सावित्रीबाई फुले

Author: Share:

जन्म : ३ जानेवारी १८३१

मृत्यू : १० मार्च १८९७

महिलांच्या शिक्षणाचा हिरीरीने पुरस्कार आणि त्यासाठी प्रचंड अवहेलना सोसून कार्य करणाऱ्या एक थोर  शिक्षणप्रसारक समाजसुधारक. पती महात्मा जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि पतीनिधनानंतर ही ज्योतिबांचे कार्य पुढे नेले. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य.

सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील . १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच आईचे प्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. सनातन्या विरोध केला. अंगावर शेण फेकले. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्ठा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले .
सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्नेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.
बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.महात्मा फुले यांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.१८९६ साली दुष्काळ पडला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
१८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
स्त्रीशिक्षण आणि समानतेसाठी कार्य करणाऱ्या या माऊलीला सादर वंदन!!
Previous Article

४ जानेवारी

Next Article

१ जानेवारी

You may also like