करावी. डे ट्रेडिंग चुकीचे आहे असे अजिबात नाही, खूप लोक ते करतात आणि काही पूर्णवेळ शेअर मार्केटच करतात. मात्र नवीन येणाऱ्यांनी त्या भानगडीत पडू नये किंवा जपून काम करावे. आणि डे ट्रेडिंग हा या लेखाचा उद्देश नाही. लघु(१५-३० दिवस)-मध्यम (दोन -सहा महिने) आणि दीर्घ (एका वर्षांपासून पुढे) आपण या गुंतवणुकीचे विभाजन करू शकतो. माणसा-माणसा गणिक हा कालावधी वाढेलही. पण, सांगायचा मुद्दा असा कि शेअर बाजारात मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीची सुरुवात करा.

कुठले शेअर्स पुढील वर्षी अधिक नफा देऊ शकतील? याचे सोप्पे उत्तर आहे, ज्या समभागांनी मागील एका वर्षात वाढीची सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही पाहाल तर मोठी नवे अनेक आहेत. आणि त्यांच्यात गुंतवणूक करणे अधिक श्रेयस्कर आहे. याला आपण मोठे समभाग किंवा मोठ्या भांडवलाचे समभाग म्हणतो. उदा एलएनटी, रिलायन्स, इन्फोसिस. यामध्ये एलएनटी हा समभाग उत्तम वाढ दाखवतो आहे. या मध्ये एक सोप्पे गृहीतक आहे. सेन्सेक्स म्हणजे काय मोठ्या ३० कंपन्यांचा इंडेक्स. निफ्टी म्हणजे ५० कंपन्यांचा इंडेक्स. त्यामुळे हे इंडेक्स वाढणार असे आपण म्हणत असू तर या इंडेक्स चा हिस्सा असणाऱ्या कंपन्या वाढणारच ना! आता या इंडेक्स मधील कुठल्या कंपन्यांमध्ये वाढ आहे हे आपण पाहू.

बजाज फिनसर्व्ह या कंपनीत वाढ दिसुन येते आहे. मागील वर्षी हा समभाग ३३४० होता तो या वर्षी  ५३७० वर आहे. या कंपनीची वाढ आक्रमकपणे होते आहे. हि एनबीएफसी कंपनी आहे. वाढत्या अर्थव्यवस्थेत फायनान्स कंपन्यांचा सहभाग असतो. त्यामुळे या एनबीएफसी कडे गुंतवणूकदार आकर्षित होणे स्वाभाविक आहे.

याच धर्तीवर एचडीएफसी या दुसऱ्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीलाही वाढ आहे. तिचा समभाग मागील दिवाळीत १२०० वर होता, तो आता १७६४ वर ट्रेडिंग करीत आहे. रिलायन्स कॅपिटल हि तिसरी कंपनी. तिचा समभाग मागील वर्षी ५०० वर होता जो ७०० ची पातळी गाठून ५६० वर आहे. सुंदरम फायनान्स हि चौथी कंपनी. सध्या ती १६६५ वर असून जानेवारी पासून तिने उत्तम पॉझिटिव्ह होल्ड करून ठेवले आहेत.

उत्पादक कंपन्यांमध्ये ऑटो सेक्टर तुमच्या नजरेत असू दे. महिंद्रा कंपनीचा समभाग सध्याच्या १३७४ वर फार चांगला दिसतो आहे. पुढील संवत पर्यंत तो १६०० पर्यंत पोहोचलेला असू शकेल. त्याच्यात उत्तम व्हॉल्युम दिसतो आहे. अपोलो टायर्स सध्याच्या २४० वरून ३०० ची पातळी गाठू शकेल. मारुतीचा समभाग सध्या ७७०० वर असून तो अधिक वाढेल असेच दिसते.

वाढत्या अर्थव्यवस्थेत बँकिंग क्षेत्राकडे लक्ष जाणे स्वाभाविक आहे. यामध्ये एचडीएफसी, एसबीआय हे पब्लिक बँकेचे आणि एक्सीस, आयसीआयसीआय आणि कोटक हे समभाग अधिक लक्षणीय वाटतात. एचडीएफसी मागील वर्षीच्या १२०० वरून सद्य १८७० पर्यंत वाढला आहे. एसीबीआय मध्ये मागील वर्षी वाढ नव्हती. मात्र, बँकेच्या धोरणांमुळे हे अधिक झाले. पुढील पाच वर्षांसाठी सध्याची २४५ हि लेव्हल एंट्री घेण्यासाठी उत्तम आहे. बँक ऑफ बरोडा समभागामध्ये सुद्धा मागील वर्षापेक्षा घट आहे. मात्र नुकतेच या समभागात उत्तम व्हॉल्युम दिसून आला आहे. त्यामुळे, या समभागाकडे लक्ष ठेवायला हरकत नाही. तीच बाब आयसीआयसीआय समभागाची. यात फारशी वाढ दिसली नसली तरी मध्यंतरी हा समभाग २६० वरून ३०० ची पातळी गाठून आला आहे. सध्या तो पुन्हा २६५ च्या रेंज मध्ये उपलब्ध असला तरी त्यात वेळोवेळी व्हॉल्युम दिसतो आहे. मध्यम मुदतीत १३० वर असलेला पंजाब नॅशनल बँकेचा समभाग १७० ची लेव्हल गाठू शकतो.

