सरदार पटेल, भांडारकर आणि राज ठाकरे

Author: Share:

सरदार पटेलांच्या १४२ व्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान मोदींचे एकता दौड आयोजित करण्याचे आवाहन, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरावरील क्रूर आक्रमणातील सर्वांच्या सर्व सत्तर-पंचाहत्तर आरोपींची पुराव्याअभावी झालेली निर्दोष मुक्तता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई महापालिकेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत सामील झाल्यानंतर राज ठाकरे ह्यांची झालेली चुकीची प्रतिक्रिया ह्या तीन मुद्द्यांवर मूलभूत स्वरूपाचे भाष्य होण्याची आवश्यकता हा माझ्या ह्या लेखाचा विषय आहे. पटेलांचा ३१ ऑक्टोबर हा जन्मदिन होता. भारतीय संघराज्यात स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षात व्हायला हवी होती तेव्हढी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक एकता साध्य झालेली नाही ही मोदी ह्यांची खंत आहे.  त्याकरिता राजधानी दिल्लीत आणि  सर्व राज्यात प्रमुख ठिकाणी युवकांनी पुढे येऊन “एकता दौड” संघटित करावी असे आवाहन पंतप्रधांनी केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पक्षाने वल्लभभाईंशी जवळीक साधावी हे काँग्रेस संस्कृतीच्या विचारवंतांना न आवडणे साहजिक आहे. गोपालकृष्ण गांधी हे त्यापैकी एक आहेत. ते मोहनदास गांधी आणि राजगोपालाचारी ह्यांचे पणतू असून प्रशासन सेवेत त्यांनी काम  केले आहे. ते राज्यपालही होते .त्यांचा चेन्नईच्या ‘ हिंदू ‘ दैनिकात ३१ ऑक्टोबरच्या अंकात लेख असून स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाने पटेलांशी दूरत्व ठेवले ही चूक झाली असली तरी भाजपने पटेलांशी जवळीक साधण्याचे धाडस करणे हा शाप आहे असे त्यांनी म्हटले आहे .त्यांचे नेमके वाक्य असे आहे. “The Congress”s unwitting de-option of Patel was an error. Hindutva’s calculated co-option of Patel is an execration.”स्वातंत्र्य चळवळीतील नेहरू आणि पटेल ह्यांचे साहचर्य आणि योगदान लक्षात घेता त्यांच्यातील उघड झालेले मतभेद कमी महत्वाचे असून स्वतंत्र भारताची वाटचाल कशी असावी ह्याविषयात दोघांचे एकमत होते आणि ते लक्षात घेता पटेलांवर काँग्रेसचा हक्क असून भाजपने वारसा हक्क सांगणे हा दैवदुर्विलास आहे असे गोपालकृष्ण गांधींना म्हणावयाचे आहे.

          उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि स्वातंत्र्य आंदोलनातील नेहरूंना तोडीसतोड असे ज्येष्ठ नेते म्हणून सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी पाचशेहून अधिक लहानमोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात सुविहितपणे विलीनीकरण करून घेतले आणि राजकीय एकतेचा आणि सुस्थिरतेचा भक्कम पाया घातला. ह्या संस्थांनांचे जे हिंदू राजे होते त्यांच्या राजकीय आकांक्षा भारताची स्वतंत्रता, सार्वभौमता, एकात्मता आणि अखंडता ह्यांच्याशी एकरूप होणाऱ्या होत्या. तसे दुर्दवाने अनेक मुसलमान संस्थानिकांचे नव्हते. गुजरातमधील जळीतकांडाने कुप्रसिद्ध झालेल्या गोध्र्याच्या संस्थानिकाला पाकिस्तानात जावयाचे होते. परंतु त्याचा जीव लहान होता म्हणून त्याचा निरुपाय झाला. हैद्राबादच्या निझामाने मात्र भारतात सामील न होता पाकिस्तानात सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याचे ठोस सामरिक आणि राजनैतिक उपाय करून बघितले. ते अतिशय श्रीमंत आणि शक्तिशाली राज्य होते. पाकिस्तानशी जलमार्गे भौगोलिक संलग्नता साधण्यासाठी पोर्तुगालशी संधान बांधून निझामाने गोवा विकत घेण्याचा प्रयत्न केला. बहुसंख्यांक हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार करून शासकीय आतन्कवादाने स्वतंत्र भारताच्या गांधीवादी शासनाला भयभीत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपले सार्वभौमत्व मान्य होणार असेल तर पाकिस्तानला सामील होण्याची मागणी आपण सोडून देऊ असे सांगून समकक्ष पातळीवर भारत सरकारशी समेटाची  बोलणी करण्याचा उद्धट प्रयत्नही त्यांनी करून बघितला. परंतु राष्ट्राची स्वतंत्रता ,सार्वभौमता,एकात्मता आणि अखंडता ह्या विषयात राष्ट्रहित आणि हिंदुहित समसमान आहेत ह्याची पक्की खूणगाठ सरदार पटेलांनी आपल्या मनाशी बांधलेली असल्याने त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि अगदी अरेला कारे करून निजामाला शरण आणले आणि भारताच्या पोटात दुसरे काश्मीर होऊ देण्याचा धोका टाळला. पटेलांनी हैद्राबादमध्ये जे सैन्य घुसविले ते नेहरूंना अंधारात ठेवून घुसविले. कारण त्याआधी दोनदा नेहरूंनी आपले पंतप्रधानांचे अधिकार वापरून पटेलांना तशी कारवाई करण्यापासून रोखले होते. भूतपूर्व पंतप्रधान नरसिंहराव पटेलांना मुक्तिदाता मानतात आणि तसे प्रगटपणे त्यांचे ऋण मान्य करतात ह्याचे कारण पटेल नसते किंवा त्यांनी नेहरूंचे ऐकले असते तर आज काश्मीरमधील हिंदूंना जे भोगावे लागत आहे ते हैद्राबाद संस्थानातील हिंदूंना भोगावे लागले असते. हैद्राबादचा मुक्तिदिन हा आपला दुसरा पण खरा आणि अधिक जवळचा स्वातंत्र्यदिनआहे असे तेथील म्हणजे मराठवाड्यातीलही हिंदू मानतात ह्याला महत्व आहे. असे मराठवाड्यातले सगळेच हिंदू भाजपचे किंवा रूढार्थाने हिंदुत्वनिष्ठ आहेत असे नाही हे गोपालकृष्णांना सांगितले पाहिजे.

