कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे

Author: Share:

 जन्म ३ सप्टेंबर, १९२३  |  निधन: २० मार्च, २०१५

शाहीर साबळे हे मराठी लोककलेतील पूजनीय आणि घराघरात पोहोचलेले नाव. शाहिरीसोबत त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सुप्रसिद्ध लोकगीत आणि लोकप्रकारांच्या कामासाठी त्यांचे नाव महाराष्ट्राच्या कलांगणात प्रसिद्ध आहे. ‘लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख रुजवली.

सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला.

त्यांचे वडील माळकरी होते. वारकरी पंथाचे भजन-कीर्तन ते करीत असत. त्यांची आई निरक्षर; पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती. त्यामुळे गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. त्यांचा आवाज लहानपणापासून चांगला होता आणि हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते.

शाहिरांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अंमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. साने गुरुजींच्या सहवासात साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी ’शाहीर साबळे आणि पार्टी’ स्थापन केली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू  लागले. तसेच राजकीय -सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करुन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

पुढे तरुणपणी इ.स. १९४२ ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा, म्हणून साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले होते. त्या वेळी शाहिरांनी आपल्या पथकासह ह्या मंदिरप्रवेशासाठी महाराष्ट्रभर प्रचार करुन अनुकूल वातावरण निर्माण केले. तसेच पसरणीच्या भैरवनाथ मंदिरात साने गुरुजी, सेनापती बापट, कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांचा प्रवेश घडवून आणला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन ह्यांतही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे ह्यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्घ केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत शाहिरांनी गायिले.

लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. या अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणार्या ‘महाराष्ष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.

महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले; तसेच आंधळं दळतंय हे मुक्तनाट्य लिहून रंगभूमीवर आणले. त्यातून शिवसेनेच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली. आरंभापासून शाहीर शिवसेनेसोबत होते; पण ह्या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून काम करावयास आरंभ केल्यावर शाहीर त्या संघटनेपासून दूर झाले.

पत्नी भानुमती हिच्या सहकार्याने साबळे यांनी अनेक जाहीर कार्यक्रम केले. समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून अनेक मुक्तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले. पुढे तब्बल १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला.

वृद्घ व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली (१९८९). ह्या प्रतिष्ठानासाठी त्यांनी पसरणीजवळची वडिलार्जित ८ एकर जमीन दिली. ह्यातूनच पुढे वृद्घ, निराधार कलावंतांसाठी ‘तपस्याश्रमा’ची कल्पना फलद्रूप झाली.

शाहिरांचे कुटुंब हे कलावंतांचे कुटुंब आहे. उदा., देवदत्त (प्रसिद्घ गीतकार-संगीतकार),चारुशीला साबळे-वाच्छानी ( उत्कृष्ट नर्तिका आणि चित्रपट-रंगभूमीवरील अभिनेत्री) तसेच त्यांचा नातू केदार शिंदे (रंगभूमी व दूरदर्शनवरचे ख्यातनाम लेखक-दिग्दर्शक).

माझा पवाडा (२००७) हे त्यांचे आत्मचरित्र आहे

शाहीर साबळे यांच्या लेखनकृती

यमराज्यात एक रात्र (पहिले मुक्तनाट्य, १६ जानेवारी १९६० रोजी अमर हिंद मंडळाच्या नाट्यगृहात पहिली प्रयोग). या मुक्तनाट्याला राज्यपातळीवरील लिखाणाच्या स्पर्धेत महाराष्ट्र सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.

 • आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
 • आंधळं दळतंय (मुक्तनाट्य; पहिला प्रयोग १३-८-१९६६ ला मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात आणि १००वा पुन्हा रवींद्रमध्ये झाला.)
 • इंद्राच्या दरबारातील तमासगीर (प्रहसन)
 • एक नट अनेक सम्राट
 • कोड्याची करामत
 • कोयना स्वयंवर
 • चित्रगुप्ताच्या दरबारातील दारुड्या
 • ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
 • नशीब फुटकं साधून घ्या
 • नारदाचा रिपोर्ट
 • बापाचा बाप (मुक्त नाट्य)
 • माझा पवाडा (आत्मचरित्र)
 • मीच तो बादशहा

शाहीर साबळे यांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गीते

 • अरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
 • अशी ही थट्टा (तमाशागीत)
 • आई माझी कोणाला पावली (भक्तिगीत)
 • आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
 • आठशे खिडक्या नऊशे दारं (लोकगीत)
 • आधी गणाला रणी आणला (गण)
 • आधुनिक मानवाची कहाणी
 • आम्ही गोंधळी गोंधळी.. (गोंधळगीत)
 • जय जय महाराष्ट्र माझा (महाराष्ट्रगीत)
 • जेजुरीच्या खंडेराया जागराला (जागरगीत)
 • तडा तडा ते फुटले आमच्या विजयाचे चौघडे
 • दादला नको ग बाई (भारूड)
 • नवलाईचा हिंदुस्थान
 • पयलं नमन हो करीतो (गण)
 • फुटला अंकुर वंशाला आज (समाजजागृती गीत)
 • बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
 • मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
 • महाराज गौरीनंदना (गण)
 • महाराष्ट्र जय महाराष्ट्र (स्फूर्तिगीत)
 • मायेचा निजरूप आईचा (भावगीत)
 • मुंबईगं नगरी बडी बाका ((आंधळं दळतंय मधील एक गीत)
 • मुंबावतीची लावणी
 • या गो दांड्यावरना बोलते (कोळीगीत)
 • या विठूचा गजर हरिनामाचा (भक्तिगीत)
 • विंचू चावला (भारूड)
 • हय् पावलाय देव मला (लोकगीत)

शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

 • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९८४)
 • १९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत
 • महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
 • (१९८८)
 • महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)
 • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९९०)
 • अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद (१९९०)
 • संत नामदेव पुरस्कार (१९९४)
 • साताराभूषण पुरस्कार (१९९७)
 • पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार (१९९७)
 • भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९९८)
 • महाराष्ट्र शासनाचा सर्वश्रेष्ठ गायक पुरस्कार (२००१)
 • महाराष्ट्ररत्न पुरस्कार (२००६)
 • लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्‌गंध जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
 • भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचा दौरा करणार्या पथकात सहभाग (१९८२)

________________________________________________________________

संदर्भ: १. मराठी विश्वकोश
          २. विकिपीडिया
Previous Article

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार: काही जुने काही नवे

Next Article

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

You may also like