मार्केट वाढले, की शेअर ब्रोकर्सची सुद्धा भरभराट होते. इंडियाबुल्स व्हेंचर्स या कंपनीने सर्वात जास्त  धक्का मागील वर्षी दिला. अवघ्या १२ रुपयांवरून हा समभाग २९६ वर पोहोचला आहे. या समभागामध्ये काहीही चुकीचे नाही. हा समभाग साधारण त्रैमासिक डिव्हीडंड सुद्धा देतो. त्यामुळे या समभागाकडे सर्वात जास्त लक्ष आकर्षित होते आहे.

मध्यम आणि लघु आकाराच्या समभागांमध्ये मात्र खूप जास्त वाढ दिसून येऊ शकते. बजाज कॉर्प हा समभाग हिटलिस्ट वर असण्यास हरकत नाही. हा स्टॊक सध्या ४३८ मध्ये असून त्याने मागील काही महिन्यात केलेले पॅटर्न्स बुलिश अर्थात पॉझिटिव्ह आहेत. किमान लघु मुदतीत तो इथून ४८० ते ५०० ची किनार गाठू शकेल.

भारत फोर्ज कंपनीच्या समभागालाही अशीच वाढीची संधी दिसत आहे. मागील वर्षी ४५० असेलेला समभाग या वर्षी ६७० पर्यंत पोहचला आहे. साधारण असे समभाग चार आकडी संख्या गाठण्याची अधिक असते. सध्याचा त्याचा पॅटर्न सुद्धा बुलिश आहे.  हॅवेल्स इंडिया, एशियन पेंट्स आणि मोठ्या समभागामध्ये मारुती आणि नेस्ले इंडिया हे समभाग तुमच्या वॉचलिस्ट वर हवेत. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत अशीच वाढ दिसून येत आहे. वर्षारंभी हा समभाग ३५० वर असणारा हा समभाग सध्या ४२० आहे. मात्र त्याने मागील काही महिन्यात उत्तम पॉझिटिव्ह होल्ड करून ठेवले आहेत.

एबीबी इंडिया लिमिटेड मध्ये सुद्धा चांगली वाढ दिसते आहे. वर्षारंभीच्या १००० वरून सध्ड्या तो १३३९ वर असला तरी १५३७ ची पातळी गाठून तो आला आहे.  इंजिनिअर्स इंडिया मध्ये सुद्धा अशीच वाढ दिसून येते आहे. सध्या तो १५० वर असून त्यात चांगला व्हॉल्युम दिसून आला आहे.

पुढील वर्षाच्या गुंतवणुकीसाठी १५-२०% रिटर्न्स देऊ शकतील असे हे काही शेअर्स आहेत. शेअर बाजारात कमी पैशात उपलब्ध असणाऱ्या ज्यांना आपण पेनी स्टोक्स म्हणतो त्यांचा सुळसुळाट आहे. त्यांच्यात न्यूज येते किंवा टीप मिळते. मात्र अशा टिप्स धोकादायक असतात. नवीन आणि जाणत्या दोघांनीही अशा स्टोक्स पासून दूर राहावे.

व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग अर्थात, उत्तम गुणवत्तेमध्ये गुंतवणूक हा गुंतवणुकीचा मूलमंत्र आहे, आणि अशा गुंतवणुकींमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक हाच पैसे वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे. वोरन बफेट पासून राकेश झुनझुनवाला पर्यंत हेच सिद्ध झाले आहे, आणि त्यांनी जे ऐसे कमावले ते या पेनी शेअर्स मध्ये गुंतवणुकीच्या टिप्स देणार्यांनी कमावले नाहीत हे ध्यानी असावे. त्यामुळे हातच्या कंकणाला आरसा नको.वर दिलेले समभाग असेच व्हॅल्यू इन्वेस्टींग असणारे आहेत.

तेंव्हा, नवीन संवत मध्ये शेअर बाजाराच्या बुल वर आरूढ व्हा! मराठी पैसा सुद्धा शेअर बाजारात येऊ दे, वाढू दे.. देशाचे लक्ष असणारा सेन्सेक्स मुंबईत आहे. तेंव्हा महाराष्ट्राने शेअर बाजारात मागे असणे नक्कीच भूषणावह नाही!

सो..इन्व्हेस्ट स्मार्ट! हॅप्पी इन्व्हेस्टिंग! दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा!

 

Previous Article

वानखेडे आणि मुंबई स्पिरिट!

Next Article

थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’चे अॅप

You may also like