Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सातार्‍यातील उठाव

Author: Share:

१२ जून १८५७ रोजी ब्रिटीशांविरोधातील सातार्‍यातील उठावाची सुरुवात झाली.

उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३१ दरम्यान इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. १८२९ मध्ये नसरापूर येथे कप्तान राँबर्टसन व डेबि यांच्यावर हल्ला केला होता. १८२९ मध्ये प्रतापसिंह महाराजांना भेटून त्यांनी पुरंदरच्या वतनाची मागणी केली होती. इंग्रजांना सारा न देत मला द्या तो मी गोरगरीबांसाठी खर्च करेन असे त्यांनी जाहीर केले होते. १८३१ मध्ये त्यांना इंग्रजांनी पंढरपूर येथे पकडले. बंड केल्यापद्दल खटला भरून १३ फेब्रुवारी १८३२ला येरवड्यास फाशी दिले.

१८१८ मध्ये पेशवाई नष्ट झाल्यावर गोपाल पटवर्धन, अण्णाजी शेंडे, विठुजी कुंडलकर, सन्तु घडगा व यशवंत चव्हाण यांनी १८२१ मध्ये बंड केले. यांनी दोन हजार माणसे जमा केली होती. यात गोपाल पटवर्धन यांस जन्मठेप व यशवंत चव्हाण यांस दहा वर्षे शिक्षा झाली.
१८४० मध्ये कोले येथील धारराव पवार यांनी बंड केले. कराड ते प्रचीतगड या भागात त्यांनी आपला अंमल बसवला. तेथील इंग्रजांची सत्ता उठवली पण नंतर त्यांचा पराभव झाला. पण ते भूमिगत झाले. ते शेवटपर्यंत सापडले नाहीत. त्यांच्या अनुयायांना मात्र तुरुंगवास सोसावा लागला.

१८४४ मध्ये प्रताप सिंहाचा एकनिष्ठ अनुयायी सुभान निकम व लिंबाचे राघो आपटे यांनी उठाव केला. त्यांनी इंग्रजांची टपाल यंत्रणा मोडून काढली. कोल्हापूरच्या सामानगड येथे येथे निकमानी तळ ठोकला. तेथे ५०० लोक जमवले. निकमांवर हल्ला करण्यासाठी सातारचा रेसिडेंस ओव्हन्स याची नेमणूक झाली. त्याचा कासेगाव येथे निकमानी पराभव करून त्याला कैद केले. व पन्हाळ्यावर ठेवले. १८४५ मध्ये इंग्रजांनी ओव्हन्स याची सुटका केली. व निकमला कैद केले.

१८३८ साली प्रतापासिन्हाना पदच्युत केल्यावर या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रंगो बापुजी गुप्ते समुद्रमार्गे इंग्लंडला गेले. प्रतापासिहांना त्यांचे राज्य परत मिळावे म्हणून त्यांनी चौदा वर्षे अथक प्रयत्न केले. शेवटी निराश होऊन ते १८५४च्या फेब्रुवारीत परत आले. नंतर दीड वर्षे वेगवेगळ्या लोकांना भेटून ते योजना बनवत होते. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्याशीही त्यांनी संधान बांधले. आपला पुतण्या वासुदेव याला ५०० सैनिकांनीशी पेशव्यांच्या मदतीला पाठवले.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


१८५६ ते ५७च्या दरम्यान माणसे, पैसे व युद्धासाठी साहित्य मिळवण्यासाठी ते फिरत होते. सैन्यात भरतीसाठी त्यांनी येनावडे, वाठार, देऊर, वर्धनगड वारुगड आर्वी, कळंबी, कराड, आरळे अर्जुनगड येक्मुल्ली, जकातवाडी फलटण व जिल्ह्याबाहेरही केंद्रे सुरु केली. गुप्त्यांचे मख्य ठाणे सातारा मेढा रस्त्यावर हम्दाबाद (अहमदाबाद) येथे होते. सातार्यात मंगळवारात बालाजी शिप्याचे घर, कृष्णेश्वराजवळ गोसावी वाडा, विठोबाच्या नळाजवळ सखाराम कबाडे यांचे घर हि केंद्रे होती. त्यांना पुढील साथीदार मिळाले.

सातारचे तात्या फडणीस, कर्हाडचे दौलत पवार, रंगो बापूजींचा मेहुणा अण्णा चित्रे, मुलगा सीताराम, भोरमधील शेट्ये बंधू, सातारा येथील बाविसाव्या पलटणीला दप्तरदार गणेश कारखानीस, जकातवाडीचे सोनार हरी देवरुखे यांच्या बरोबर बोलून कामे वाटून देण्यात आली. पोलिसात व इंग्रजी सैन्यात फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारुगोळा तयार करणे अशी वाटणी झाली. स्वतः रंगो बापूजीं सज्जनगडावर सहा आठवडे होते. तेथील मांग व रामोशी यांना सैन्यात भरती करून घेत होते. रामोशांचा पुढारी सत्तू रामोशी मांगांचा पुढारी बाबिया , योरीया , मल्या मांग शिवराम कुलकर्णी यांना रंगो बापूजीं यांनी बंडात सामील करून घेतले. रंगो बापूजीं सज्जनगडावर भोरच्या तुकडीची वाट पाहत होते. अप्पा ऐतवडेकरानी ८०० तोफ गोळे तयार केले.