               निजामाच्या पाशवी अत्याचारांविरुद्ध हिंदूंनी निशस्त्र प्रतिकाराची चळवळ सुरु केली तेव्हा त्या चळवळीत सामील होऊ नका असा आदेश गांधींनी तेथील काँग्रेसला उद्देशून काढला होता. पटेल नेहरूंना अंधारात ठेवू शकले पण गांधी तेव्हा जिवंत असते तर निजामावर सैनिकी कारवाई करण्याच्या गांधींच्या संभाव्य विरोधाला ते डावलू शकले असते का आणि जर गांधींनी निजामाला वाकविण्याऐवजी पटेलांना वाकविले असते तर आज भारताची राजकीय परिस्थिती काय असती ह्याचा विचार हिंदुत्वनिष्ठांसमवेत गोपालकृष्णांनीही करायला प्रत्यवाय नसावा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतात विलीन व्हा असा आग्रह गांधींनी काश्मीरचे महाराज हरिसिंग ह्यांना एकदाही केलेला नाही . दोघांची भेट झाली तेव्हा गांधींनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या पण भारतात विलीन व्हा असे त्यांना सांगितले नाही. काश्मीर प्रश्न भारताला कमीतकमी अडचणींचा व्हावा म्हणून नेहरूंनी करता येईल तेव्हढी सैनिकी आणि राजनैतिक कारवाई केली असल्याचे कोणी अभ्यासक ठामपणे सांगू शकेल काय? उलट नेहरूंनी भ्रांत राष्ट्रवाद आणि राष्ट्रहिताच्या मर्यादा ओलांडणारे मुसलमानांविषयीचे प्रेम ह्यातून निर्माण केलेला काश्मीरचा प्रश्न गेली सत्तर वर्षे भारताला छळत आहे. गांधी आणि नेहरू ह्यांची त्यातल्यात्यात चांगली प्रतिमा डोळ्यासमोर उभी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो तेव्हा ते भारत सरकार आणि भारतीय जनता ह्यांच्या विरोधात उभे आहेत आणि काश्मीरचा प्रश्न तेथील मुसलमानांच्या इच्छाआकांक्षानुरूप सुटावा म्हणून नैतिक दबाव टाकत आहेत असे चित्र उभे राहते.. त्यात खोटे काय आहे? पाचशेहून अधिक संस्थाने ज्याने राजकीय चातुर्याने भारतापासून अलग होऊ दिली नाही त्या सरदार पटेलांना काश्मीरचे भारतात संपूर्णपणे विलीनीकरण करणे अशक्य होते काय? पण नेहरूंनी पटेलांना काश्मीर प्रश्नात लक्ष घालू दिले नाही. काश्मीर ही नेहरूंची खासगी मालमत्ता आहे असेच लोकांनी मानावे अशा प्रकारे येथील राजकीय सृष्टी बांधून काढण्यात आली आहे. पटेलांना पंतप्रधान करावे ही लोकेच्छा असतांना ती डावलून गांधींनी नेहरुंच्या बाजूने कौल दिला त्यालाही दोघांचे विशेष काश्मिरप्रेम कारणीभूत झाले असावे.

          साधारणपणे राजकीय विश्लेषण करणाऱ्या लेखात मी शापबिप शब्द वापरत नाही. पण गांधींच्या पणतवाने ते शब्द हिंदुत्वनिष्ठांना उद्देशून वापरल्याने असे म्हणावेसे वाटते की हिंदुत्वनिष्ठांना पटेल जवळचे वाटत असतील तर ती सुसंगती आहे .अर्थात अनेकवेळा काही हिंदुत्वनिष्ठांना गांधींचे नाव काढल्यावर सद्गदित झाल्यासारखे वाटते,तोंडातून शब्द फूटत नाहीत आणि गांधींकडून कधीतरी कसेबसे मिळालेले प्रशंसेचे उद्गार नोबेल पारितोषिकासारखे समजून ते डोक्यावर घेऊन नाचतात तेव्हा ते आपल्या अनुयायांच्या अशा विश्वासघाताला का प्रवृत्त होत असावेत हे कळत नाह .

               जेम्स लेन नावाचा कोणी एक विलायती लेखक शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहितो आणि त्यात कोणालाही आवडणार नाही असा अत्यंत आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट करतो ह्यावरून निर्माण झालेला वाद म्हणजे भांडारकर प्रकरण. जेम्स लेन अभ्यासासाठी पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात प्रस्तुत पुस्तक लिहिण्याआधी जात असे ह्या कारणावरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्या संस्थेवर शारीरिक हल्ला करून तेथील दुर्मिळ प्राचीन ग्रंथांची आणि अन्य सामानाची हानी केली. त्यानंतर फार मोठ्या संख्येने अटक झाली. पण प्रदीर्घ कालावधीनंतर सरकार पक्षाने पुरेसा पुरावा दाखल केला नाही म्हणून सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष म्हणून सोडून दिले. हल्ला झाला तेव्हा कॉग्रेसचे आणि निर्दोष सुटका झाली तेव्हा भाजपशिवसेनेचे राज्य होते. पण ह्या प्रकरणावर भांडारकर संस्था, विचारवंत, साहित्यिक, राजकीय पक्ष आणि शिवभक्त ह्यांना काहीही म्हणावयाचे नाही. भांडारकर ही प्राच्य विद्येचे संशोधन करणारी आतंरराष्ट्रीय कीर्तीची संस्था आहे आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात प्रमाणीकरणाचा, अधिकृततेचा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न येतो तेव्हा ह्या संस्थेचे मत महत्वाचे मानले जाते .म्हणून ही  उदासीनता वेगळ्या प्रकारचा आतंकवाद सूचित करीत असेल काय ह्या विचाराने अस्वस्थ व्हायला होते. नवे विजिगीषू राष्ट्र निर्माण करणारा शिवाजी महाराजांचा सर्वस्पर्शी राजकीय ध्येयवाद हा खरे म्हणजे अखिल भारताचा ललामभूत विषय. तो खांद्यावर घेऊन महाराष्ट्राने पुढे जायला पाहिजे. ब्राह्मणद्वेषावर आधारित मराठा जातीचे राजकारण असा एक काळाकुट्ट कालखंड हे एकेकाळी काही वर्षे महाराष्ट्राचे वैशिष्ठ्य होते. ह्या राजकारणाचे दुष्परिणाम पसरत जाऊन महाराष्ट्राचे भवितव्य बाधित होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न झाले. पण ते विष अजून शिल्लक असून सगळ्यांना गप्प करण्याइतके ते प्रभावी आहे ह्याचे वाईट वाटते. भांडारकर प्रकरणात न्याय व्हायला हवा अशी मागणी पुढे यायला हवी आणि न्याय मिळेपर्यंत तिचा पाठपुरावा व्हायला हवा.

               महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक शिवसेनेने पळविले ह्या प्रकारांत राज ठाकरे ह्यांना अजूनही पुढीलप्रकारे अभिव्यक्त होता येईल. त्यांनी त्या सहा मतदारसंघांचा दौरा करून लोकांना भेटावे आणि सांगावे की त्यांनी मनसेच्या आणि स्वतः: राज ठाकरे ह्यांच्या भरवशावर ह्या सहा नगरसेवकांना निवडून दिले होते. नगरसेवक गेले तरी लोकांनी जो विश्वास दाखविला त्याला तडा जाणार नाही. लोकांनी महापालिकेशी संबंधित अशी कामे ह्या सहा प्रभागातील मनसेच्या कार्यालयात आणून द्यवीत. मनसेचे कार्यकर्ते ती  कामे अंगावर घेऊन पुढे रेट तील आणि लोकांचे समाधान होईल असे काम करतील. अशी भूमिका राज ह्यांनी घेतली तर त्याने अनेक गोष्टी साधतील. शिवसेनेत गेलेले ते सहा नगरसेवक निष्प्रभ होतील कारण ते गेल्याने लोकांची कामे पूर्ण होण्यात खंड पडत नाही. लोकांचा मनसेवरचा विश्वास वाढेल. तो विश्वास अप्रत्यक्षपणे लोकशाहीच्या कार्यपध्दतीवरचा असेल. अंतिमतः: पक्ष सोडतांना लोकप्रतिनिधी दहा वेळा विचार करतील. काहीवेळा खळखट्याक करणे आणि गालावर टाळी देणे आवश्यक असेलही. परंतु अशाप्रकारे लोकांची सेवा करणे ह्याने राजकीय पक्षांना आपल्या अनुयायांच्या आणि सहानुभूतीदारांच्या पलीकडे जाऊन समस्त जनतेचा विश्वास संपादन करता येईल.

          राष्ट्राची स्वतंत्रता, सार्वभौमता, एकात्मता आणि अखंडता ह्याच्याशी निगडित राजकारण करण्याऐवजी आमच्या राजकीय नेत्यांनी चिखल चिवडण्याचे राजकारण केले, अनुशासनाने  जगण्याऐवजी लाच देऊन जगण्यास भाग पाडले. त्यातून बाहेर पडायचे असेल तर मोठ्या आशयाशी एकरूप झाले पाहिजे. प्रयत्नाने आणि चिकाटीने तशी सवय लावता येईल. इत्यलम .

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी

संपर्क: ०९६१९४३६२४४

Previous Article

२ नोव्हेंबर

Next Article

साहित्य पाठविण्यासाठी आवाहन !

You may also like