Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सावरकरांची काव्यप्रतिभा

Author: Share:

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, प्रखर राष्ट्राभिमान, जाज्वल्य अस्मिता, कालद्रष्टे होऊन वैज्ञानिक कसोट्यांवर परखडपणे धर्माला तपासून पाहण्याची वृत्ती, उदात्त हिंदुत्व, आणि या कणखर व्यक्तिमत्त्वामध्ये आश्चर्यकाराकपणे दडलेली, त्यांचे संवेदनशील मन दर्शविणारी अत्युच्च काव्य प्रतिभा!

उगवत्या बालरविप्रत आल्हाददायक, कोवळीक ल्यालेली सावरकरांची काव्यप्रतिभा मध्यान्हीच्या सूर्याइतकीच तेजस्वीही आहे. त्या काळाच्या पद्धती प्रमाणे त्यांची काव्य प्रतिभा छंदवृत्ताच्या बंधनात इतकी सहजपणे सामावून जाते की, जणू सुवर्णाच्या कोंदणात हिरण्यरत्न बसवावे.

काही व्यक्तिमत्व कालातीत असतात; तसेच त्यांचे कर्तृत्वही.  सावरकरांच्या काव्यलेखनाचेही तसेच आहे. त्या काव्यातील गेयता, भाव, नि:संशयपणे आजही तितक्याच रसमाधुर्याने ओतप्रोत भरलेला जाणवतो आणि सहजपणे मनाला भिडतो.

अगदी लहानपणीच सावरकरांचा बखरींचा परिचय नक्कीच झाला होता. त्याचे प्रतिबिंब स्वर्गज्ञ जातीप्रकारात लिहिलेल्या सवाई माधवरावांचा रंग यांच्यावरील फटक्यात दिसून येते. सावरकरांच्या मूळ गावी भगूर येथे लिहिलेल्या या कवितेत श्रीमंत सवाई माधवरावांची थोरवी तर वर्णन केलेली आहेच, शिवाय त्यांच्या रंग पंचमीचा प्रसंग तर आपल्यालाही काव्यारंगमय करून सोडतो. आता हेच बघा ना-

“धन्य कुलामधी धनी सवाई भाग्य धन्यची  रायाचे
सेवक हाती यशस्वी असती पुण्य किती त्या पायांचे”

अशी सुरुवात करून,

“पिचका-यांचा मार जाहला फार तेधवा बुधवारी
स्वारी कापड आळीतुनी खेळत आली बुधवारी”

असे वर्णन केले आहे.

ज्याप्रमाणे संपूर्ण विकसित झालेले वडाचे झाड दशदिशांनी विस्तारलेले असते, तशीच सावरकरांची काव्य शक्ती ही विषयातीत होती यात शंकाच नाही. अगदी कोणत्याही विषयावर कविता लिहू शकतील अशी उपजत बुद्धी त्यांच्याकडे होती, हे शार्दुलविक्रिडीत छंदात असलेल्या ‘प्लेग’ सारख्या भयंकर रोगावर लिहिलेल्या कावितेतुनही दिसून येते.

चारोळीसारखा अल्पाक्षरी कवितेचा प्रकार आज लोकप्रिय ठरला आहे. पण अन्योक्तीमधून रचलेल्या काही कवितांमधील पुढचे एक उदाहरण बघा –

डुलत तरुवरांच्या उच्च भागी तगावे
पवनसमयी झोके घेत सद्गीत गावे

युवति भवति याव्या शोभना आयकाया
पिक अनि तव टोची काक रे हाय काया

तत्कालीन भारताची पारतंत्र्यातील ही स्थिती बघून कळवळलेल्या सावरकरांच्या कोमल हृदयातून स्त्रवलेले हे काव्य आहे, हे शेवटच्या ओळींतून नक्कीच ध्यानात येते.

टिळक-आर्यभू भेट ही पत्ररूपी आर्या सावरकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिली होती. त्यांतून टिळकांविषयीचा आदर स्पष्टपणे व्यक्त होतो. टिळकांसारखा सुपुत्र जन्माला घालून ही आर्यभू किती कृतकृत्य झाली याचे सार्थ वर्णन अत्यंत भावपूर्ण शब्दांत त्यांनी मांडलेले आहे. श्री टिळक स्तवनातुनही टिळकांविषयीचा नि:सीम आदर पारदर्शकपणे व्यक्त होतो.

मातृभूमी सावरकरांचा प्राण, तर तिचे स्वातंत्र्य हा त्यांचा श्वास नि ध्यास होता. म्हणूनच तिच्यासाठी प्राण पणाला लावून लढणारे सावरकरांचे ‘आप्त’ होते. त्यामुळेच जेव्हा चाफेकर व रानडे यांच्या सारख्या वीरांना फाशी झाल्याचे कळताच, त्यांचा शोक कवितेतून पाझरला-

कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत, खंती नको! पुढे
कार्य चालवू गिरवीत तुमच्या पराक्रमांचे आम्ही धडे.

