Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व

Author: Share:

सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरु केला? असा वाद काही दिवसांपूर्वी पुण्यात झाला होता. पण आपण या वादात न पडता लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सावाचा दृष्टीकोन काय होता, याची चर्चा करुया. शिवोत्सव आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव लोकमान्यांना का सुरु करावेसे वाटले? लोकमान्यांनी सुरुवात करण्याआधी सार्वजनिक शिवोत्सव रानडे प्रभृती लोक साजरे करायचेच. पण मग लोकमान्यांनी त्यात असे विशेष काय केले? तर लोकमान्यांनी या दोन उत्सवाला केवळ सार्वजनिक उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्यांना राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा दिला आहे. त्या काळी इंग्रजांचे शासन होते. लोक विभागले होते. हिंदूंचे उत्सव म्हणून तसे बरेच आहेत. अनेक उत्सवांमध्ये हिंदू एकत्र येत होते. पण केवळ उत्सव साजरा करणे हाच त्यांचा उद्देश होता. त्यात त्या काळी जातींमधील भेद प्रचंड होडा. लोकमान्यांनी या उत्सवांचा उपयोग समाज प्रबोधक आणि लोकांचे एकत्रीकरण यासाठी केला. सर्व जातींमधील लोकांना एकत्र आणण्यासाठी एक महापुरुष हवे होते, ते म्हणजे छत्रपती शिवराय. हिंदू वृत्तीने धार्मिक. म्हणून एक असा धार्मिक विधींवर आधारित उत्सव हवा होता, ज्या उत्सवात सर्व एकत्र येतील आणि भारताच्या भविष्याचा पाया रचला जाईल. लोकमान्यांनी यासाठी गणेशोत्सवाची निवड केली. गणपती हे हिंदूंचे आराध्य, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असल्यास आपण श्रीगणेशा केला असे म्हणतो, कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, गणपती ही बुद्धीची देवता, तसेच ती योद्धाही आहे. म्हणजे बळ आणि बुद्धी असे दोन्ही गुण गणपतीकडे आहेत. सावरकर म्हणाले होते की देवाचे गुण भक्तात उतरतात, या न्यायाप्रमाणे गणपतीची निवड लोकमान्यांनी केली असावी.

सार्वजनिक गणपती हा आपल्या घरातील गणपती नाही. तो समाजातील सर्वांचा गणपती आहे. त्यामुळे सार्वजनिक गणपती समोर जर नवस किंवा प्रार्थना करताना समाजाचे हित लक्षात घेणे महत्वाचे आहे. माझ्या सूनेला मूल होऊ दे, माझा मुलगा परिक्षेत उत्तीर्ण होऊ दे, असले नवस मागून सार्वजनिक गणपतीला त्रास द्यायचा नाही. सार्वजनिक गणपती समोर देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडव, भारतातील लोक समाज म्हणून एकत्र येवो, भारताचे कल्याण होवो अशा प्रकारचे नवस सार्वजनिक गणपती समोर मागितले पाहिजे, अशी लोकमान्यांची धारणा होती. नवस मागणे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असा एकतर्फी विचार न करता प्रार्थनेला प्रचंड महत्व असते हे आपण जाणून घेतले पाहिजे. आज आकर्षणाच्या नियमांबद्दल जे थोर लोक सांगत असतात, त्यांनीही प्रार्थनेला महत्व दिल्याचे आपल्याला जाणवले असेल. त्यामुळे सार्वजनिक गणपती समोर समाजासाठी मागणे मागितले पाहिजे. समाजाच्या हितासाठी आणि एकत्रीकरणासाठीच सार्जजनिक गणेशोत्सव आहे. परंतु हळू हळू याचा विसर आता लोकांना पडत आहे.

