सावरकर जयंती आणि मोदी – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


ह्या वर्षीच्या सावरकर जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी , आदल्या दिवशी आकाशवाणीवरून झालेल्या त्यांच्या “मन की बात ” ह्या कार्यक्रमात त्या थोर देशभक्तांविषयी भरभरून बोलले ० गोपालकृष्ण गांधी ह्यांनी काही महिन्यापूर्वी वर्तमानपत्रात एक खोडसाळ लेख लिहून सावरकरांचे तैलचित्र लोकसभेच्या मध्यवर्ती सभागृहात वर्ष २००३ मध्ये लावले गेले ह्याविषयी दु:ख आणि संताप व्यक्त केला होता ० बाबरी मशीद पडल्याला ६ डिसेंबर २०१७ ला २५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने गांधी आणि राजगोपालाचारी ह्यांच्या ह्या नातवाने लिहिलेल्या ह्या लेखात १९४८ ची गांधी हत्या , १९९२ चा बाबरीचा पाडाव आणि २००३ मध्ये सावरकरांचे तैलचित्र लोकसभेत लागणे ह्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील तीन अत्यंत शोचनीय आणि उद्वेगजनक घटना असल्याचे मत व्यक्त केले होते ० त्यातील सावरकरांच्या तैलचित्राविषयीच्या मुद्द्याला उत्तर दिले जाणे आवश्यक होते ०

वस्तुस्थिती अशी आहे की स्वातंत्र्य आंदोलनातील नेतृत्वाच्या इतिहासात टिकून राहण्याच्या क्षमतेचा परामर्श घेतला तर सावरकर व्यक्ती आणि तत्वज्ञान हा सगळ्यात मोठा ठेवा आपल्याजवळ आहे हे लक्षात येते आणि ह्याचा अनुपमेय अभिमान वाटतो ० देश हाच देव माना , देशाला जननीस्वरूपात पाहून आत्यंतिक भक्तीने आणि निरपेक्षपणे तिची सेवा करा हे सावरकरांचे आवाहन आहे ० जगात मनुजमंगलाचे तत्वज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताची योजना झाली आहे आणि त्याकरिता सर्वोच्च पराक्रम , सर्वोच्च त्याग आणि सर्वोच्च सृजनशीलता आविष्कृत करण्याची आकांक्षा प्रत्येक युवकयुवतीने धारण केली पाहिजे आणि कर्तव्यभावनेने तसे आचरण करण्याची प्रेरणा आपल्या अंत:करणात उदित झाली हाच सर्वोच्च पुरस्कार मानला पाहिजे असा आदर्श स्वोदाहरणाने सावरकरांनी घालून दिला ० सावरकर हे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्यांनी तरुणपणी गायिलेल्या स्वतंत्रतेच्या स्तोत्रात स्वतंत्र भारताचे संविधान प्रगट झाले आहे ० भारतावर राज्य करणाऱ्या परकीय राज्यकर्त्यांना जसा भारत घडायला हवा होता तसा मी घडू देणार नाही , पारतंत्र्याचे सर्व विकार मी उखडून टाकीन आणि उदात्त , महन्मधुर आणि विजिगीषू अशी भारतीय मानसिकता मी समूर्त करून दाखवीन हे त्यांनी जीवितकार्य ठरविले होते ० अवघ्या पंचविशीत लंडनमध्ये जाऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान नि परंपरा निर्माण केली आणि शेवटपर्यंत प्रवाहित ठेवली हा ब्रिटनच्या साम्राज्याला भारताने दिलेला पहिला ठोस दणका होता ० म्हणून त्यांना दोन जन्मठेपेशी शिक्षा झाली ०

सावरकरांनी अंदमानात केवळ कोलू पिसला नाही तर कविता केली हा प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला सदैव अभिमान वाटावा असा कारागृहीय चमत्कार आहे ० कारागाराच्या भिंती ओलांडून ह्या बंडनमिश्राच्या कवितांचे हुंकार बाहेरच्या जगात निनादत राहिले आणि त्यांनी अगणित तरुणांची मने देशभक्तीची फुंकर घालून प्रज्वलित ठेवली ० कारागारातही त्यांनी वाचनसंस्कृतीचा प्रसार केला आणि केवळ शस्रात नव्हे तर शास्त्रातही पारंगत व्हा हा सहबंद्यांमध्ये आग्रह धरला ० सावरकरांना अभिप्रेत असलेल्या समग्र क्रांतीचे अल्पस्वल्प दिग्दर्शन अंदमानात पाहावयाला मिळाले आणि इंग्रजांना तिसरा धक्का बसला ० दुसरा धक्का मार्सेलिसच्या उडीने दिला होता ०ब्रिटनच्या नैतिक अहंकाराचा बुरखा मार्सेलिसच्या उडीने फाडला आणि सगळ्या युरोपची आस्था भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्राप्त झाली ० ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारताच्यावतीने सतत मानसिक ताणाखाली ठेवण्याचे काम जेव्हढे सावरकरांनी केले तेव्हढे दुसऱ्या कोणाही नेत्याला करता आले नाही ० हा ताण असह्य झाला तेव्हा अंदमानातून बाहेर काढून स्थानबद्धतेचा प्रयोग करण्याचे धूर्ततेत त्याकाळी अग्रभागी असलेल्या ब्रिटिशांनी ठरविले ० सावरकरांना मुक्त करण्याचा लोकांचा दबाव होता ० तेव्हा मुक्त केल्याचे दाखवायचे पण पंगू करून सोडायचे असा डाव होता ० पण रत्नागिरीत ते सावरकरांना पंगू करू शकले नाहीत ०