सातारा तुरुंगावरील पहारेकरी मानसिंग सैन्यात फितुरी करून दारुगोळा मिळवणार होता भोरमध्ये दारूगोल्याची जय्यत तयारी केली होती. कोल्हापूरच्या चीमासाहेबांशी संपर्क झाला होता. सातारच्या राण्यांची व बोवासाहेब शिर्के या पोलिस प्रमुखांची समती मिळवून ठेवली होती. उत्तर हिदुस्थानात १२ जून १८५७ हि बंडाची तारीख ठरवण्यात आली होती. तोच मुहूर्त सातारच्या बंडासाठी ठरवण्यात आला. गोसावी वाड्यात शेवटची बैठक होऊन दुध भात साक्षी ठेवून सर्वांनी शपथ घेतली देवाला कौल लावण्यात आला. आरल्याच्या नागाइने अनुकूल तर खरसुंडीच्या देवीने प्रतिकूल कौल दिला.

तात्कालीन धेय्य असे होते. सातारा, यवतेश्वर व महाबळेश्वरचे इंग्रजी सैन्य कापून काढणे, तुरुंग फोडून ३०० कैदी मुक्त करणे. इंग्रजांच खजिना लुटणे, सातारच्या गाडीवर प्रताप सिंहाचा दत्तक मुलगा शाहू याला बसवून छत्रपतींची राजवट सुरु करणे. पण दैव अनुकूल नव्हते. १८३१ मध्ये उमाजी नाईक यांच्याशी ज्याने १० हजारासाठी फितुरी केली त्यानेच हि बातमीही भोरच्या राजाने नोकरीवरून कमी केलेल्या एकाकडून इंग्रजांकडे पाठवली फितुराचे नाव नाना चव्हाण असे होते. बातमी कळल्यावर डिस्ट्रिक्ट मँजिस्ट्रेट रोज याने हालचाली करून सैन्यात फितुरी माजवणार्या मानसिंंगाला पकडून तोफेच्या तोंडी दिले.

मरताना मानसिंग प्रजेला उद्देशून म्हणाला जर जातिवंत हिंदू आणि मुसलमान असाल तर इंग्रजावर सूड उगवल्याशिवाय राहू नका.
१७ ऑगस्टला छत्रपतींच्या वाड्याला वेढा घालून राणीसाहेबांचे दत्तक चिरंजीव कशी महाराज सेनापतींचे दुसरे चिरंजीव दुर्गासिंग व सेनापतींचे चुलत भाऊ पर्शुरामबाबा यांना एका गाडीत व माईसाहेब, राणीसाहेब , पर्शुरामबाबा यांची पत्नी यांना दुसर्या गाडीत बसवून प्रथम खडकीला नेण्यात आले. तेथून मुंबई जवळच्या बुचेर बेटात ठेवण्यात आले.

लेफ्ट. कर्नल याने बुवासाहेब शिर्के यांचा वाडा उद्वस्त केला. सेनापतींच्या चुलत्यांना राजद्रोहाचा आरोप ठेवून जन्मठेप सुनावली. त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यांना सातार्याहून हलवण्यापूर्वी सात्विक संतापाने त्यांचा मृत्यू झाला. प्रतापसिन्हांचा मुलगा शाहू याना कराचीला नेउन स्थानबद्ध करून बाकीच्यान नगरच्या किल्यात ठेवण्यात आले. रंगो बापुजींवर पकडण्यासाठी ५०० रुपये बक्षीस ठेवण्यात आले. पण ते जे भूमिगत झाले ते सापडलेच नाहीत. ( याच काळात नेमके अक्कलकोटचे स्वामी समर्थ प्रकट झाले काहींच्या मते हे रंगो बापुजीच होते. पण याला ठोस पुरावा नाही. ) त्यांचे १६ साथीदारही भूमिगत झाले ते शेवटपर्यंत सापडले नाहीत.

१८५८ च्या ऑगस्ट मध्ये तीन जणाचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरु झाली. रंगो बापुजीं सापडले नाहीतच. पण त्यांचा मुलगा सीताराम वाळवे बोरगाव येथे पकडण्यात आले. मी बंडात भाग घेतला होता असे त्यांनी उघडपणे सांगितले. खटला १५ मार्च ते २४ मार्च १८५८ पर्यंत चालला. त्यात खालील लोकांची मालमत्ता जप्त करून सर्वाना जन्मठेप झाली. १ हैबतराव महाडिक, पुतळाजी सावंत विठू भोसले, विठू कुमकर, गणु भोसले , विठू न्हावी , आबा कदम, नारोजी कासकर, खेलेजी नाईक कासारकर, राघोजी भोसले, नारायण शेवडे, गोपाल जोशी पाळीचे बुवा केशव कीवे, हि मंडळी होती.

७-७ १८५८ ला निकाल लागून खालील शिक्षा सुनावण्यात आल्या. नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे , शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते, यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड (मांग) येशा गायकवाड (मांग), गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चावण, बाबा कानगी रामोशी नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे?) पर्वती पोटाले (पाटोळे?) पताळू येशु यांना गोळ्या घालण्यात आल्या.

मृत्यूची शिक्षा देताना असा भेदभाव का हे न उलगडलेले कोडे आहे. निकाल लागल्यानंतर लागलीच ८ सप्टेंबरला शिक्षेची अंमल बजावणीही झाली आणि सर्वाना यमसदनी पाठवण्यात आले. आरोपित सर्व जातीचे लोक होते हे विशेष आपल्या धेय्यासाठी जातीभेद विसरून मृत्यूला कवटाळण्याचा तो जमाना होता.

सातारकरांनी ८ सप्टेंबर हा दिवस सातारच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मानवा. यासाठी सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाने पुढाकार घ्यावा. एवढीच या लिखाणाची माफक अपेक्षा आणि रंगो बापुजींचेही यथोचित स्मारक व्हावे एवढेच.

लेखक: संजय कोल्हटकर


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

संस्कृत वाङ्मयाचा परिचय सोप्या भाषेत करून द्यावा : पं. वसंतराव गाडगीळ

Next Article

मुखर्जींनी मार्ग मोकळा केला…

You may also like