जन एकत्रीकरण हा हेतू आता मागे पडत आहे. त्यामुळे आता कोणाचा गणपती दणक्यात वाजणार ही स्पर्धा सर्वत्र पसरली आहे. दिखावूपाणाला ऊत आला आहे. पण लोकमान्यांना हे अपेक्षित नव्हते. अर्थात परिस्थिती काही अगदीच वाईट आहे असे नव्हे. काही ठिकाणी उत्सवातील सरंजमशाही जाणवते. पण अनेक मंडळ त्यांच्या मंडळात सामाजिक उपक्रम राबवत असतात. चलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असतात. परंतु तरीही आम्हाला असे वाटते की आपण गणेशोत्सवाकडे देशोत्सव म्हणून पाहिले पाहिजे. सामाजिक उपक्रम तर झालेच पाहिजे. पण देश हा विचार मूळ असला पाहिजे. जसे काश्मिरमधील पंडीतांना न्याय मिळावा म्हणून गणेशोत्सव मंडळाने प्रबोधन केले पाहिजे, पालकांनी आपल्या पाल्याला मराठी शाळेत घालावे, मराठी भाषा, साहित्य या विषयी जागरुकता, समान नागरी कायदा, तीन तलाक, गोरक्षण म्हणजे लोकांचा जीव घेणे नव्हे, काश्मिरचे फुटिरतावादी यांवर समाजप्रबोधन असे अनेक उपक्रम गणेशोत्सव मंडळाने राबवले पाहिजेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सरकारने सर्टिफिकेट दिले पाहिजे. जी सार्वजनिक मंडळं (सोआसायटी किंवा चाळ नव्हे) उत्तमरितीने गणेशोत्सव साजरा करतील त्यांचा गौरव शासनाने केला पाहिजे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची पात्रता सर्टिफिकेटही शासनाने बहाल केला पाहिजे. म्हणजे ज्यांच्या गणपती मंडपाच्या बाहेर बियरच्या बाटल्या सापडतील किंवा अस्वच्छता असेल किंवा कुणी सामाजिक नियम मोडले तर त्या मंडळास सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देऊ नये. कारण गणेशोत्सव हा पवित्र आणि राष्ट्रीय उत्सव आहे. कुणी त्याची विटंबना करता कामा नये. अर्थात हे काम तसे अवघड आहे. परंतु शासनाने मनावर घेतल्यास याची पूर्तता नक्कीच होईल. यासाठी काही स्वयंसेवक नेमता येतील. हे स्वयंसेवक मंडळांना गुप्ततेने भेट देऊन सत्य परिस्थिती समोर आणू शकतात. यामुळे गणेशोत्सवात घडणार्या विपरित घटनांवर आळा बसवता येईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब महत्वाची ठरेल. लोकमान्य टीळकांनी ज्यासाठी गणेशोत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप दिले, तो उद्देश स्वातंत्र्यानंतरही सार्थक होत राहिल.

भारताला सर्वात मोठे वरदान जर मिळाले असेल तर ते सण आणि उत्सवांचे आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे उत्सव आणि सण साजरे केले जातात. त्यामुळे भारतातील सामाजिक बांधिलकी ढिसाळ होत नाही. लोक एकत्र येतात. विचारांची देवाणघेवाण करतात, आनंद साजरा करतात. तसेच भारताची आर्थिक व्यवस्थाही या उत्सवांमुळे टिकून आहे. उत्सवात सर्वच लोकांच्या व्यवसायाला प्राधान्य मिळते.

हे सबंध जगात केवळ भारतात घडते. भारत हा उत्सवप्रिय देश आहे. म्हणून आपल्यालाच आपल्या उत्सवांचे पावित्र्य राखले पाहिजे. हे आपले परम कर्तव्यच आहे. युरोपमधील अनेक देश करारांतून जन्माला आलेत. पण आपला भारत देश हा संस्कारातून जन्माला आला आहे. अनेक उत्सव आणि सण हे संस्कारांचेच एक रुप आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्सवांमध्ये कुप्रथा दिसून येत असली तरी उत्सव हे वरदानच आहेत. त्यात गणेशोत्सव म्हणजे लोक चळवळ आहे. लोकांनी लोकांसाठी राबवलेली लोक चळवळ म्हणजे गणेशोत्सव. त्यात सार्वजनिक गणपती म्हणजे सामाज निरोगी राहावा यासाठी ही परंपरा लोकमान्यांनी निर्माण केली आहे. त्यांनी केवढा दूरगामी विचार असेल यावरुन हे स्पष्ट होते.

केवळ आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपली परंपरा ही विकृतीकडे झुकणार नाही. यासाठी आपणच पावले उचलायला हवीत.

चला तर मग नेहमीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही यशस्वी करुया. सामाजिक बांधिलकी जपूया. सार्वजनिक गणपतीचे महत्व लोकांनाही पटवून देवूया. एक सुरक्षित, सुशिक्षित आणि सक्षम समाज निर्माण करुया.
चला तर मग सार्वजनिक गणरायाकडे समाजाचे हिताचे मागणे मागूया;

सर्व समाज जात, धर्म, पंथ यांस बाजूला सारुन भारतीय म्हणून एकत्र येवो,
आमच्या देशाच्या सीमा नेहमीच सुरक्षित राहो,
आमच्या देशाच्या स्त्रीया सक्षम आणि सबळ होवोत,
आमच्या देशाच्या सर्व राज्यांमध्ये आपापसात प्रेम आणि बंधुता राहो,
आमचा भारत देश जागतिक सत्ता होवो,
आमचा भारत देश संस्कार, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण या सर्वांचे जागतिक केंद्र होवो,
अखंड ब्रह्मांडात हा भरतभूमीचा तारा तेजस्वीपणे तळपत राहो,

सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे वेगळेपण आपण जाणून उत्साहात गणेशोत्सव साजरा करुया. बाप्पा आपल्या पाठीशी आहेच.

तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…

Previous Article

२५ ऑगस्ट

Next Article

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन

You may also like