Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, म्हणजे काय?

Author: Share:

सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा, असा टोमणा सामनातून मोदींना मारण्यात आला. मुळात ज्या वाक्याचा आधार सामनाने घेतला आहे. ते वाक्य सावरकरांचे आहे. सुरुवातीस इथे स्पष्ट करतो की जरी सामनाचा उल्लेख इथे केला असला तरी आमचा उद्देश सामनावर टीका करण्याचा नाही. केवळ संदर्भ म्हणून उल्लेख इथे केला आहे. हे अशासाठीच स्पष्ट करावे लागत आहे की लोक जसे उथळ विधाने करतात, तसे उथळ अर्थही काढतात, असो. तर ते सावरकरांचे मूळ वाक्य असे आहे; लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. हे वाक्य सर्रास कुणीही वापरतो. जणू हे वाक्य इतक्या सहज स्वतः सावरकरांनीही उच्चारले नसेल. सावरकरांचे काही वाक्ये अनेक लोक आधार म्हणून वापरतात. काही दिवसांपूर्वी शरद पवारांना “गाय ही उपयुक्त पशू आहे” या सावरकरी वाक्याचा साक्षात्कार झाला होता.

स्वतःस पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी नेहमी या वाक्याचे रवंत करीत असतात. तसेच स्वतःस हिंदूत्ववादी म्हणवून घेणारी मंडळी “लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या” हे वाक्य चघळत बसतात. पण सावरकरांनी हे वाक्य का? कोणत्या परिस्थितीत? व कोणत्या अर्थाने म्हटले होते? याचा विचार कुणीही करत नाही. सोशल मिडीयावर अनेक हिंदुत्वाचे तारणहार दिसून येतात. काही झाले तरी त्यांना सावरकरांच्या या वाक्याची आठवण सतत होत असते. म्हणजे कुठेही एखादी धार्मिक तणावाची घटना घडली तर लगेच “लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या” किंवा सैनिकांवर हल्ले झाले तर “लगेच लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या” किंवा गोरक्षकांनी कायदा हातात घेतला, तर त्याचे समर्थन करण्यासाठी सुद्धा “लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या”. सावरकर आज असते तर उपहासाने म्हणाले असते, एक वेळ बंदुका मोडा हो, पण ह्यांना आवरा, असो. बरे हे सांगणारे कोण? तर तासनतास फेसबुकवर घुटमळणारे तथाकथिक हिंदुत्वाचे रक्षक. मग लेखण्याच जर मोडायच्या आहेत. तर सुरुवात स्वतःपासून नको का करायला? मुळात हा मुर्खपणाच आहे. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत नागरिकांनी बंदुका हातात घ्यायच्या नसतात. तसे स्वतः सावरकरांनीही सांगून ठेवले आहे.

सावरकरांनी हे वाक्य उच्चारले ते १९३७ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना. सावरकर हे पहिले आणि शेवटचे साहित्यिक अध्यक्ष असावे ज्यांनी अशा प्रकारचे वक्यव्य थेट साहित्य संमेलनात केले. पहिली गोष्ट त्यांनी हे वक्यव्य केले, त्याआधी ते स्वतः सशस्त्र क्रांतीकारक होते. वातानुकुल खोलीत बसून त्यांनी दिवस काढलेले नाहीत. त्यामुळे असे वक्यव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार होता. दुसरी गोष्ट म्हणजे लेखण्या मोडून बंदुका हातात घ्यायच्या म्हणजे प्रत्येक नागरिकाने बंदुका घेऊन रस्त्यावरुन येड्यागबाळ्या सारखे फिरायचे नाही. तर सैन्यात भरती व्हायचे आहे. या वक्तव्याला दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी सुद्धा आहे. “आमच्यावेळी शस्त्र मिळत नव्हती, पण आता ब्रिटीश स्वत:च तुम्हाला महिना पंचविस रुपये पगार देऊन तुमच्या हातात बंदुका देत आहेत या संधीचा फायदा घ्या” असे सावरकरांचे म्हणणे आहे. म्हणजे आता देश स्वतंत्र्य होण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यावेळी हिंदू तरुणांनी सैन्यात भरती झाले पाहिजे. उद्या जर देश स्वतंत्र झाला तर आपले सैन्यबळ मजबूत असले पाहिजे. त्याचप्रमाणे ब्रिटिंशांच्या पक्षातून जरी बंदुका हातात घेतल्या, तरी योग्य वेळ आल्यास बंदुकीचे टोक कुठे वळवायचे हे पाहता येईल. एवढा परिपक्व विचार सावरकरांनी केलेला होता. पण स्वतःस सावरकर भक्त किंवा सावरकरवादी म्हणवून घेणारे हिंदूत्ववादी उठसुठ या वाक्याचा जप करीत राहतात. पण त्यामागे त्यांचा असा कोणताही परिपक्व विचार नसतो. मुळात ते परिपक्व नसतात म्हणूनच हे वाक्य उच्चारत बसतात.

या वाक्याला अनुसरुन सुभाषचंद्र बोस व हिंदुमहासभेचे जपान शाखेचे अध्यक्ष रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिंशांशी दोन हात केले आहे. म्हणजे सावरकरांनी हे वाक्य उच्चारण्यामागे जो विचार केला होता तो किती व्यापक होता. बंदुका हातात घ्यायच्या त्या राष्ट्र रक्षणासाठी, राष्ट्रात अराजकता माजवण्यासाठी नव्हे. सावरकरांवर टीका करण्यासाठी विरोधकही या वाक्याचा आधार घेतात. सावरकर कसे अराजक होते हा त्यांचा आरोप. पण मूळ पार्श्वभूमी वेगळीच आहे. सावरकर भक्त आणि विरोधाक दोघांनीही सावरकरी वाक्यांचा अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे असले उथळ विधाने होत राहतात. सोशल मिडीयावर असले विधाने करणारे मोठ्या संख्येने आहेत. आपण अशा आशयाच्या पोस्ट्स वाचल्या असतील की लेखनाने क्रांती होत नाही, शस्त्रानेच होते. पण हे वाक्य ते फेसबुकवर पोस्ट करुन नंतर तृप्त ढेकर देतात. मुळात हिंदूंच्या तत्वज्ञानानुसार सशस्त्र क्रांती हा केवळ एक पर्याय आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे लोटलेली आहेत. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. त्यामुळे इथे क्रांती केवळ मतपेटीतूनच होणार आहे, बंदुकीच्या नळीतून नव्हे. बंदुकीच्या नळीचा आग्रह हा कम्युनिस्टांचा आहे. त्यामुळे उगाच कुणीही आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणे करु नये आणि ते करायचे असल्यास तर स्वतःच्या बळावर करावे, सावरकरांना मध्ये आणू नये. सावरकरवादाचा पाया बुद्धीवादावर उभा आहे, निर्बुद्धवादावर नव्हे. त्यामुळे आपल्या वैचारिक दिवाळखोरीत कुणीही सावरकरांना मध्ये आणू नये. त्यांना उगाच बदनाम करु नये. ही बाब सावरकर समर्थक आणि सावरकर विरोधक दोघांनाही लागू पडते. असो.

 

Previous Article

मुंबईच्या लाडक्या गणरायाचे दिमाखदार आगमन!

Next Article

कळवा स्टेशनच्या विकासाचा मार्ग  

You may also like