असा दुर्दम्य आदर्श सावरकरांच्या समोर असल्यामुळेच राष्ट्रवाद त्यांच्या नसानसातून वाहत राहिला. इंद्रवज्रा छंदात लिहिलेल्या ‘गेला अहो देश रसातळाला’ या कवितेत जनजागृतीची कळकळ म्हणूनच दिसून येते. पारतन्त्र्यामुळे काय आणि कशाची हानी किती अपरिमित होते हे ही त्यांनी वेळोवेळी काव्यातून विषद केले आहे. सावरकरांचे मित्रप्रेम देखील काव्यमयच. एका मित्राला संक्रांतीचा तिळगुळ चक्क कवितेतूनच पाठवला. सुप्रेम हाच तीळ, सुसहावासाचा पाक आणि मित्रत्व अंकुर असा हलवा तर कालातीतच ठरेल ना! इतकेच काय तर एका परान्मुख झालेल्या मित्राचे मनही त्यांनी कवितेतूनच वळवले होते. –

सुज्ञची अससी तुते म्या मुढे काय बोध शिकवावा
हंगाम सुखाचा सद्वर्तनजल शिम्पडोनी पिकवावा

सावरकरांचा काव्यबहर एखाद्या स्वच्छंद बागडणाऱ्या हरिण शावकाप्रमाणे! अगदी भाषेचे देखील बंधन नाही. मातृभाषा अमृततुल्यच. परंतु इंग्रजी, हिंदी, एवढेच नव्हे, तर उर्दूत देखील त्यांच्या काव्यरचना आढळतात. टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, अंदमानच्या कारागृहात प्रत्येकी पाच पानी अशा दोन कविता त्यादेखील उर्दू लिपीत स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या सापडल्या आहेत.

भाषावादाच्या संकुचित विचारसरणीवर आपल्या काव्यकृतीने घातलेला हा घालाच नाही का?

स्वातंत्र्य संग्राम या विषयाला वाहिलेल्या या कविता आहेत असेदेखील विशेषत्वाने नमूद केलेलं आहे. इंग्रजीतला सोनेट हा काव्यप्रकारदेखील सावरकरांच्या लेखणीतून सुनीत होऊन कधी भारतीय होतो, ते त्यांचे काव्य वाचताना कळतच नाही.

जीवन इच्छेसारखा स्वातंत्र्य प्राप्तीचा लागलेला ध्यास, परम दैवातासारखी असलेली मातृभूमिवरची निष्ठा आणि प्रचंड बुद्धिवैभव दर्शविणारी काव्यप्रतिभाया त्रिवेणी संगमामुळेच सागराच्या उसळत्या लाटांशी मनाला सहजपणे एकरूप करून ते मातृभूमीचे दर्शन घडव अशी तळमळून विनंती करतात. मातृभूमिवरचे आत्यंतिक प्रेम आणि ती पारतंत्र्यात असल्या मुले त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना यातून सावरकरांच्या कित्येक काव्यरचना निर्माण झाल्या आहेत.

स्वातंत्र्यासाठी अत्यंत हाल अपेष्ट, काळ्या पाण्याची शिक्षा सोसून देखील त्यांच्या संवेदनशील काविमानातील काव्यकोवळीक जीवंत राहिली , हे नवलच!  स्वागता, मालिनी, वसंत तिलका यांसारख्या छंदवृत्तान्मधून, नानाविध काव्यप्रकारांतून ती बहरत राहिली. त्यांचे महाकाव्य कमला याचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. अंदमानच्या कारागृहात जेव्हा त्यांना लेखनाचे कोणतेही साधन दिलेले नव्हते, तेव्हा तिथल्या भिंतींवर त्यांनी हे काव्य लिहिले. पुढे बिहारच्या रामहरी नावाच्या बंदिवानाला ते मुखोद्गत झाले व त्याने सुटका झाल्यावर सावरकरांच्या बंधुंची भेट घेतली. त्यावेळी कमला हे काव्यरत्न जगाला गवसले. स्वानंदासाठी काव्यरचना करणाऱ्या सावरकरांची केवढी ही प्रसिद्धी परान्मुखता!

एखाद्या कणखर, काळ्याकभिन्न कातळाच्या आत शुद्ध जलाचा स्त्रोत सापडावा, तशीच सावरकरांची काव्यप्रतिभा आहे. शारीरिक, वैयक्तिक, मानसिक दु:खे  सोसूनही वाळवंटातील जलाशयासारखी त्यांची काव्यमती लेखणी निसर्ग कविताही अगदी सहजपणे प्रसवते. सावरकरांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे देहाने गेली, तरी विचाराने, कार्याने अजरामर ठरतात. विशेषत: त्यांची उत्कट भावपूर्ण काव्ये स्तोत्रासारखी महाराष्ट्राच्या कडेकपारीतून घुमतात.

आवर्जून अभ्यासिली जातात. म्हणूनच आजही सावरकरांचे महन्मंगल कार्य जयोस्तुते होऊन निनादात आहे आणि निरंतर निनादत राहील.

– सोनाली ताम्हाणे
sonali08tamhane@gmail.com

Previous Article

भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना परदेशात राहूनच मतदान करता येण्याची सोय

Next Article

२६ /११ मुंबई वरील हल्ला: फोटोग्राफर तुषार मानेच्या लेन्समधून

You may also like