रत्नागिरीत सावरकरांनी अस्पृश्यता पंगू केली, जातीभेद पंगू केले , उच्चनीच भाव दुबळे केले ० सर्वांना सामान स्थान असलेले पतित पावन मंदिर उभे केले ० समरसतेची आवश्यकता म्हणून त्यांनी मंदिर उभारले पण धर्मग्रंथ मिटून विज्ञानवादाचा स्वीकार करा असा प्रचार आणि प्रसार करण्याचे सोडले नाही ० अद्यतन व्हा हा एकच आग्रह त्यांनी धरला होता ० सावरकरांचा ‘ हिंदुत्व ‘ हा ग्रंथ म्हणजे पाकिस्तान निर्मितीच्या दिशेने वळलेला स्वातंत्र्य चळवळीचा ओघ अखंड भारताच्या दिशेने पुनर्प्रस्थापित करण्याचा भगीरथ प्रयत्न आहे ० सर्व सशस्त्र आणि निशस्त्र देशभक्त अखंड भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सर्वस्व समर्पणाच्या भावनेने स्वातंत्र्य आंदोलनात उतरले होते ० ते स्थंडिल सावरकर विझू देत नव्हते ० स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असा मंत्र लोकमान्यांनी दिला ० ते स्वराज्य म्हणजे हिंदुराष्ट्र होय ह्याची जाणीव सावरकरांनी करून दिली ० एड्वर्डला घालवून औरंगजेबाला गादीवर बसविण्यासाठी आम्ही रक्त सांडलेले नाही असे सावरकरांनी ठणकावून सांगितले ० ह्या सूर्यमंडळात हिंदूंना त्यांचे राष्ट्र स्थापन करण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे हा आत्मविश्वास सावरकरांनी दिला ०

अखंड भारताच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले ० म्हणून काँग्रेसला १९४५-४६ च्या सार्वत्रिक निवडणुका अखंड भारताच्या घोषणेवर लढवाव्या लागल्या ० अर्थानं काँग्रेस पाकिस्तान निर्मितीला बांधलेली होती ० तसे शब्द गेले होते ० म्हणून हिंदूंचा विश्वासघात करतांना काँग्रेसला त्रास झाला नाही ० क्रांती करण्याची हिंमत हिंदूंमध्ये नाही म्हणून पाकिस्तान स्वीकारले पाहिजे असे गांधींनी काँग्रेस कार्यकारणीला सांगितले ० सावरकरांनी लोकमताचा दबाव वाढवून संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण बंगाल पाकिस्तानात जाणार नाही असे डावपेच लढवले ० काँग्रेसच्या भ्रांत राष्ट्रवादाच्या तत्त्वज्ञानाने आणि अवसानघातकी नेतृत्वाने पाकिस्तान निर्माण झाल्याची जाणीव करून देऊन स्वतंत्र भारताची वाटचाल निर्धोक होण्यासाठी पाकिस्तानला आणि पाकिस्तानी प्रवृत्तीला कसे धाकात ठेवले पाहिजे ह्याचे जणू प्रशिक्षण देण्यासाठी उरलेले आयुष्य सन्यस्त प्रचारकासारखे सावरकरांनी जगून दाखविले ० इहलोक सोडून जातांना धन्यो अहं न मे कर्तव्यं आसित असे कृतार्थतेचे उद्गार त्यांनी काढले ० उत्तुंग प्रज्ञा आणि प्रतिभा अंगी असतांना एक क्षणही सावरकर स्वतःसाठी जगले नाहीत ०

मोदी हा पहिला पंतप्रधान असा आहे की ज्याच्यावर ‘ सावरकर व्यक्ती आणि विचार ‘ ह्याचा काही ना काही परिणाम झाला आहे असे वाटते ० मोदी हा पहिला पंतप्रधान असा आहे की पंतप्रधान होण्यापूर्वी जो दुर्ग रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झाला आहे ० गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदींनी गेल्या चार वर्षात किती कल्याणकारी योजना पुढे आणल्या आणि राबवून दाखविल्या ० एकही दिवस सुट्टी न घेता दिवसाचे अठरा तास ते राबत आहेत ० मला सावरकरांच्या जीवनातील एका रोमहर्षक घटनेची त्यांना पाहिल्यावर आठवण येते ०

दोन जन्मठेपी भोगण्यासाठी अंदमानला पाठविले जाण्यापूर्वी सावरकरांना मुंबईत डोंगरीच्या कारागृहात ठेवले होते ० त्यांची पत्नी त्यांना भेटण्यास आली ० हातापायातल्या जड बेड्या लीलया खेळवीत २७ वर्षाचे सावरकर सामोरे आले आणि समजूत काढतांना म्हणाले की चार काटक्या गोळा करून घर बांधणे आणि मुलांची वीण वाढविणे ह्यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असा संसार कावळे चिमण्यांही करतात ० पण संसाराचा ह्याहून भव्यतर अर्थ घेणे असेल तर भविष्यात आपण स्वतंत्र होऊ तेव्हा लोकांच्या घरातून सोन्याचा धूर येण्यासाठी आज काही लोकांनी आपली चूलबोळकी फोडून टाकली पाहिजेत ० नियतीने त्याकामी आपली योजना केली आहे हा बहुमान समजून आपण मन आवरले पाहिजे ०

गोरगरिबांच्या वाट्याला सोन्याचे दिवस यावेत म्हणून आपली चूलबोळकी फोडून टाकणारा पहिला पंतप्रधान ह्या देशाला नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाला आहे ० मोदींवर शिवाजी महाराजांचा प्रभाव आहे ० तो कसा आहे त्याची दखल पुढील लेखात घेऊ ० इत्यलं ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

स्वच्छता

Next Article

ईव्हीएम: लोकशाहीचा तकलादू पाया?

You may also like